हृषिकेश देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या २४ सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. गरज भासल्यास १७ ऑक्टोबरला मतदान, तर १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध केरळमधील थिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे. असे झाले तर पक्षाध्यक्षपदासाठी २२ वर्षांनंतर निवडणूक होईल. राजस्थान तसेच छत्तीसगढ या दोनच राज्यांमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. देशपातळीवरही पक्षाची स्थिती तितकीशी चांगली नाही. त्यामुळे नव्या अध्यक्षांपुढे अनेक आव्हाने असतील.

थरूर यांच्या भेटीने चर्चा

शशी थरूर यांनी सोमवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. परदेशातून सोनिया शुक्रवारी परतल्या. त्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट. या भेटीनंतर अध्यक्षपदाच्या चर्चेला तोंड फुटले. अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. मात्र सोनियांनी थरूर यांना ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होईल अशी ग्वाही दिली. तसेच आपला कोणालाही पाठिंबा नसेल असे सूतोवाच केल्याचे माध्यमांनी नमूद केले आहे. ते पाहता ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रासह किमान सात ते आठ प्रदेश काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावे म्हणून ठराव संमत केले आहेत. मात्र राहुल यासाठी राजी नाहीत अशी चर्चा आहे. तसे झाले तर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीकडे काँग्रेसची धुरा १९९८ नंतर येईल. सोनिया गांधी या ९८मध्ये पक्षाध्यक्ष झाल्या. १९७८ नंतर अध्यक्षपद गांधी कुटुंबातील व्यक्तीकडेच आहेत. अपवाद फक्त ९२ ते ९८ या कालावधीचा आहे. यावेळी पी.व्ही.नरसिंह राव तसेच सीताराम केसरी यांच्याकडे काँग्रेसची सूत्रे होती.

हेही वाचा – विश्लेषण : प्रताप सरनाईक यांना ‘ईडी’ चौकशीतून दिलासा कसा मिळाला?

उत्तम वक्ता, इंग्रजीवर प्रभुत्व…

संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेक वर्षे काम केल्याने थरूर यांचे इंग्रजीवर प्रभुत्व आहे. याखेरीज आंतरराष्ट्रीय घडामोडींची सखोल जाण, साहित्य वर्तुळ तसेच माध्यमस्नेही अशी त्यांची प्रतिमा आहे. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून ते चर्चेत असतात. युवा वर्गाला वक्तृत्वाद्वारे ते आकर्षित करण्याची त्यांची हातोटी आहे. केंद्रात मंत्रीपदाचा त्यांना अनुभव आहे. मात्र व्यापक जनाधार नाही ही उणीव आहे. तसेच हिंदी भाषिक पट्ट्यात ते फारसे परिचित नाहीत. काँग्रेसपुढे उत्तर प्रदेश, बिहार या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये पक्ष वाढविण्याचे आव्हान आहे. अशा वेळी थरूर यांच्यापेक्षा अशोक गेहलोत हे उजवे ठरू शकतात. अर्थात गेहलोत यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र राहुल गांधी अध्यक्षपदापासून दूर राहिल्यास गेहलोत रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

डावपेचांमध्ये वाकबगार गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्रीपद तसेच केंद्रात विविध मंत्रीपदे, पक्ष संघटनेतील अनेक जबाबदाऱ्या सांभाळलेले अशोक गेहलोत राजकाणातील धुरंधर मानले जातात. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्ष वाढविण्यात तसेच आता सरकार सांभाळताना पक्षाला सातत्याने बळ दिले आहे. देशभर काँग्रेसची पडझड होत असताना, राजस्थानचा गड त्यांनी राखला आहे. इतकेच काय पक्षांतर्गत विरोधक म्हणून समजले जाणारे सचिन पायलट यांचे बंड त्यांनी उधळून लावले होते. यात त्यांचा राजकीय चाणाक्षपणा दिसून आला होता. मात्र वयोमानानुसार युवा वर्गाला ते पक्षाकडे आकृष्ट करू शकतील काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

विश्लेषण : अमरिंदर सिंग यांचा भाजपामध्ये प्रवेश, पंजाबच्या राजकारणात काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

स्वाक्षरी मोहीम

उदयपूर येथे १५ मे रोजी जे पक्षाचे चिंतन शिबीर झाले त्यातील घोषणांची अंमलबजावणी करावी यासाठी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत ६५० जणांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाने पक्ष संघटनेत सामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांना सामावून घ्यावे ही चिंतन शिबिरातील घोषणा वास्तवात उतरवण्याची प्रतिज्ञा घ्यावी अशी अपेक्षा या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. थरूर यांनीही याला पाठिंबा दिला आहे. आता राहुल गांधी काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे. अनेक काँग्रेस समित्यांनी राहुल यांच्यासाठी ठराव केले आहेत. मात्र ते अध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीत. तसेच हे ठराव पूर्वनियोजित नाहीत. निष्ठा दाखविण्याचा हा प्रकार आहे असे राहुल यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. तर गांधी कुटुंबीयांच्या संमतीखेरीज हे कसे शक्य आहे, आम्ही सर्व जण काँग्रेसमध्ये दीर्घकाळ आहोत, या गोष्टी कशा चालतात हे आम्हाला माहीत आहेत, अशी प्रतिक्रिया जी-२३ म्हणजेच बंडखोर गटातून देण्यात आली आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी लढत होणार काय, हा प्रश्न आहे. त्यात थरूर विरुद्ध गेहलोत असा सामना रंगणार काय, याचे उत्तर आठवडाभरात मिळेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained shashi tharoor ashok gehlot congress chief print exp sgy
First published on: 21-09-2022 at 07:57 IST