शिवेसेनेतून बंड करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने राज्यात सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांसह बंड करुन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सुमारे गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेले राजकीय नाट्य संपले, असे बोलले जात होते. परंतु सत्तेशिवाय इतर गोष्टींवर नजर टाकली तर ही केवळ युद्धाची सुरुवात असल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली असेल, पण शिवसेनेचे नाव, चिन्ह आदींसह अनेक गोष्टी त्यांच्याकडेच अजूनही आहेत. मात्र, दोन्ही गटांमध्ये तडजोड होण्याचीही शक्यता आहे. असे झाले तर सध्या सुरू असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात येऊ शकतो.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

पण सध्या सुरु असलेल्या संघर्षावरुन हा वाद लवकर संपेल असे वाटत नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी शिवसेना कोणाची यावरून मोठी लढाई सुरू झाली आहे. तसेच ५६ वर्षांच्या या पक्षाच्या बाळासाहेबांकडून उद्धव ठाकरेंना मिळालेल्या बऱ्याच गोष्टी अजून शिल्लक आहेत.

उद्धव ठाकरेंच्या १५ आमदारांचे भवितव्यही अनिश्चित आहे. शिंदे गटाने म्हटले आहे की, त्यांच्याकडे बहुमत आहे आणि सर्व आमदार धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पाठिंबा न दिल्याने शिवसेनेच्या आमदारांना अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते. उद्धव ठाकरे यांनीही काही बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा आग्रह धरला आहे. या सगळ्याचा निर्णय न्यायालयच घेणार आहे.

उद्धव ठाकरेंकडे आता काय आहे?

माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह वगळता खासदार आणि उर्वरित आमदार आहेत. याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर महापालिकाही त्यांच्या पाठीशी आहेत. पक्षाच्या बाबतीत, उद्धव ठाकरे हे सध्या राष्ट्रीय कार्यकारिणी, पदाधिकारी, संबंधित युवक आणि महिला शाखा, सेना भवन आणि शिवसेनेची कार्यालये यांचे अधिकृत प्रभारी आहेत.

पाहा व्हिडीओ –

नाव आणि चिन्ह

मुख्यमंत्री शिंदे यांना ५५ पैकी ४० आमदारांचा पाठिंबा आहे, पण पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळण्यासाठी ते पुरेसे नाही. भारतीय निवडणूक आयोग या प्रकरणी निर्णय घेईल. याआधी शिंदे यांनी आपल्या गटाला शिवसेना बाळासाहेब गट असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, त्याला उद्धव यांनी कडाडून विरोध केला होता.

खासदार-आमदारांचे काय?

फ्लोअर टेस्ट दरम्यान एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या युतीला पाठिंबा न दिल्याने उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेला सामोरे जावे लागू शकते. त्याचवेळी १८ पैकी १२ खासदार शिंदे गटाच्या समर्थनात असल्याचा दावा बुधवारी करण्यात आला. उद्धव ठाकरे खासदारांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असले तरी अनेक जण बाजू बदलण्याची शक्यता आहे. यासाठी हिंदुत्वाशी तडजोड, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जागावाटपासोबत अनेक कारणे असू शकतात.

मुंबई महानगरपालिका निवडणूक

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात. मात्र, ही निवडणूक शिंदे गटासाठी फायद्याची ठरणार नाही. कारण शिंदे गटाचे मोजकेच आमदार मुंबईतील आहेत. त्याचवेळी वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. १९९७ पासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र आधी शिवसेना  भाजपासोबत होती. महापालिकेत शिवसेनेचे ८४ आणि भाजपाचे ८२ नगरसेवक आहेत.

त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेवरही तीन दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र याचे मोठे श्रेय हे एकनाथ शिंदे यांनाच दिले जाते. सत्ताबदलानंतर शिवसेनेच्या अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंच्या हातातून ठाणे महानगरपालिका निसटण्याची शक्यता आहे.

शिवसेना मराठी मतांवर अवलंबून असेल पण शिंदे गट ते हिसकावू शकतो. मराठी मतदारांमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादीही लोकप्रिय आहे. मुस्लीम मतदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकत नाहीत कारण ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आहेत. एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी देखील महाराष्ट्राच्या राजकारण येत आहेत, ज्याने मुस्लिम मतदारांना अधिक व्यवहार्य पर्याय दिला आहे.

शिवसेना कार्यालये आणि पदाधिकारी

पक्षाचे कार्यकर्ते आणि सुमारे ५० लाख नोंदणीकृत सदस्य सहसा त्यांच्या पसंतीनुसार आपला बाजू ठरवतात. पण पक्षाच्या संलग्न शाखांमध्ये किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीसारख्या निर्णय घेणार्‍या संस्थांमधील पदाधिकाऱ्यांची मने जिंकणे महत्त्वाचे आहे. विधिमंडळ पक्षात नुकत्याच झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, नगरसेवकांच्या बैठका घेत आहेत. पण आता राज्य सरकारचे प्रमुख पद असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी आणखी बंडखोरी घडवून आणणे फारसे आव्हानात्मक ठरणार नाही.

तडजोड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही

पण ठाकरे-शिंदे यांच्यात तडजोड झाली आणि ते होण्याची शक्यता निर्माण झाली, तर परिस्थिती वेगळी असेल. विचारधारेच्या बाबतीत ते एकाच बाजूने असल्यामुळे बंडाची कटुता विसरणे त्यांना अवघड जाणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटाने आमदारांना अपात्र ठरवण्याचा आग्रह धरला असतानाही बाळासाहेबांचा सन्मान म्हणून त्यांनी आदित्य ठाकरेंना यामधून वगळले आहे. एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा पक्ष तोडण्याची इच्छा नसल्याचे म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained uddhav thackeray lot at stake after snatching power abn
First published on: 07-07-2022 at 18:03 IST