सांगलीमधील म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. डॉक्टर माणिक वनमोरे आणि पोपट मोरे या भावांनी संपूर्ण कुटुंबासहित विष प्राशन करुन आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. पण कुटुंबाने आत्महत्या करण्यामागे नेमकं कारण काय ? त्यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल जाणून घेऊयात…

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

आत्महत्येचं नेमकं कारण काय?

सांगलीमधील म्हैसाळ येथे सोमवारी दुपारी एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळले. पोलीस तपासादरम्यान घटनास्थळी सापडलेल्या लेखी चिठ्ठीत खासगी सावकारांकडून वारंवार होणारा शारिरीक, मानसिक छळ आणि जाहीर अपमान यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख कुटुंबाने केला आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन चिठ्ठ्या सापडल्या आहेत. यामुळे खासगी सावकारी वनमोरे कुटुंबाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

पोलिसांनी याप्रकरणी परिसरातील २५ खासगी सावकारांना अटक केली आहे. तसंच इतर ११ जणांचा शोध घेतला जात आहे. हे सर्व सावकार कर्जाच्या वसुलीसाठी कुटुंबाला सतत त्रास देत आणि अपमानित करत होते अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.

संपूर्ण गावाला धक्का

माणिक मोरे आणि त्यांची पत्नी रेखा (४५), मुलगी अनिता (२८), मुलगा आदित्य (१५), आई आक्काताई (७२) आणि पोपट मोरे यांचा मुलगा शुभम (२८) यांचे मृतदेह एका घरात सापडले. तर एक किमी अंतरावर स्थानिक शाळेत शिक्षक असणारे पोपट मोरे, त्यांची पत्नी संगीता (४८), मुलगी अर्चना (३०) यांचे मृतदेह दुसऱ्या घरात सापडले. या नऊ जणांनी विषारी औषध प्राशन केल्याचं प्राथमिक तपासावरुन स्पष्ट झालं आहे.

दोन्ही घटनांच्या ठिकाणी एकाच हस्ताक्षरात, एकाच प्रकारच्या वहीवरील कागदावर लिहिलेल्या दोन चिठ्ठ्या मिळाल्या असून अन्य संशयास्पद कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

कुटुंबाशी जवळीक असणाऱ्या अश्विनी सावंत यांनी आपण अक्षरश: त्या घरात वाढले असल्याचं सांगितलं आहे. “ते सर्वजण फार काळजी घेणारे होते. ते मला त्यांच्या कुटुंबाचा भाग समजत होते. त्यांच्या घरातील अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी होत होते. गेल्या आठवड्यात पाणीपुरी पार्टीसाठी मी गेले होते. ते आनंदी आणि जनावरांवर प्रेम करणारं कुटुंब होतं. गेल्या काही वर्षांपासून कर्जामुळे ते फार तणावात होते हेदेखील मला माहिती आहे. पण असं काही होईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,” असं अश्विनी सावंत यांनी सांगितलं.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “चिठ्ठीत नमूद केलं आहे त्यानुसार वनमोरे कुटुंबाला स्टीलच्या वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी कारखाना सुरु करायचा होता आणि त्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं. अनेक लोकांकडून त्यांनी कर्ज घेतलं होतं. पशुवैद्यकीय दवाखान्यात असणाऱ्या कंपाऊंडरकडूनही त्यांनी पैसे घेतले होते”.

दरम्यान कुटुंबाला गुंतवणूक योजनेचं आमिष दाखवण्यात आलं आणि त्यातून आर्थिक नुकसान झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. “माणिककाका मला नेहमी आम्ही एका योजनेत पैसे गुंतवले असून त्यातून मोठा परतावा मिळणार आहे, यातून आपण सर्व कर्ज फेडणार आहोत असं सांगायचे. दोन वेळा त्यांनी मला सावकार घरी आले असल्याने येऊ नको असं सांगितलं होतं,” अशी माहिती अश्विनी सावंत यांनी दिली आहे. वनमोरे कुटुंब सहा सात वर्षांपूर्वी आपलं जुने घर सोडून नवीन घरात राहण्यासाठी आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

आम्ही सर्व शक्य बाजूंनी तपास करत आहोत असं पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितलं आहे. “एक दिवस आधी आदित्य (माणिक मोरेंचा मुलगा) माझ्या घरी आला होता. आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा मारल्या. तो अभ्यासात आणि महाविद्यालयातील इतर गोष्टींमध्ये हुशार होता. त्याच्याबद्दल किंवा कुटुंबाबद्दल कोणतीही संशयास्पद बाब जाणवली नाही,” असं आदित्यचा वर्गमित्र आणि शेजारी सुजलने सांगितलं आहे.

शेजारी असणाऱ्या किराणा दुकानाचा मालक सुधाकर गायकवाडने दिलेल्या माहितीनुसार, “घटनेच्या एक दिवस आधी माणिक मोरे यांचा मुलगा दुकानात आला होता. वडील नंतर पैसे देतील सांगत त्याने दही नेले होते. संध्याकाळी त्याची मोठी बहीण आली आणि मला पैसे देत आता काही उधारी राहिली नसल्याचं सांगितलं”.

पोलीस अधिक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “वनमोरे बंधू आणि कुटुंबाने सावकारांकडून व्याजावर पैसे घेतले होते. नियमित व्याज भरत असतानाही सावकार आणि इतर आरोपी त्यांना वारंवार वसुलीसाठी धमकावत होते. तसंच शिवीगाळ करण्यासोबत गावातील चौकात अपमानित केलं जात होतं. छळ असह्य झाल्यानेच कुटुंबाने टोकाचं पाऊल उचललं”.

अटक आरोपींची नावे –

आतापर्यंत अटक करण्यात आलेले सर्व आरोपी म्हैसाळचे आहेत. नंदकुमार पवार, राजेंद्र बन्ने, अनिल बन्ने, खंडेराव शिंदे, डॉक्टर तात्यासौ चौघुले, शैलेश धुमाळ, प्रकाश पवार, संजय बागडी, अनिल बोराडे, पांडुरंग घोरपडे, शिवाजी कोरे, रेखा चौघुले, विजय सुतार, गणेश बामणे आणि शुभेंद्र कांबळे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तर आशु धुमाळ, अनाजी खरात, शामगोंडा पाटील, सतीश शिंदे, आण्णासो पाटील, नरेंद्र शिंदे, विजय सुतार, शिवाजी खोत, नरेंद्र शिंदे आणि महादेव सपकाळ फरार आहेत.

“फरार आरोपींना पकडण्यासाठी आम्ही सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि कर्नाटकमध्ये पथकं पाठवली आहेत,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is reason behind mass suicide in sangli sgy
First published on: 22-06-2022 at 20:02 IST