-गौरव मुठे

आघाडीचे डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागांत गुरुवारच्या व्यवहारात मोठी घसरण दिसून आली. पेटीएमचा समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून त्यापुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पेटीमचा समभाग सध्या कंपनीने गुंतवणूकदारांना प्रारंभिक समभाग विक्रीच्या वेळी दिलेल्या किमतीपेक्षा म्हणजेच इश्यू प्राइसपेक्षा खाली गडगडला आहे आणि हा समभाग याहून अधिक तळ गाठेल, असे विश्लेषकांचे कयास आहेत. नेमके या आणि बाजारात नव्याने पदार्पण करणाऱ्या नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांच्या समभागांतील गुंतवणूकदारांना आणखी वाईट दिवस पाहावे लागण्याची शक्यता आहे. हे नेमके कशामुळे घडत आहे, त्याचे हे विश्लेषण…

uran, fishers, financial crisis
मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?

पेटीएमच्या समभागात गुरुवारच्या घसरणीचे कारण काय? –

पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सच्या समभागात गुरुवारी जवळपास ८.८ टक्क्यांनी घसरण दिसून आली. परिणामी मुंबई शेअर बाजारात कंपनीचे बाजारमूल्य ३५,२७१ कोटी रुपयांवर गडगडले. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात हा समभाग ६.४३ टक्क्यांनी म्हणजेच ३७.२५ रुपयांनी घसरून ५४२.३५ रुपयांवर स्थिरावला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील अलिबाबा समूहाने बाजारातील व्यवहारामध्ये वन९७ कम्युनिकेशन्समधील ३.१ टक्के हिस्सेदारी म्हणजेच सुमारे दोन कोटी समभाग ५३६.२५ रुपये प्रति समभाग या किमतीला गुरुवारी एकगठ्ठा विकले. सप्टेंबर २०२२ च्या आकडेवारीनुसार, अलिबाबा समूहाची पेटीएममध्ये ६.२६ टक्के हिस्सेदारी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये जपानस्थित सॉफ्टबँकने खुल्या बाजारात एकगठ्ठा (ब्लॉक डील) समभाग विक्रीतून कंपनीतील ४.५ टक्के हिस्सेदारी सुमारे १,६२७ कोटी रुपयांच्या मोबदल्यात कमी केली. त्यावेळीदेखील कंपनीच्या समभागात ११ टक्क्यांची घसरण झाली होती. सॉफ्टबँक आणि पेटीएमसारख्या बड्या गुंतवणूकदारांनी पाठ फिरवून समभाग विक्रीचे पाऊल टाकल्याचा एकंदर गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक संदेश गेला. त्यातून एकूण समभाग घसरणीला आणखी हातभार लावला.

बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून समभागात किती घसरण? –

वर्ष २०२१ मध्ये भांडवली बाजारातील पेटीएम’च्या समभागांचे पदार्पण गुंतवणूकदारांसाठी स्वप्नभंग ठरले. मोठ्या फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना सूचिबद्धतेच्या दिवशी कंपनीचा समभाग २७ टक्क्य़ांनी गडगडल्याचे पाहावे लागले होते. पदार्पणाच्या दिवशी एक लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल असलेल्या कंपनीचे बाजारभांडवल सध्या ३५,००० कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. प्रारंभिक भागविक्रीतून प्रति समभाग २,१५० रुपये किमतीला हा समभाग गुंतवणूकदारांनी मिळविला होता. मात्र त्यात निरंतर घसरण सुरू असून गुरुवारी झालेली घसरण ही २२ नोव्हेंबरनंतरची सर्वात मोठी घसरण आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये त्या समयीच्या सर्वात मोठ्या आकाराच्या भागविक्रीसह भांडवली बाजारात प्रवेश केलेल्या ‘पेटीएम’च्या समभागाने गुंतवणूकदारांना ७५ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. कारण वर्षभराच्या आतच पेटीएमचा समभाग ५०० रुपयांच्या खाली घसरला होता. त्यामुळे पेटीएमच्या समभागांची कामगिरी जगातील अन्य कंपन्यांच्या भव्य प्रारंभिक समभाग विक्रीच्या तुलनेत सर्वात सुमार राहिली आहे. सूचिबद्धतेला लार्ज कॅप श्रेणीत असलेला हा समभाग आता निरंतर घसरणीने बाजार भांडवल रोडावल्याने मिड कॅप श्रेणीत अवनत झाला आहे.

