उत्तर कोरियाने प्रथमच कबूल केले आहे की देशात करोना केवळ पसरलेलाच नाही, तर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी उत्तर कोरियातील परिस्थितीला ‘भयानक संकट’ असे म्हटले आहे. उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी तापामुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक करोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. उत्तर कोरियातील आरोग्य यंत्रणा या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम नाही, शिवाय करोना प्रतिबंधात्मक लसीकरण आणि चाचण्याच्या अभावामुळे देखील उत्तर कोरियामधील करोनाचा दिवसेंदिवस वाढता प्रकोप हा मोठ्या आरोग्य संकटास कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.

उत्तर कोरियात तापाची लक्षणं आढळणाऱ्या नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. यात काही लोकांना ओमायक्रॉन करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किंम जोंग उन यांनी संपूर्ण देशात निर्बंध लादले आहेत. कामाची ठिकाणीही पाळायचे नियम जारी करून संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी सैन्यावर आणि शस्त्रास्त्रांवर प्रचंड खर्च करणाऱ्या उत्तर कोरियात आरोग्य यंत्रणा अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे कंबरडे मोडलेल्या आरोग्य यंत्रणेच्या आधारे उत्तर कोरिया करोनाचा सामना कसा करणार याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे.

कमकुवत आरोग्ययंत्रणा –

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तापामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्या मृत्यूंची गणना आतापर्यंत उत्तर कोरियाच्या आरोग्य विभागाने कोविड मृत्यू म्हणून सुरू केलेली नाही. दुसरीकडे, उत्तर कोरियातील रुग्णालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार , किम जोंग उन यांनी देशातील या परिस्थितीचे वर्णन ‘महासंकट’ असे केले आहे.

लसीकरणाचा अभाव –

करोनाची सुरुवात झाली तेव्हाच दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्यापासून देशात करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही असा उत्तर कोरियाने याआधी दावा केला होता. महत्वाचे म्हणजे उत्तर कोरियात एकही व्यक्तीचं लसीकरण झालेलं नाही. तसेच देशातील आरोग्यव्यवस्था करोनाशी लढण्याइतकी सक्षमदेखील नाही.

राजधानी प्योंगयोंगमध्ये लॉकडाउन –

उत्तर कोरियाच्या अधिकृत मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी प्योंगयोंगमध्ये ताप असलेल्या अनेक लोकांची कोविड चाचणी करण्यात आली आहे आणि तेही कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु, सरकारी वृत्तपत्राने किती लोकांची चाचणी केली आणि किती लोकांना कोविडची लागण झाल्याचे सांगितले नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तर कोरियामध्ये कोविडमुळे केवळ एका मृत्यूची अधिकृत पुष्टी झाली आहे आणि बुधवारी पहिल्यांदाच किम जोंग उन यांनी देशात कोविडचा प्रसार झाल्याची कबुली दिली. राजधानी प्योंगयोंगमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे आणि माध्यमांनी म्हटले आहे की देशात आपत्कालीन स्तरावर साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.