संकेत कुलकर्णी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील चार वेळचा विजेता संघ चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. चेन्नईला सुरुवातीच्या आठपैकी केवळ दोन सामनेच जिंकता आले. ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या रवींद्र जडेजाला कर्णधार आणि खेळाडू म्हणूनही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याने तडकाफडकी चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून उर्वरित हंगामात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या संघाचे नेतृत्व करेल. मात्र, जडेजाने अचानक हे पाऊल का उचलले आणि चेन्नईला नेतृत्वबदल का करावा लागला, याचा घेतलेला आढावा.   

जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईने कशी कामगिरी केली?

धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने गेल्या हंगामात ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले होते. परंतु यंदाच्या हंगामापूर्वी धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जागी अष्टपैलू जडेजाची कर्णधारपदी निवड करण्यात आली. जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला आठ सामन्यांत केवळ दोन विजय (मुंबई आणि बंगळूरु यांच्याविरुद्ध) मिळवता आले. याउलट कोलकता, लखनऊ, हैदराबाद, गुजरात आणि पंजाब (दोनदा) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईला फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत सांघिक कामगिरी करण्यात अपयश आले. तसेच संघाचे नेतृत्व जडेजाकडे असले, तरी बरेचदा मैदानात निर्णय धोनीच घेत असल्याचे दिसले.

नेतृत्वाचा जडेजाच्या वैयक्तिक कामगिरीवर कसा परिणाम झाला?

जडेजाची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणना होते. जडेजाने ‘आयपीएल’मध्ये चेन्नईकडून आतापर्यंत एकूण १४९ सामने खेळले असून त्यात १५२३ धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत त्याच्या नावावर ११० बळी आहेत. मागील वर्षी जडेजाने १४५.५१च्या धावगतीने २२७ धावा करतानाच १३ गडीही बाद केले होते. यंदाच्या हंगामात मात्र कर्णधारपदाच्या दडपणामुळे जडेजाची कामगिरी खालावली. त्याला आठ सामन्यांत केवळ ११२ धावा करता आल्या आणि डावखुऱ्या फिरकीने तो केवळ पाच बळीच मिळवू शकला.

चेन्नईला धोनीच्या छायेतून बाहेर पडण्याची गरज?

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने चार वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवले आहे. चेन्नईच्या यशात धोनीचा मोलाचा वाटा आहे. मात्र, चेन्नईचा संघ म्हणजे फक्त धोनीच असे काहीसे चित्र आहे का, ही शंका पुन्हा एकदा खरी वाटू लागली आहे. कर्णधार म्हणून धोनीने ‘आयपीएल’मध्ये यश संपादन केलेच, शिवाय भारताचे नेतृत्व करताना दोन विश्वचषक आणि एक चॅम्पियन्स करंडक स्पर्धाही जिंकली. भारतीय संघाला विराट कोहली आणि नंतर रोहित शर्माच्या रूपात धोनीचा उत्तराधिकारी मिळाला. मात्र, चेन्नईला अजूनही पुढचा कर्णधार कोण, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकलेले नाही. ४० वर्षीय धोनी कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यावर असून पुढील हंगामात तो खेळेल की नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे.

पुढील हंगामात धोनीला पर्याय कोण?

चेन्नई संघात आपला उत्तराधिकारी म्हणून धोनीनेच जडेजाची निवड केली होती. मात्र, त्याचा हा निर्णय योग्य ठरला नाही. त्यामुळे पुढील हंगामात जर धोनी खेळला नाही, तर चेन्नईला पुन्हा नव्या कर्णधाराची निवड करावी लागेल. त्यांच्याकडे ड्वेन ब्राव्हो, मोईन अली, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा या अनुभवी खेळाडूंचे पर्याय आहेत. परंतु ब्राव्हो वगळता यापैकी कोणालाही कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. तसेच हे दीर्घकालीन पर्याय होणार नाहीत. युवा खेळाडूंमध्ये दीपक चहर, ऋतुराज गायकवाड यांचा विचार केला जाऊ शकेल. मात्र, त्यांच्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यापूर्वी चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला बराच विचार करावा लागू शकेल.