उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या एका ट्विटमुळे लखनऊचे नामांतर होणार का या चर्चेला सुरूवात झाली आहे. योगींनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना १६ मे रोजी लक्ष्मणाच्या शहरात स्वागत असे ट्विट केले होते. त्यामुळे लखनऊचे नामकरण लक्ष्मणपुरी करण्यात येईल अशी चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शेषावतार भगवान श्री लक्ष्मणजी की पावन नगरी लखनऊमे आपका हार्दिक स्वागत व अभिनंदन,” या शब्दांमध्ये योगींनी मोदींचे स्वागत केले होते. लखनऊचे नामांतर करण्याचा सध्यातरी अधिकृत प्रस्ताव नसला तरी याला तीनच दिवसांपूर्वीच्या एका घटनेची पार्श्वभूमी आहे. लखनऊच्या महापौर संयुक्ता भाटिया यांनी महापालिकेचा गोमती नदीच्या किनारी लक्ष्मणाचा १५१ फुटी पुतळा उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले आहे. भाटिया व अन्य काही नेत्यांनी लक्ष्मणाचे प्राचीन लखनऊशी असलेले नाते उद्धृत करून हा वारसा पुन्हा जतन करण्याचा मनोदयही व्यक्त केला आहे.

लोकांच्या मनात लक्ष्मणाचे नाव या शहराशी जोडले गेले असले तरी एका ग्रंथामुळे शहराच्याच नामांतराची कल्पना रुजायला लागली आहे. चार वर्षांपूर्वी भाजपा नेते लालजी टंडन यांनी ‘अनकहा लखनऊ’ नावाचे पुस्तक लिहून या शहराची भगवान लक्ष्मणाशी असलेली नाळ तुटल्याबद्दल खंत व्यक्त केली. काळाच्या ओघात लक्ष्मण का टीला (लहान टेकडी) विसरला गेला असे टंडन लिहितात. ते म्हणतात, या ऐतिहासिक टेकडीची आजची एकमेव खूण म्हणजे टीलेवाली मस्जिद, जी औरंगजेबाच्या काळात बांधली गेली.

या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर टीलेवाली मस्जिदजवळ भगवान लक्ष्मणाचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव भाजपाच्या नगरसेवकांनी मांडला. पाठोपाठ भाजपाचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी म्हटले की, सगळ्यांची मान्यता असेल तर लखनऊचे नामकरण लक्ष्मणपुरी करण्यात काही नुकसान नाही.

टंडन यांचे पुस्तक

टंडन लिहितात, जुने लखनऊ टील्याच्या जवळपास वसलेले होते. “मुघलांचा काळ असो, औरंगजेबाच्या काळात मशिद बांधली गेली असो, मोहम्मद अली शाहची मजार असो, नौबत खाना असो, इतरा बाग असो, अलविदा ग्राउंड असो, इंग्रजांचा काळ असो, नवाबांचा काळ असो किंवा स्वातंत्र्यानंतरची काही दशके असोत लक्ष्मण टीला नेहमीच लक्ष्मण टीला म्हणून ओळखला जायचा,” टंडन यांनी लिहिले आहे. आता लक्ष्मण टील्याचं नाव पूर्णपणे पुसले गेले असून आता हे ठिकाण टीलेवाली मशिदीच्या नावे ओळखले जाते अशी खंत टंडन यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे लिहितात, या शहराचे नाव लखमावती होते, जे लक्ष्मणपूर झाले, जे नंतर लखनावती होऊन शेवटी लखनऊ झाले. रामाने हे शहर लक्ष्मणाला दिले होते, आणि औरंगजेबाने ऐतिहासिक टेकडीवर टीलेवाली मस्जिद बांधल्याचा दावा टंडन यांनी केला आहे. पुरातन वस्तुंसाठी या टेकडीचे उत्खनन करायला हवे असे मतही टंडन यांनी मांडले आहे.

लक्ष्मणाच्या पुतळ्याची मागणी

भाजपाचे नगरसेवक रजनीश गुप्ता व राम कृष्ण यादव यांनी जून २०१८ मध्ये प्राचीन लक्ष्मण की टीलेजवळ लक्ष्मणाचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे ठेवला. मुस्लीम धर्मगुरू व गैर भाजपा पक्षांनी या प्रस्तावास विरोध केला. या पुतळ्याच्या उभारणीसाठी निधीही मंजूर झाला परंतु करोना महामारीमध्ये २०२० पासून हा विषय अडगळीत गेला.

काँग्रेसचे प्रवक्ते मुकेश सिंह चौहान, जे तत्कालिन नगरसेवक होते, ते म्हणतात, “आम्ही या पुतळ्याला विरोधा केला कारण गोमती नदी किनारी आधीच लक्ष्मणाचा एक पुतळा आहे ज्याची देखभालही धड होत नाहीये, मग नव्या पुतळ्याची गरज काय?” रस्त्याच्या कडेला पुतळे उभारायचे, ज्यांचा नीट आदरही राखला जाऊ शकत नाही, हे सनातन हिंदू धर्माला अपेक्षित नसल्याचे मतही चौहान यांनी मांडले आहे.

महापौर भाटिया यांनी हनुमान मंदिराजवळ झुलेवाला वाटिका येथे लक्ष्मणाचा १५१ फूट उंच पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून १५ कोटी रुपयांची तरतूदही केल्याचे भाटियांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेससी बोलताना भाटिया म्हणाल्या लखनऊची मूळ ओळख लक्ष्मणपुरी होती, प्रस्तावित स्मारक हे प्रेरणा स्थळ असेल आणि प्रभू रामाच्या अयोध्यापुरीचे प्रवेशद्वार असेल.

इतिहासकाराचे मत काय?

पुराना लखनऊ या पुस्तकात इतिहासकार अब्दुल हलिम शरार म्हणतात, हे शहर नक्की कोणी उभारले आणि हे नाव कसे पडले याबाबत निश्चित असे कोणीच सांगू शकत नाही, पण लोककथा व काही उपलब्धींचा विचार केला तर जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासातून परत आले तेव्हा त्यांनी ही जागा बंधू लक्ष्मणाला दिली. टील्याच्या किंवा टेकडीच्या आजुबाजुला गाव वसवण्यात आले ज्याला लक्ष्मणपूर म्हटले जाऊ लागले आणि टेकडी लक्ष्मण का टीला म्हणून लोकप्रिय झाल्याचे शरार लिहितात.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained lucknow the history of the name and the laxman connection
First published on: 19-05-2022 at 12:17 IST