हृषिकेश देशपांडे

राज्यसभा निवडणुकासाठी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर तीन राज्यांतील निकाल भाजपसाठी काहीसे संमिश्र स्वरूपाचे ठरले. राजस्थानात तीनही जागा जिंकता आल्यामुळे काँग्रेसला थोडा तरी दिलासा मिळाला. कर्नाटक आणि हरयाणात मात्र भाजपचे वर्चस्व अधोरेखित झाले.

राजस्थानचे नायक गेहलोतच

राजस्थानमध्ये राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा तिसरा उमेदवार पराभूत झाला, तर अशोक गेहलोत यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत विचार करावा लागेल असे वक्तव्य दिल्लीत एका काँग्रेस नेत्याने केले होते. त्यावरून ही निवडणूक म्हणजे गेहलोत यांच्यासाठी किती महत्त्वाची होती हे स्पष्टच होते. राज्यात सचिन पायलट यांचे १२ ते १३ समर्थक आमदार सातत्याने नेतृत्वबदलासाठी आग्रही आहेत. पायलट यांनी बंडही केले, मात्र अपेक्षित आमदार जमले नाहीत म्हणून तलवार म्यान केली होती. आता राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिलेले राज्याबाहेरील तीनही उमेदवार निवडून आणण्यात गेहलोत यांना यश आले. इतकेच काय भाजपच्या एका आमदाराचेही मत त्यांनी फोडले. भाजपच्या शोभाराणी कुशवा यांनी काँग्रेस उमेदवाला मत दिले. याखेरीज बीटीपीच्या दोन आमदारांनी पक्षादेश डावलून काँग्रेसला साथ दिली. त्यामुळे माध्यम उद्योजक सुभाषचंद्र गोयल यांचा पराभव  झाला. या  घडामोडी पाहता राज्यातील आमदारांवर भक्कम पकड असल्याचा संदेश गेहलोत यांनी काँग्रेस पक्ष नेतृत्त्वाला दिला.

पण हरयाणात काँग्रेस धक्का

राजस्थानमध्ये काँग्रेसने जागा राखल्या मात्र, हरयाणात ज्येष्ठ नेते तसेच विरोधी पक्षनेते भुपेंद्रसिंह हुडा यांना आमदार सांभाळणे जमले नाही. काँग्रेस श्रेष्ठींनी दिलेले अजय माकन हे दुसऱ्या पसंतीच्या मतांवर पराभूत झाले. विविध वृत्तवाहिन्यांची मालकी असलेले कार्तिकेय शर्मा हे चुरशीच्या लढतीत विजयी झाले. त्यांना भाजप तसेच दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्ष आणि काही अपक्षांनी पाठिंबा दिला होता. राज्यात हुडा तसेच कुमारी शैलजा असे दोन गट काँग्रेसमध्ये मानले जातात. राज्यात विजयासाठी प्रथम पसंतीच्या ३१ मतांची गरज होती. माकन यांना २९ मते मिळाली. काँग्रेसला दोन मतांपैकी कुलदीप बिश्नोई यांचे मत मिळाले नाही. तर एक मत बाद झाले.  कुलदीप हे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मिळाले नसल्याने ते नाराज आहेत. भाजपचे कृष्णलाल पन्वर हे प्रथम पसंतीची ३६ मते मिळवत विजयी झाले. तर शर्मा यांना प्रथम पसंतीची २३ मते मिळाली. भाजपने आपली दुसऱ्या पसंतीची मते शर्मा यांच्याकडे वळवल्याने माकन यांचा निसटता पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीत पसंतीक्रम कसा वळवला जातो यावरही चित्र अवलंबून असते. भाजपचे रणनीतीकार त्या खेळात यशस्वी ठरले. या घडामोडींत भुपेंद्र हुडा यांच्या नेतृत्वाबाबत पक्षांतर्गत विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करणार हे आता उघड आहे. त्यामुळे हरयाणा काँग्रेसमधील गटबाजी  वाढण्याची चिन्हे आहेत. हुडा यांचे पक्षांतर्गत विरोधक उचल खाणार यात शंका नाही.

कर्नाटकमध्येही कमळ

कर्नाटकमध्ये भाजपने तिसरी जागा निवडून आणली ती धर्मनिरपेक्ष जनता दलातील फुटीमुळे. येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेत अभिनेते जग्गेश यांचा विजय अपेक्षितच होता. मात्र विधान परिषद सदस्य तसेच माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय लेहरसिंग सिरोया यांनीही पक्षाला तिसरी जागा मिळवून दिली. धर्मनिरपेक्ष जनता दल तसेच अपक्षाचे मत फुटले परिणामी जनता दलाचे डी.कुपेद्र रेड्डी यांना तीस मते मिळाली. तर सिरोया यांना ३३ मते मिळाली. काँग्रेसचे जयराम रमेश प्रथम पसंतीच्या मतांवर विजयी झाले. मात्र काँग्रेसचे दुसरे उमेदवार मन्सूर अली खान यांना २५ मते मिळाली. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी संख्याबळ नसताना दुसरी जागा लढवली होती. जनता दलाला पाठिंबा देण्यास काँग्रेसने नकार दिला होता. अन्यथा जनता दलाची एक जागा सहज आली असती.  येथे विजयासाठी ४५ मते गरजेची होती. मात्र येथेही दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरली. या निकालाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना स्थान भक्कम झाले आहे. पुढील महिन्यात त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीला वर्ष पूर्ण होईल. तिसरी जागा भाजपने जिंकल्याने पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करण्यात बोम्मई यांना यश आले आहे.

दृष्टिक्षेपात निकाल…

राज्यसभेच्या एकूण निकालात संख्याबळापेक्षा तीन जागा जादा आणण्यात भाजपला यश आले आहे. त्यात कर्नाटक, हरयाणा बरोबरच महाराष्ट्रात धनंजय महाडीक यांनी तिसरी जागा खेचून आणली आहे. या निकालांचे वर्णन करता राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेहलोतांची जादू कायम आहे. हरयाणात मात्र भुपेंद्र हुडांना पक्ष सांभाळण्यात यश मिळालेले नाही, असे दिसते. याशिवाय भाजपच्या वाढत्या ताकदीला आव्हान देणे विरोधकांच्या एकजुटीशिवाय शक्य नाही, हेही स्पष्ट झाले आहे.