scorecardresearch

विश्लेषण : साध्या मोबाइलचा पुन्हा जमाना? का वळू लागलेत अनेकजण ‘डम्ब फोन’कडे?

इंटरनेट, समाजमाध्यमे, छायाचित्रण, चित्रीकरण अशी कुठलीही सुविधा नसलेल्या ‘बेसिक मोबाइल संचां’ना (डम्ब फोन) मागणी वाढली आहे

अभय नरहर जोशी

सध्या चाळीशी-पन्नाशीत असलेल्या आपल्या पिढीने ‘पेजर’चा काळ अनुभवला असेल. ज्यावेळी ‘पेजर’ आला तेव्हा तो कमरेत अडकवून रुबाबात भाव खात जाणारे एक्झिक्युटिव्ह… त्या ‘पेजर’कडे हरखून पाहणारे सामान्यजन…‘पेजर’च्या मेसेज नोटिफिकेशनचा आवाज म्हणजे स्वर्गातून आकाशवाणीच झाल्याचा त्यांचा अविर्भाव असे…पण अशा या ‘पेजर’ची अल्पावधीत छुट्टी करत आला मोबाइल फोन! एका बाजूला ‘एरियल शिंग’ असणारे ‘वॉकिटॉकी’सदृश जाड आणि जड फोन. ते वापरणारे स्वतःला रुबाबात ‘आहे रे’ गटातले समजत. बाकीचे सर्व ‘नाही रे’ गटातले. मोबाइल फोन बाळगणे एके काळी प्रतिष्ठेचे लक्षण (स्टेटस सिम्बल) समजले जाईल. कालांतराने स्लायडिंग, घडीचे असे अनेक ‘मोबाइलावतार’ गेल्या दीड दशकात आपण अनुभवलेत. या सगळ्यांनंतर आला तो तुमचा-आमचा सध्याचा ‘स्मार्ट फोन’! या ‘स्मार्टफोन’ने सध्या अवघे जगणे व्यापले आहे. त्याने आपल्याला अशी भूल घातली की संमोहित होऊन आपण त्याचे गुलाम कधी झालो, हे समजलेच नाही. काही कविमनाचे विद्वान तर या स्मार्टफोन म्हणजे ‘शमा’ (दिवा) असून आपण त्यावर झडप घालणारे ‘परवाने’ (पतंग) झालो आहोत, अशी ‘शायराना’ तुलना करतात!

साध्या संचांना ‘स्मार्ट’ मागणी का?

असे हे दर आठवड्यात नवनवीन तंत्रज्ञानाने अधिक स्मार्ट होणारे स्मार्टफोन अजरामर होतील, असा कयास असताना एक धक्कादायक बातमी आली. ‘बीबीसी’ने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार स्मार्टफोनच्या या जमान्यात पुन्हा ‘बेसिक मोबाइल संचां’ना (डम्ब फोन) मागणी वाढली आहे. इंटरनेट, समाजमाध्यमे, छायाचित्रण, चित्रीकरण अशी कुठलीही सुविधा नसलेल्या या साध्या मोबाइल संचांना मागणी वाढली आहे. २०१८ ते २१ दरम्यान अशा साध्या संचांची ‘गुगल’वर विचारणा, शोध (सर्च) ८९ टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त सॉफ्टवेअर कंपनी एस. ई. म्रुशने दिले आहे. साध्या मोबाइल संचांची मागणी २०१९ मध्ये ४० कोटी होती. ती गेल्या वर्षी एक अब्जापर्यंत वाढली आहे, असे एक अहवाल सांगतो. या तुलनेत गेल्या वर्षी एक अब्ज ४० कोटी स्मार्ट फोनची विक्री झाली. २०२० मध्ये स्मार्ट फोनच्या खपात १२.५ टक्क्यांनी घट झाली होती. २०२१ मध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार इंग्लंडमध्ये दर दहा मोबाइलधारकांत एक जण साधा मोबाइल संच वापरणारा आहे.

साधे संचच प्रमुख फोन?

