दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षांत भारतासह जगभरात कापूस टंचाई जाणवणार आहे का? कापड उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे का?

देशातील लागवडीची आकडेवारी काय सांगते?

मागील खरीप हंगामात देशभरात कापसाची लागवड ११३.५१ लाख हेक्टरवर झाली होती. यंदा त्यात भर पडून जुलैअखेपर्यंत देशभरात १२१.१३ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. तरीही नैसर्गिक आपत्तींमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे, त्यामुळे पेरा वाढूनही उत्पादनात मोठी तूट येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आतापासूनच कापूस टंचाईचा सामना करीत असलेल्या कापड उद्योगावर कापूस टंचाईची टांगती तलवार कायम आहे.

देशात कापसाचे नुकसान नेमके कुठे झाले?

कापूस लागवडीत भारत जगातील अग्रेसर देश आहे. आजवर १२१.१३ लाख हेक्टरवर कापसाचा पेरा झाला आहे. त्यात आणखी वाढीची शक्यता आहे. परंतु, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणात अतिवृष्टी झाली. त्याचा परिणाम म्हणून कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थानसारख्या राज्यांत कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भात कापसाचे क्षेत्र जास्त असते, नेमके याच भागात अतिवृष्टीने पिके पाण्याखाली गेली आहेत. अशीच अवस्था गुजरात आणि तेलंगणाच्या कापूस पट्टय़ात आहे. त्यामुळे अपेक्षित असलेल्या सुमारे चार कोटी कापूस गाठींच्या (एक गाठ = १७० किलो रुई) उत्पादनाचा अंदाज गाठणे शक्य दिसत नाही.

जगभरातील लागवड काय सांगते?

जगात सर्वाधिक कापूस लागवड भारतात केली जाते. देशातील क्षेत्र १३५ लाख हेक्टरवर जाण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत ४२ लाख हेक्टर, चीनमध्ये ३३ लाख तर पाकिस्तानात २५ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. सध्या अमेरिका, पाकिस्तान आणि भारताच्या उत्तरेकडील राज्यांत कापूस वेचणी सुरू झाली आहे. पाकिस्तानमध्ये १२५ लाख गाठींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पण, हा कापूस पाकिस्तानच्या कापड उद्योगाला अपुरा पडणार आहे. चीनमध्ये ३५० लाख गाठींचे उत्पन्न अपेक्षित आहे. परंतु, तेथील कापड उद्योगाची गरज प्रचंड आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनाचा वापर केल्यानंतरही चीन, जागतिक बाजारातून सुमारे पाच लाख टन कापूस आयात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कापसाच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे. शिवाय चीनने, पाकिस्तान आणि बांगलादेशातील कापड उद्योगात मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे, त्या दोन्ही देशांतून कापसाला वाढती मागणी आहे.

अमेरिकेतील दुष्काळात कापूस होरपळला?

भारतानंतर कापूस लागवडीत अमेरिकेचा नंबर लागतो. यंदा अमेरिकेत २२५ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज आहे. टेक्साससह अन्य कापूस उत्पादक राज्ये भीषण दुष्काळाला सामोरी जात आहेत. परिणामी टेक्सासमध्ये कापूस उत्पादनात २० टक्क्यांची घट येण्याचा अंदाज आहे. दुष्काळाचा परिणाम सिंचन सुविधांवरही झाला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार एकूण कापूस लागवडीखालील क्षेत्रापैकी ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. परिणामी अमेरिकेतील एकूण कापूस उत्पादनावर आणि परिणामी निर्यातीवरही विपरीत परिणाम झाला आहे. अमेरिकेतील कापूस प्राधान्याने बांगलादेश आणि चीन या देशांना निर्यात केला जातो.

बांगलादेश कापसाचा मोठा आयातदार?

स्वस्तात मजूर उपलब्ध असल्यामुळे, बांगलादेशात कापड उद्योगाचा मोठा विस्तार झाला आहे. चीनने येथील उद्योगात मोठी गुंतवणूक केली असली तरी, तेथे कापसाचे उत्पादन फारसे होत नाही. भारत, अमेरिका आणि आफ्रिकी देशातून होणाऱ्या आयातीवरच हे उद्योग चालतात. या उद्योगांना वर्षांला सुमारे एक कोटी गाठींची आवश्यकता असते. त्याचा परिणाम म्हणून भारतातील कापूस दरात तेजी राहील, असे चित्र आहे. 

भारतातील कापड उद्योगाची गरज किती?

देशातील कापड उद्योगाची एकूण मागणी सुमारे ३२० लाख गाठी इतकी असते. त्यामुळे देशातील शेती क्षेत्राकडून उद्योगाची कापूस गरज भागवली जाईल. त्यामुळे कापूस आयात करावा लागेल, अशी स्थिती येण्याची शक्यता नाही. मात्र, शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनकडून कापसाची मागणी वाढली की, त्याचा परिणाम देशी उद्योगावर लगेच दिसून येतो. आजघडीला देशात सुमारे ४० लाख गाठींचा साठा आहे. तरीही कापड उद्योगाला कापूस टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

देशी कापड उद्योगापुढील अडचणी कोणत्या?

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, की दोन महिन्यांपूर्वी ८० ते ८२ हजार रुपये खंडी (एक खंडी = ३५५ किलो) दर होता. आता कापसाचा दर प्रति खंडी ९५ हजार ते एक लाख रुपयांवर गेला आहे. दिवाळीनंतर कापूस बाजारात येण्यास सुरुवात होते. सध्या कर्नाटकातील बेल्लारी भागातील कापूस बाजारात येत आहे. त्यात सहा ते सात टक्के बाष्प असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात बाष्पाचे प्रमाण बारा टक्क्यांवर जात आहे. त्यामुळे हा कापूस मिलमध्ये चालत नाही. कापसाच्या उपलब्धतेबाबत सरकारलाही फार काही करता येत नाही. कापसाच्या एकूण पेरणी क्षेत्रापैकी २० टक्के पेरणी पुरात वाहून गेली आहे. त्यातच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापड गिरणी उद्योग अडचणीत असतानाच विजेचा प्रति युनिट २.४० रुपयांचा इंधन समायोजन हा अतिरिक्त भार गिरण्यांवर पडत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून कापड उद्योगापुढील अडचणी वाढल्या आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained shortage cotton world cotton cultivation textile industry print exp 0822 ysh
First published on: 18-08-2022 at 00:02 IST