महेश सरलष्कर
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या संगरुर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर गट) प्रमुख सिमरनजीत सिंग मान यांचा विजय लक्षवेधी का ठरला आहे. त्यांच्या विजयामुळे पंजाबमधील विभाजनवादाला नव्याने खतपाणी मिळेल, अशी भीती व्यक्त केली जाते. कारण मान यांनी मागे जाहीरपणे खलिस्तानधार्जिणी भूमिका घेतलेली होती. या निकालावर आणि परिणामांवर एक दृष्टिक्षेप –

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

सिमरनजीत सिंग मान यांचा विजय लक्षवेधी कसा ठरला?

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भगवंत मान यांनी संगरूर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सिमरनजीत यांच्या विजयामुळे आम आदमी पक्षाला (आप) धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. मान यांना २ लाख ५३ हजार १५४ मते मिळाली तर, ‘आप’चे उमेदवार गुरमेल सिंग यांना २ लाख ४७ हजार ३३२ मते मिळाली. मान ५ हजार ८२२ मताधिक्याने विजयी ठरले. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संगरुर लोकसभा मतदारसंघातून २०१४ व २०१९ मध्ये सलग दोनदा विजय मिळवला होता. मुख्यमंत्री मान यांच्या मतदारसंघातील ‘आप’चा पराभव अचिंबत करणारा ठरला आहे.

पण हा विजय पंजाबसाठी धोक्याची घंटा ठरतो का?

पंजाबमध्ये ८०च्या दशकात विभाजनवादी खलिस्तान चळवळ माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने लष्करी कारवाई करून मोडून काढली होती. १९८४मध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात घुसून खलिस्तानवाद्यांचा लष्कराच्या विशेष पथकाने खात्मा केला होता. या ‘ब्लू स्टार’ मोहिमेत खलिस्तानवादी चळवळीला पाठिंबा देणारा जरनैल सिंग भिंद्रनवाले हाही (६ जून) मारला गेला. संगरुरमधून विजयी झालेले सिमरनजीत हे खलिस्तानवादी असून खलिस्तानवाद्यांना त्यांचा अजूनही पाठिंबा आहे. दरवर्षी ६ जूनला सिमरनजीत आणि त्यांचे समर्थक सुवर्ण मंदिरात जमतात व भिंद्रनवाले याच्या समर्थनाच्या घोषणा देतात. दिल्लीच्या वेशीवर वर्षभर झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी समर्थकांनी शिरकाव केल्याची चर्चा होत होती. गेल्या वर्षी २६ जानेवारीला शेतकऱ्यांचे आंदोलन हिंसक बनले. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसक घटनेचे दीप सिद्धू नावाच्या तरुणाने फेसबुकवरून प्रक्षेपण केले होते. या दीप सिद्धूला सिमरनजीत यांची सहानुभूती होती असं सांगितले जाते. पंजाबमध्ये २०१५ मध्ये शिरोमणी अकाली दल व भाजपची सत्ता असताना ‘शरबत खालसा’च्या निमित्ताने (शिखांची द्वैवार्षिक परिषद) शिखांना एकत्र करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे सिमरनजीत यांच्या विजयामुळे खलिस्तानवाद्यांना बळ मिळू नये याची दक्षता ‘आप’ सरकारला घ्यावी लागणार आहे.

हे ही वाचा >> महिन्याभरापूर्वी सत्तेवर आलेल्या ‘आप’चा पोटनिवडणुकीत पराभव

सिमरनजीत यांची पार्श्वभूमी काय?

१९६७मध्ये सिमरनजीत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) दाखल झाले. पण ‘ब्लू स्टार’ मोहिमेचा निषेध म्हणून ते १९८४ मध्ये राजीनामा देऊन पोलीस सेवेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८९ व १९९९ मध्ये ते लोकसभेचे खासदार बनले होते. त्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे. २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांना ‘आप’च्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. सिमरनजीत खासदार बनले तरी एकदाही संसदेत जाऊ शकले नाहीत. तलवार घेऊनच संसदेत प्रवेश करणार या हट्टापायी त्यांना प्रत्यक्ष संसदेच्या कामकाजात सहभागी होता आले नाही. शिखांच्या प्रश्नाबाबत ते सातत्याने आक्रमक भूमिका घेत असतात. यावेळी लोकसभा पोटिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह बादल यांनी मान यांना माघार घेण्याची विनंती केली होती पण, ती मान यांनी धुडकावली.

सिमरनजीत यांच्या विजयाकडे पंजाबमधील ‘आप’ सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे का?

पंजाबमध्ये काँग्रेस वा शिरोमणी अकाली दलाचे सरकार आलटून पालटून सत्तेवर येत असे. ८०च्या दशकानंतर दोन्ही पक्षांच्या सरकारांनी विभाजनवाद्यांना नियंत्रणात ठेवले होते. खलिस्तानवादी चळवळीने डोके वर काढू नये यासाठी केंद्र सरकारही दक्ष असते. यावर्षी पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार सत्तेवर आले असून ‘आप’ला संपूर्ण राज्याचा दर्जा असलेले राज्य चालवण्याचा अनुभव नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांनाही प्रशासनाचा अनुभव नाही. पंजाब हे पाकिस्तानच्या शेजारी असलेले अत्यंत संवेदनशील राज्य असून ‘आप’ची सत्ता आल्यापासून लोकप्रिय गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसारख्या हिंसक घटना घडल्या आहेत. पंजाबमध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘आप’च्या प्रशासनावर नाराज होऊन पंजाबमधील जनतेने सिमरनजीत यांच्यासारख्या खलिस्तानवादी नेत्याला बळ दिले तर, देशांतर्गत सुरक्षेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिमरनजीत विजयी का झाले?

पंजाबमध्ये तीन महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत ‘आप’ प्रचंड बहुमताने विजयी झाला होता. ११७पैकी ९२ जागा ‘आप’ने जिंकल्या होत्या. पण, संगरुर पोटनिवडणुकीत मतदारांनी ‘आप’वरील नाराजी उघड केली आहे. संगरुर लोकसभा मतदारसंघामध्ये ९ विधानसभा मतदारसंघ येतात, जे सर्व ‘आप’ने जिंकले होते. पण, नवनियुक्त आमदार लोकांना भेटत नसल्याची तक्रार केली जात होती. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पोटनिवडणुकीत प्रचारासाठी फार वेळ दिला नाही. ‘आप’चा उमेदवार अपरिचित असल्याने पक्षाच्या मदतीची अधिक गरज होती. गायक मुसेवालाच्या हत्येच्या घटनेमुळे ‘आप’विरोधी वातावरण निर्माण झाले. ‘आप’ सरकारने चारशेहून अधिक प्रतिष्ठितांच्या सुरक्षेत कपात केली, त्यामध्ये मुसेवालाचाही समावेश होता. सुरक्षेत कपात केल्यानंतर मुसेवालाची हत्या करण्यात आली. पंजाबमधील मालवा भागात ‘आप’ला भरघोस यश मिळाले. पण राज्यसभेवर खासदारांची नियुक्ती करताना या भागाला प्रतिनिधित्व दिले गेले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained shiromani akali dal simranjit singh mann victory in punjab print exp 0622 abn
First published on: 27-06-2022 at 13:11 IST