साधे मोबाइल संच निर्मिती करणारी न्यूयॉर्कमधील ‘लाईट फोन’ या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले, की २०२१ मध्ये जरी आमचे साधे संच महाग असले तरी आमची उलाढाल सर्वाधिक झाली. २०२१ मध्ये आमच्या संचांच्या खपात १५० टक्क्यांनी वाढ झाली. या कंपनीचे सहसंस्थापक कैवै टांग यांनी सांगितले, की हे साधे संच आपल्या स्मार्ट फोनपासून थोडा वेळ बदल किंवा दुय्यम संच म्हणून ग्राहक वापरतील, या उद्देशाने तयार केले होते. परंतु आमचे निम्म्याहून अधिक ग्राहक, हे साधे संचच आपला प्रमुख फोन म्हणून वापरत आहेत.

असे कशामुळे झाले असावे?

स्मार्टफोनच्या मोहजालात साधे मोबाइल फोन आपल्या प्रेमजालात ग्राहकांना कसे अडकवू लागलेत बुवा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मंडळी याचंही उत्तर आहे. सोप्पं उदाहरण द्यायचं, तर चुलीच्या धुराडाला कंटाळून गावोगावी गॅस आले. एलपीजी नाही तरी गोबर गॅस होते. अगदी अलीकडे उज्ज्वला योजना आली (तरीही गॅस परवडत नाही, हा भाग निराळा). पण गॅसवरील स्वयंपाकाच्या चवीचा आता आपल्याला कंटाळा आला की नाही? मग आपण चुलीवरची भाकरी, चुलीवरची भाजी, चुलीवरचे चिकन, चुलीवरचे मटण अन् अगदी चुलीवरची मिसळ मिटक्या मारीत खाऊ लागलो. कारण काय तर साधेपणातला खुशखुशीत आनंद! अगदी तसंच साधा मोबाइल संच वापरायला लागल्यावर आपल्याकडे किती वेळ आहे, याचा आनंद अनेकांना उमगला. आपण स्मार्ट फोनवर किती ‘अनस्मार्ट’पणे वेळ वाया घालवत होतो, याचा साक्षात्कार अनेकांना झाला. गरज नसलेली भरमसाट माहितीची गाठोडी आपण गोळा करत होतो, समाजमाध्यमांवर टवाळगिरी करत होतो, हे समजून या साऱ्यांचे डोळेच उघडलेत. मग आपल्या कुटुंबासह मिळणारा आनंद-समाधान ते लुटू लागले. उठसूट समाजमाध्यमाच्या चव्हाट्यावर न जाता खासगीपणा जपू लागलेत. शिवाय या साध्या संचांची बॅटरी खूप काळ चालते व तो स्वस्तही आहे, हेही कारण आहेच.

सामान्य फोनचे फायदे कोणते?

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहसंशोधक आणि तंत्रज्ञ प्रा. सॅंड्रा वॉचर यांनी साध्या मोबाइल संचाची मागणी वाढल्याचे विश्लेषण करताना सांगितले, की संवाद साधणे किंवा छोटे संदेश पाठवणे हे स्मार्ट फोनचे मुख्य काम राहिलेले नाही. आपला स्मार्ट फोन हे आपले मनोरंजनाचे मुख्य केंद्र झाले आहे. तुम्हाला बातम्या पुरवणारे माध्यम झाले आहे. तुमचे सुकाणूच त्याच्या हातात आहे. तुमची डायरी, नोंदवही, शब्दकोश, अगदी तुमचे पैशाचे पाकिटही तुमचा स्मार्ट फोन झाला आहे. त्यावर सततचे संदेश, नोटिफिकेशन, अद्ययावत माहिती, ब्रेकिंग न्यूज तुमचं दैनंदिन जीवनात व्यत्यय आणतात. अस्वस्थ ठेवतात. आक्रमक बनवतात. भारावून टाकतात. याची जाणीव ज्यांना प्रकर्षाने झाली त्यांनी साधा मोबाइल संच निवडणे पसंत केले. ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संचांमुळे साध्या तंत्रज्ञानाचा जाणीवपूर्वक वापर होत आहे. त्यामुळे एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करता येईल. हेतूपूर्वक आपले लक्ष्य निवडून ते विनाअडथळा गाठता येईल. त्यामुळे मन:शांतीही वाढेल. कारण अनेक पर्याय असले की आनंद हरपतो. मन द्विधावस्थेत आंदोलित होते… तेव्हा सामान्य फोनचेच फायदे असामान्य!

abhay.joshi@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained the new age of mobile why are people turning to dumb phones print press asj

ताज्या बातम्या