पडझडीतून सावरण्यासाठी कंपनीची योजना काय? –

सतत सुरू असलेली घसरण थांबविण्यासाठी आणि प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून मोठ्या किमतीला समभाग मिळविलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी पेटीएमने एकूण ८५० कोटी रुपये मूल्याच्या समभागांच्या पुनर्खरेदीला (बायबॅक) मान्यता दिली आहे. या माध्यमातून खुल्या बाजारातून ८१० रुपये प्रति समभाग या किमतीला विद्यमान गुंतवणूकदारांकडून समभागाची खरेदी करण्यात येणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम समभागांच्या कामगिरीवर दिसून आला. गेल्या वर्षातील २६ डिसेंबरपासून मागील १४ पैकी १२ सत्रांमध्ये समभाग सकारात्मक पातळीवर व्यवहार करत होता. या कालावधीत समभाग १५ टक्क्यांनी वधारला.

कंपनीची व्यवसायातील कामगिरी कशी? –

कंपनीच्या अनेकानेक व्यवसायांपैकी, कर्ज व्यवसायात चांगली वाढ दिसून आली असून, डिसेंबर महिन्यांत ३,६६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. त्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत ३३० टक्क्यांनी वाढ साधली आहे. तर सरलेल्या डिसेंबर तिमाहीत कर्ज वितरणात ३५७ टक्क्यांची वाढ होत ९,९५८ कोटी रुपये कर्ज वितरित केले. ॲपच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची संख्या मासिक आधारावर डिसेंबरमध्ये ३२ टक्क्यांनी वाढून ८.५ कोटींवर पोहोचली आहे. जी एका वर्षापूर्वी ६.५ कोटी नोंदण्यात आली होती. कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत १० लाख देयक उपकरणे जोडली जोडली असून डिसेंबर २०२२ पर्यंत देयक व्यापाऱ्यांची संख्या ५.८ कोटींवर पोहोचली आहे.

सर्वच तंत्रज्ञान नवउद्यमी कंपन्यासाठी वाईट दिवस –

गेल्या वर्षी (२०२१) भांडवली बाजारातील तेजीचा फायदा घेत, नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी कंपन्यांनी बाजारात मोठ्या जोराशोरात ‘आयपीओ’द्वारे बाजारात प्रवेश केला. त्या आधीच्या वर्षात सूचिबद्ध झालेल्या कंपन्यांनी पदार्पणालाच मोठा परतावा दिला होता. मात्र विशेषत: रशिया-युक्रेन युद्धापश्चात, जागतिक पातळीवर अमेरिकी बाजारात फेसबुकसह इतर तंत्रज्ञानाधारित कंपन्यांच्या समभागांत मोठी घसरण झाली आहे. त्याचेच पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटले आहेत. परिणामी पेटीएम, पॉलिसीबझार, नायका, झोमॅटो, कारट्रेड टेक या कंपन्यांच्या समभागांतील घसरण देखील वाढली. याचबरोबर वाढता भू-राजकीय तणाव, जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून देण्यात आलेले व्याजदर वाढीचे संकेत यामुळे परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत भांडवली बाजारातून मोठ्या प्रमाणावर निधीचे निर्गमन सुरू झाले आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला असून नफावसुलीला प्राधान्य दिले आहे आणि जगभरातील भांडवली बाजारांमध्ये चलनवाढीच्या वाढत्या दबावामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. किंबहुना या कंपन्यांचे स्थापनेपासून असलेले गुंतवणूकदारही पाठ फिरवून त्यांचा हिस्सा विकत आहेत. या सर्व घटकांचा तूर्त अस्थिर व्यवसाय असलेल्या या नव्या पिढीच्या कंपन्यांना जबर फटका बसत आहे.
gaurav.muthe@expressindia.com