आजपासून बरोबर ४९ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या संसदेने संविधानाचा स्वीकार केला आणि याच दिवशी २०२२ साली देशाने अविश्वास ठरावाद्वारे पदावरून पायउतार होणाऱ्या पहिल्या पंतप्रधानाचा पाहिलं. इम्रान खान, ज्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या क्रिकेटमधील कारकिर्दीइतकी चांगली राहिली नाही, त्यांच्याविरोधात काल अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यात अपय़श आल्याने इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावं लागलं.


पाकिस्तानमधल्या या राजकीय खेळीचा, सत्ताबदलाचा भारतावर कसा परिणाम होणार? याबद्दल थोडक्यात जाणून घ्या…


इम्रान खान यांनी तीन वर्षे ७ महिने पंतप्रधान पद सांभाळलं. मात्र आता अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर इम्रान खान यांना पायउतार व्हावं लागलं. या राजकीय उलथापालथीचा परिणाम फक्त पाकिस्तानवरच नाही जर जागतिक पातळीवरही होऊ शकतात. २०१८ मध्ये सत्ता आल्यानंतर इम्रान खान यांनी अमेरिका विरोधी अनेक वक्तव्य केली. त्यांनी नुकतंच चीन आणि रशियाशी जवळीक साधण्याची इच्छाही व्यक्त केली होती. इम्रान यांनी २४ फेब्रुवारी रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली होती.


भारत- पाकिस्तान संबंध सुधारतील का?


पाकिस्तानच्या राजकारणात भारत नेहमीच एक प्रमुख घटक राहिला आहे. भारताच्या संदर्भात विचार करायचा झाल्यास पाकिस्तानचं सरकार पडल्यानंतर भारतामध्ये याविषयी सातत्याने चर्चा होत आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर अविश्वासामुळे औपचारिक राजकीय चर्चा झालेली नाही. पण भारत पाकिस्तान संबंधांचे अभ्यासक सांगतात की, पाकिस्तानी सैन्य इस्लामाबादमध्ये नव्या सरकारवर काश्मीर संघर्ष विरामासाठी दबाव टाकू शकतं. कारण पाकिस्तानचे सैन्य प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी नुकतंच म्हटलं होतं की जर भारत सहमत असेल तर त्यांचा देशही काश्मीर प्रश्नावर पुढे जाण्यास तयार आहे.


शरीफ यांची वापसी


चार वर्षांपूर्वी शरीफांचा पराभव करून इम्रान खान सत्तेवर आले. आता इम्रान खान यांना पदावरून काढून टाकून नवाझ शरीफ यांचे बंधू शाहबाझ शरीफ यांनी सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात आल्याचं दाखवून दिलं. खान यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडणाऱ्यांपैकी ते आघाडीचे नेते होते, त्यांनीच पाकिस्तानी सैन्यालाही आपल्या बाजूला वळवलं. लंडनमध्ये असलेले त्यांचे बंधू नवाझ शरीफ यांची आठवणही शाहबाझ शरीफ यांनी अविश्वासाचा ठराव मांडत असतानाच्या आपल्या भाषणात केली. शरीफ हे भारत पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठी सकारात्मक मार्गाने प्रयत्न करत होते. मात्र इम्रान यांच्या वक्तव्यांमुळे हे अवघड होत गेलं.


भारतासोबत संबंध सुधारण्याची आणखी एक संधी


इम्रान खान यांनी भारत पाकिस्तान संबंध राजकीयदृष्ट्या आणखी किचकट केले. गेल्या दोन -अडीच वर्षात त्यांनी देशात सत्तेवर असणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपा तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट टीका केली. त्यामुळे त्यांची पंतप्रधान पदावरून हकालपट्टी झाल्याने आता परराष्ट्रविषयक संवाद पुन्हा सुरू करणं हे दोन्ही देशांना सोपं जाऊ शकतं.