scorecardresearch

विश्लेषण : राज ठाकरेंनी कौतुक केलेले सलीम शेख कोण आहेत ?

सत्तेची फळे चाखल्यानंतर अखेरच्या टप्प्यात अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला. मनसेच्या अडचणीच्या काळात सलीम मामा पक्षासमवेत कायम आहेत.

अनिकेत साठे

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तर सभेत नाशिकचे पदाधिकारी सलीम मामा शेख यांचा खरा भारतीय मुसलमान म्हणून उल्लेख करण्यात आला. मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत त्यांनी राज यांच्या भूमिकेचे स्वधर्मीयांचा विरोध पत्करून समर्थन केले. खुद्द राज यांनी प्रशस्तीपत्रक दिल्याने प्रकाशझोतात आलेल्या सलीम मामांची ही ओळख.

सलीम शेख यांचा राजकारणाशी कसा संबंध आला ?

सलीम शेख हे मूळचे मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) गावचे. रोजगाराच्या निमित्ताने नाशिकला आले. हॉटेल आणि बांधकाम व्यवसाय सांभाळत सामाजिक उपक्रमांतून त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. प्रारंभी माकपकडे ते आकर्षित झाले. त्यानंतर राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक बनले. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना मनसेच्या लाटेत २०१२ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गवळींना पराभूत करुन ते जायंट किलर ठरले होते. मनसेच्या ताब्यात आलेली नाशिक ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली. तेव्हा मामांना स्थायी सभापती पदावर संधी मिळाली होती. पुढील निवडणुकीत मनसेला सत्ता गमवावी लागली. महानगरपालिकेत पक्षाचे गटनेते म्हणून त्यांनी काम केले. भाजपची एकहाती सत्ता असताना मनसेने या काळात भाजपला पूरक भूमिका घेऊन काही पदे पदरात पाडून घेतली.

स्थानिक राजकीय समीकरणे कशी बदलली ?

सातपूर या कामगारबहुल भागाचे सलीम शेख प्रतिनिधीत्व करतात. ते मामा म्हणूनच अधिक प्रसिध्द आहेत. प्रभागात मुस्लिमधर्मिय मतदारांची संख्या फारशी नाही. ९५ टक्के मराठी, हिंदुबहूल मतदार असलेल्या भागातून ते निवडून येत असल्याकडे राज ठाकरे यांनी सभेतही लक्ष वेधले होते. अर्थात, यामागे मामांनी मतदारांशी जोपासलेले आपुलकीचे संबंध आहेत. नागरिकांच्या महापालिकेशी निगडीत समस्या, तक्रारी तत्परतेने सोडविण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची फळी कार्यरत ठेवली आहे. प्रभागात एखाद्याच्या घरी कुणाचे निधन झाले की, शववाहिका उपलब्ध करणे, अंत्यविधीची तयारी करून देण्यापासून ते संबंधितांच्या घरी आलेल्या पाहुण्यांची भोजन व्यवस्था करण्यापर्यंतची जबाबदारी सांभाळतात. कामगार पाल्यांसाठी शिकवणीची व्यवस्था, शैक्षणिक साधनांचे वितरण, महापालिका शाळेत भोजनासाठी ताटांची उपलब्धता, अशा उपक्रमांतून ते जनसंपर्क ठेवून आहेत. नवरात्रौत्सव, महिलांची दहिहंडी आदी सणोत्सव साजरा करण्यात सलीम मामा संस्थापक अध्यक्ष असलेल्या नवजवान फ्रेंड्स मंडळाचा पुढाकार असतो.

लोकप्रिय असण्याचे कारण काय ?

सातपूर भागात सलीम मामांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून राजकारणात जम बसवल्याचे लक्षात येते. औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी अवघ्या १० रुपयांत पुरी-भाजी देण्याचा उपक्रम त्यांनी प्रदीर्घ काळ राबविला. खूर आणि शिंग वाढल्यावर मोकाट जनावरांना वेदना होतात. जनावरांना नीट चालता येत नाही. हे लक्षात घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांनी जनावरांवर वेळोवेळी उपचार, खुराला नाल बसवण्याचे काम केले. शाळा परिसरात मुलींना टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते, तेव्हा मामांनी सुरक्षारक्षक उभे केले. पोलिसांची मदत घेऊन टवाळखोरांना चाप लावला. गरीब रुग्णांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. त्यांच्या सामाजिक कामांची दखल अनेक संस्थांनी घेतली. नाशिक सिटीझन्स फोरमचा कार्यक्षम नगरसेवक पुरस्कारासह मातृगौरव पुरस्कार, लेवा पाटीदार समाज पुरस्कार आणि गोदावरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अडचणीच्या काळात पक्षाला साथ ?

नाशिकच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदा महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकला होता. सत्तेची फळे चाखल्यानंतर अखेरच्या टप्प्यात अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला. माजी आमदार वसंत गितेंसह अनेक पदाधिकारी आणि तब्बल २८ नगरसेवक मनसेला सोडून गेले. महापालिकेतील ४० नगरसेवकांची संख्या अवघ्या पाचवर आली. पक्षांतर्गत सुंदोपसुंदीत २०१७ मध्ये मनसेने सत्ता गमावली. केवळ सहा नगरसेवक निवडून आले होते. मनसेच्या अडचणीच्या काळात सलीम मामा पक्षासमवेत कायम आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained raj thackeray appreciates is salim sheikh who is salim sheikh print exp asj