-अन्वय सावंत

सचिन तेंडुलकर, अमोल मुझुमदार, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ; भारतीय स्थानिक क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी संघ असलेल्या मुंबईसाठी प्रथम श्रेणी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या फलंदाजांची ही काही नावे. आता या यादीमध्ये २१ वर्षीय सुवेद पारकरचे नावही समाविष्ट झाले आहे. सुवेदने रणजी करंडकातील पदार्पणातच द्विशतक करण्याची किमया साधली. उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याच्या पहिल्या डावात सुवेदने ४४७ चेंडूंत २१ चौकार आणि चार षटकारांसह २५२ धावांची खेळी केली. मुंबई क्रिकेटला गवसलेला हा नवा तारा नक्की आहे तरी कोण, याचा घेतलेला आढावा.

सुवेदच्या क्रिकेटमधील प्रवासाची सुरुवात कशी झाली?

भारताचे आघाडीचे खेळाडू रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांच्याप्रमाणे सुवेदने मुंबईतील नामांकित प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. सुवेदची आई माजी खो-खोपटू आहे. सुवेदने शालेय क्रिकेटमध्ये कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली. तसेच त्याने भारताच्या युवा (१९ वर्षांखालील) संघाचेही प्रतिनिधित्व केले.

सुवेदची मुंबईच्या संघात निवड कशी झाली? –

मुंबईने यंदा सी. के. नायडू करंडक (२५ वर्षांखालील) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मुंबईच्या या यशात सुवेदने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सहा सामन्यांमध्ये ६६.१८च्या सरासरीने ६०१ धावा फटकावल्या. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी होता. त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतकेही झळकावली. तसेच विदर्भाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिल्या डावात त्याने ७२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकविरुद्ध मुंबईचा विजयासाठी २४४ धावांची आवश्यकता होती. याचा पाठलाग करताना मुंबईची ६ बाद ५० अशी स्थिती होती. मात्र, सुवेदने (नाबाद १०३) शतकी खेळी करताना शम्स मुलानीच्या (नाबाद ७४) साथीने मुंबईला विजय मिळवून दिला. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारेच सुवेदची मुंबईच्या रणजी संघात निवड झाली.

सुवेदला पदार्पणाची संधी कशी मिळाली? –

मुंबईने यंदाच्या रणजी हंगामातील तीनपैकी दोन (गोवा आणि ओदिशाविरुद्ध) साखळी सामने जिंकत बाद फेरीत प्रवेश मिळवला. या तिन्ही सामन्यांत भारताचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळला होता. मात्र, रणजीची साखळी फेरी संपल्यानंतर झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या अखेरीस रहाणेच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे त्याला रणजी स्पर्धेतील उत्तराखंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याला मुकावे लागले. त्याच्या अनुपस्थितीत सुवेदला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.

सुवेदचे पदार्पणातील द्विशतक का ठरले खास? –

रहाणेच्या गाठीशी १६० हूनही अधिक प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे त्याची जागा घेणाऱ्या सुवेदवर बरेच दडपण होते. मात्र, या दडपणातही सुवेदने संयमाने फलंदाजी केली. रहाणेप्रमाणेच सुवेदने दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकण्याची तयारी दाखवली. त्याने डावाच्या सुरुवातीला मैदानी फटके मारण्यावर भर दिला. त्याने तिसऱ्या गड्यासाठी अरमान जाफरसह ११२ धावांची, तर चौथ्या गड्यासाठी शतकवीर सर्फराज खानसह २६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सुवेदने २५२ धावांची खेळी साकारली. त्यामुळे तो पदार्पणात द्विशतक करणारा अमोल मुझुमदारनंतर मुंबईचा केवळ दुसरा फलंदाज ठरला. योगायोगाची बाब म्हणजे मुझुमदार सध्या मुंबईचे प्रशिक्षकपद भूषवत आहे.