अनिश पाटील
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे या महिन्यात निवृत्त होत असल्यामुळे आता मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा कोणावर सोपवली जाते, याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सरकारचे अस्तित्वच धोक्यात आल्याने मुंबई पोलीस आयुक्तपदाची सर्व गणिते बदलली आहेत. त्यात आगामी काळात मुंबई महापालिकेची निवडणूक व सत्तासंघर्ष लक्षात घेता मुंबई पोलीस आयुक्तपदावरील नियुक्ती फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आता या बदलत्या परिस्थितीत मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त कोण होतील याकडेच सर्वाचे लक्ष लागले आहे.

येणाऱ्या काळात मुंबई पोलीस आयुक्तपद महत्त्वाचे का?

New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. याशिवाय राज्याचे सत्ताकेंद्रही आहे. मुंबई पोलीस आयुक्तपद हे राज्यातील सर्वात मानाचे पद समजले जाते. त्यामुळे या पदाच्या नियुक्तीबाबत राजकीय हस्तक्षेपाचे आरोप नियमित केले जातात. आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये हे पद मिळवण्यासाठी नेहमीच चढाओढ पाहायला मिळते. त्यात येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक असल्यामुळे संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर ज्या पक्षाचे सरकार असेल, तो पक्ष आपल्या मर्जीतील पोलीस आयुक्त आणण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई पोलीस आयुक्तपदाची नियुक्ती राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनेही फार महत्त्वाची ठरणार आहे.

सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना मुदतवाढ मिळणार का?

मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे गुरुवारी (ता. ३०जून) सेवानिवृत्त होत आहेत. पण त्यांना सेवेत मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच धूसर आहे. पोलीस आयुक्त हे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्यामुळे त्यांच्या सेवा कालावधीत वाढ करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या परवानगीची आवश्यकता असते. पण संजय पांडे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातील नेत्यांची नाराजी लक्षात घेता त्यांचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता फार कमी आहे. याशिवाय त्यांना मुदतवाढ मिळण्यास अनेक तांत्रिक बाबीही अडचणीच्या आहेत. पांडे यांना केंद्राकडून पाठिंबा नसल्यामुळे त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. यापूर्वी दत्ता पडसलगीकर व संजय बर्वे या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता.

पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होऊ शकते?

संजय पांडे यांच्या निवृत्तीनंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विवेक फणसळकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, सदानंद दाते, बी. के. उपाध्याय ही नावे चर्चेत होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ज्याप्रमाणे राजकीय समीकरणे बदलली आहेत, त्याचप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तपदाची समीकरणेही बदलली आहेत. या पदासाठी ठाण्याचे पोलीस आयु्क्त जयजीत सिंह यांचे नाव सर्वात आघाडीवर मानले जात होते. पण जयजीत सिंह यांची शिंदे यांच्याशी असलेली जवळीक त्यांच्या विरोधात जाऊ शकते, अशा परिस्थितीत राज्य सरकार विवेक फणसळकर, रजनीश सेठ, दाते यांच्यापैकी पर्याय निवडू शकते.

पद रिक्त राहिल्यास काय होऊ शकते ?

चालू राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस आयुक्तपदी कोणाची नेमणूक केली नाही तर अशा परिस्थितीत मुंबईतील वरिष्ठ पोलीस सहआयुक्ताला पोलीस आयुक्ताचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागू शकतो. पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील अथवा वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त राजवर्धन यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत सेवाज्येष्ठता पाहता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडेही मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार दिला जाण्याची शक्यता आहे.

राज्यात सत्तांतर झाले तर काय होईल?

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले तर मुंबई पोलीस आयुक्तपदाची समीकरणेही बदलतील. अशा परिस्थितीत भाजप व शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यास संभाव्य पोलीस आयुक्तपदाच्या संभाव्य नावांमध्ये बदल होऊ शकतो. अशा परिस्थितीत अनपेक्षित अधिकाऱ्याचीही या पदी नियुक्ती होऊ शकते. तसेच मुंबई पोलीस आयुक्तपद अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे ठेवायचे की ते पोलीस महासंचालक दर्जाचे ठेवावे याबाबतचा निर्णय सत्तांतर झाल्यास नव्या सरकारला घ्यावा लागेल. अशा परिस्थितीतही सर्व समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदाला काटेरी मुकुट का म्हटले जाते?

 मुंबई पोलीस आयुक्तपद हे राज्यातील सर्वात मानाचे पद समजले जाते. त्यामुळे आयुक्तांच्या नियुक्तीवर राजकीय हस्तक्षेपाचे आरोप होत असतात. म्हणूनच ही खुर्ची जेवढी मानाची आहे, तेवढीच काटेरी आहे. मुंबई पोलीस आयुक्ताला राज्य सरकारबरोबर नेहमी जुळवून घ्यावे लागते. पोलीस आयुक्तपदाबाबतचा लहानसहान वादही राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरतो. तसेच त्यांच्यावरील आरोपही सत्तेच्या दरबारी लवकर पोहोचतात. त्यामुळे काही दिग्गज अधिकाऱ्यांना तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना अंबानी स्फोटक प्रकरण भोवले. त्यांची मुंबई या पदावरून तडकफडकी गृहरक्षक दलात बदली  करण्यात आली. पुढे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. सुपर कॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश मारिया यांनाही शीना बोरा प्रकरणानंतर तडकाफडकी या पदावरून हटवण्यात आले. याशिवाय डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अरूप पटनायक यांनाही आझाद मैदान दंगलीनंतर बदलीला सामोरे जावे लागले होते. पण ही यादी तेवढीच नाही. १९९२च्या दंगलीनंतर तत्कालीन पोलीस आयुक्तांची बदली करून सामरा यांना आणण्यात आले होते. पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात सर्वाधिक अधिकाऱ्यांचा बळी घेतला तो तेलगी प्रकरणाने. तेलगी प्रकरण भोवलेले आर. एस. शर्मा त्या वेळी महासंचालकपदाच्या स्पर्धेत होते. पण या गैरव्यवहारामुळे त्यांचे स्वप्न धुळीला मिळाले.

    anish.patil@expressindia.com