scorecardresearch

विश्लेषण : २७ लाख रुपयांचे तिकिट, कांदा-लसणाच्या सेवनावर बंदी असलेला इव्हेंट; जाणून घ्या काय आहे ‘मेटा गाला’

फॅशनची दुनिया म्हटला जाणारा मेट गाला इव्हेंट आहे तरी काय?

What is Met Gala event
Met Gala 2022 (फोटो – REUTERS/Andrew Kelly)

न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये मेट गाला २०१९ दरम्यान पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्रा रेड कार्पेटवर लक्झरी ब्रँड डायरचा फेदर ड्रेस परिधान करुन पोहोचली होती. मात्र तिच्या हटके कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. प्रियांका चोप्राने घातलेल्या कपड्यांची सोशल मीडियावर जोरजार चर्चा देखील झाली होती. प्रियंकासोबत हॉलीवूडसह बॉलीवूडमधील काही कलाकारांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. यानंतर मेट गालाची भारतातही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. करोनानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा न्यूर्यार्कमध्ये हा मेट गाला पार पडला आहे. पण फॅशनची दुनिया म्हटला जाणारा मेट गाला इव्हेंट आहे तरी काय?

मेट गाला काय?

मेट गाला हा मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स’ कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारणारा कार्यक्रम आहे, जो दरवर्षी न्यूयॉर्क शहरात होतो. हा हाय प्रोफाईल कार्यक्रम दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी होतो. याची सुरुवात १९४६ मध्ये झाली. या महोत्सवातून जमा होणारा निधी कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी वापरला जातो. या गालामध्ये दरवर्षी एक नवीन थीम असते, ज्यानुसार सेलिब्रिटी त्यांच्या ड्रेसची निवड करतात.

दरवर्षी बदलते थीम

फॅशन इंडस्ट्रीच्या सर्वात मोठ्या कार्यक्रमात, प्रत्येकजण एका थीमनुसार कपडे घालून येतो. कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सेलिब्रिटी मोठ्या फॅशन डिझायनर्सचे कपडे परिधान करताना दिसतात. मेट गाला सेलिब्रिटी आणि फॅशन डिझायनर्सच्या क्रिएव्हीटीचे स्वागत करते.

२०२२ ची मेट गाला थीम ‘इन अमेरिका: अॅन अँथॉलॉजी ऑफ फॅशन’ आहे, तर त्याचा ड्रेस कोड ‘गिल्डेड ग्लॅमर आणि व्हाइट टाय’ आहे. या वर्षीची थीम सर्वांना वापरता येईल अशा फॅशनवर केंद्रित आहे. या वर्षीच्या फॅशन शोमध्ये डिझायनर्सचे कपडे प्रदर्शित केले जातील ज्यांनी अमेरिकन फॅशनच्या जगतामध्ये बदल घडवून आणला आहे.

२०१९ मध्ये मेट गालाची थीम ही ‘कॅम्प’ होती. ही थीम फोटोग्राफर सुसान सोंटॅगच्या १९६४ च्या छायाचित्रांची माहिती देणाऱ्या ‘नोट्स ऑन कॅम्प’ वरून प्रेरित होती. या थीम अंतर्गत, सेलिब्रिटींनी असे कपडे परिधान करणे आवश्यक होते जे ओव्हर-द-टॉप स्टाईल, विनोद, विडंबन दाखवून देतात. मेट गालामध्ये तुम्ही तुमच्या पेहरावाने सीमारेषा तोडता, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते घातलेल्या कपड्यामधून सांगता. येथे सेलिब्रिटिंना कपड्यांमधून आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली आणि तीही उघडपणे.

त्यावेळी या थीम अंतर्गत अनेक सीमारेषा तोडून सेलिब्रिटींनी आपला फॅशन सेन्स दाखवला होता. मेट गालामध्ये अभिनेता मायकेल युरीने एक ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये एका बाजूला गाऊन आणि दुसऱ्या बाजूला कोट पॅंट दिसत होता. अभिनेता मायकेल युरी कदाचित असे म्हणण्याचा प्रयत्न करत होता की जे कपडे मुलींनी घातले आहेत, ते मुलांनी घातले आहेत आणि हे नॉर्मल आहे, असायला हवे.

मायकेल युरी (इन्स्टाग्राम)

असे कपडे का घालतात?

मेट गाला पाहून आपल्याला अनेकदा वाटतं की हे सेलिब्रिटी असे कपडे का घालतात. तर यामागेही एक मोठं कारण आहे. दरवर्षी मेट गालामध्ये एका थीमनुसार कपडे परिधान केले जातात. मेट गालामध्ये वेगवेगळे कपडे परिधान करण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे ज्या गोष्टी वेगळ्या असतात, लोकांच्या नजरा त्याकडेच असतात. जर एखाद्या ब्रँडमधून सेलिब्रिटीला आमंत्रित केले असेल तर त्याला त्या ब्रँडचे कपडे घालावे लागतात.

मेट गालाच्या तिकिटाची किंमत किती आहे?

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, सर्वात स्वस्त मेट गाला तिकिटाची किंमत ३५ हजार डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे २७ लाख रुपये आहे. सर्वात स्वस्त तिकिटाची किंमत २७ लाख आहे तर सर्वात महाग तिकिटाची किंमत किती असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. येथे एका टेबलची किंमत २००,००० ते ३००,००० डॉलर पर्यंत आहे, म्हणजे सुमारे २.२९ कोटी असते.

तिकीटाचे पैसे कोण भरते?

या इव्हेंटमध्ये, सेलिब्रिटींना फॅशन ब्रँडकडून आमंत्रण दिले जाते. अशा परिस्थितीत, फॅशन ब्रँड हे सेलिब्रिटींच्या तिकिटाचे पैसे देतात. त्या बदल्यात, सेलिब्रिटी त्यांच्या फॅशन ब्रँडचे कपडे परिधान करतात आणि त्यांचा प्रचार करतात. तर काही सेलिब्रिटी स्वतः तिकीटाचे पैसे देतात.

धूम्रपान आणि सेल्फी बॅन

याशिवाय इव्हेंटमध्ये सेल्फी फोटो काढण्यावर बंदी आहे. २०१५ मध्ये कार्यक्रमादरम्यान सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याची बातमीही समोर आली होती. मात्र, प्रत्येक वेळी नियमांचे पालन करण्यात चूक होत आहे. २०१७ मध्ये, काइली जेनने बाथरूममध्ये स्वत:चा सेल्फी घेतला, त्यानंतर हा नियम अधिक कडक करण्यात आला. सेल्फी व्यतिरिक्त, इव्हेंटमध्ये धूम्रपान करण्यास देखील बंदी आहे, २०१७ मध्ये बेला हदीद आणि डकोटा जॉन्सन यांना वॉशरूममध्ये धूम्रपान करताना पकडले गेले होते. यानंतर बोर्ड सदस्यांनीही हे प्रकरण कठोरपणे घेतले होते.

कांदा-लसूणच्या सेवनावर बंदी

खाद्यप्रेमींसाठी, हा नियम नक्कीच थोडा विचित्र वाटेल की कार्यक्रमात कांदा आणि लसूण खाण्यास देखील मनाई आहे. मेट गालामध्ये कॉकटेल आणि औपचारिक डिनरचे आयोजन केले जाते, परंतु तेथे आलेल्या पाहुण्यांना जेवणात कांदा आणि लसूण दिले जात नाही. लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येऊ नये म्हणून असे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained what is met gala event abn

ताज्या बातम्या