भाजपा आमदार नितेश राणे यांचं नाव सध्या चर्चेत आहे. यामागील कारण म्हणजे नितेश राणे यांच्यावर सध्या अटकेची तलवार आहे. ही अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयातही धाव घेतली आहे. दरम्यान या घटनेवरुन शिवसेना आक्रमक झाली असून कारवाईची मागणी करत आहे. तर दुसरीकडे कणकवलीत पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात आहे. नारायण राणे तर आपला नागपूर दौरा अर्ध्यात सोडून कणकवलीत थांबले आहेत. पण हे नेमकं प्रकरण काय आहे? शिवसेनेचा याच्याशी काय संबंध? अटकेपर्यंत प्रकरण का पोहोचलं आहे? या प्रश्नांची उत्तरं यानिमित्ताने जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष परब यांना मारहाण –

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेण्यात आलं असल्याची माहिती आहे. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. दरम्यान संतोष परब शिवसैनिक असल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.

“बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदाराचा टोला, म्हणाले “नारायण राणे वाघ असल्यासारखे…”

“मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

संतोष परब यांचा आरोप काय –

“दुचाकीवर असताना मला जोरात एका गाडीने धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूने फरफटत गेलो. माझ्या हाताला जखमही झाली आहे. फरफटत जाऊन मी एका बाजूला पडलो होतो आणि माझी दुचाकी माझ्या पायावर होती. ती एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा होती. पुढे जाऊन २०-२५ फुटांवर जाऊन थांबली. त्यातील एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि जाताना गोट्या सावंत, नितेश राणे यांना कळवलं पाहिजे असं म्हणत खिशातून मोबाईल काढला,” असं संतोष परब यांनी सांगितलं आहे.

संतोष परब हल्ला प्रकरणावरून नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेनेचा विधीमंडळात आक्रमक पवित्रा

नितेश राणेंनी आपली बाजू मांडताना काय सांगितलं होतं –

“कणकवलीबद्दल बोलायचं गेल्यास मी पोलिसांकडे जबाब दिला असून सहकार्य केलं आहे. या केसशी माझा दूरपर्यंत काही संबंध नाही. फक्त शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. एका बाजूला अनिल परब आणि रामदास कदम आणि आमच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत आणि विनायक राऊत यांच्यातील जो संघर्ष आहे त्यातून झालेला हा वाद आहे. यात कोणीतरी हवं आहे म्हणून माझ्यावर टाकलं आहे. पोलिसांनी जी माहिती हवी होती ती मी वकिलामार्फत दिली आहे,” असं नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं होतं.

‘सुडाच्या राजकारणातून नितेश राणेंच्या अटकेचा प्रयत्न’

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सत्तारूढ लोकांना पराभव दिसू लागल्याने सुडाचे राजकारण सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणजे आमदार नितेश राणे यांना अटक केली जाणार असल्याचे वृत्त प्रसारित केले जात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. अ‍ॅग्रोव्हिजनच्या कार्यक्रमाला नागपुरात आले असता ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. कोणाच्याही मारहाणीशी नितेश राणे यांचा संबंध नाही. राज्य सरकारला जे करायचे ते करू द्या. नितेश राणे जिल्ह्यात आहेत. आम्हाला अज्ञातवासात जाण्याची काही आवश्यकता नाही. पण अशाप्रकारे सुडाच्या भावनेतून कारवाई झाल्यास त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू, असेही राणे म्हणाले.

अधिवेशनातही उमटले पडसाद

विधिमंडळातही सोमवारी या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी बाजू मांडत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी केली. तर, त्यांच्या या मागणीवर गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी देखील सरकारची भूमिका स्पष्ट करत दोषींना सोडलं जाणार नाही, असे स्पष्ट केले.

सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडला मुद्दा –

शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू सोमवारी विधानसभेत बोलताना म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक सध्या जी सुरू आहे, त्या बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख संतोष परब बँकेचे मतदार देखील आहेत. त्यांच्यावर १८ डिसेंबरला जो एक भ्याड हल्ला झाला, खुनी हल्ला झाला त्याबद्दलची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवलेली आहे. यामध्ये सहा आरोपी सापडले आणि बाकीचे आरोपी अद्यापर्यंत सापडलेले नाहीत. या सभागृहाचे सदस्य त्या विभागाचे आमदार वैभव नाईक आज कणकवली पोलीस ठाण्यात निवेदन घेऊन गेले आहेत की, या सगळ्या परिस्थितीत सहा आरोपी सापडले उर्वरीत आरोपी का सापडले नाहीत?”

“मी नियम ३५ ची नोटीस काल देऊ शकलो नाही, म्हणून एका सदस्याची नाव घेत नाही. कारण, ज्याचं नाव या केसमध्ये आहे, त्या सदस्याला देखील अटक करावी अशी मागणी वैभव नाईक यांनी केलेली आहे. संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला त्यात सापडलेले सहा आरोपी, ज्या सदस्याचं नाव घेतलं जात आहे त्यांचा फोन संपर्क क्षेत्राबाहेर असणं आणि मग पोलिसांना ते सापडत नाहीत. नेमकं निश्चित संतोष परबच्या या केसमध्ये जे जे म्हणून आरोपी आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार का? हा खरा प्रश्न आहे. म्हणून वैभव नाईक यांनी जी मागणी केलेली आहे, की या सभागृहाचे जे सदस्य आहेत व ज्यांचं नाव याच्याशी जुडलेलं आहे त्यांना अटक करा. याबाबत लवकरात लवकर सरकारने कारवाई करावी.” अशी मागणी यावेळी सुनील प्रभू यांनी केली.

ज्याचा या प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असेल त्याला सोडलं जाणार नाही – शंभुराज देसाई

यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, “ सुनील प्रभू यांनी जो विषय उपस्थित केला आहे, त्याची गंभीर दखल गृहविभागाने घेतलेली आहे. अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे त्या प्रकरणाचा स्वत: तपास करत आहेत. त्यामधील एका आरोपीस काल दिल्लीतून अटक करून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. आज वैभव नाईक हे जे निवेदन घेऊन पोलीस अधीक्षकांकडे गेलेले आहेत, त्याची देखील चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले जातील. कुठलाही आरोपी ज्याचा थेट, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष याच्याशी संबंध असेल, त्याला सोडलं जाणार नाही. कोणाचा फोन संपर्कात असेल किंवा संपर्काबाहेर जरी असला आणि जर त्याचा त्यामध्ये संबंध असला, तर त्यावर पोलीस दलाकडून कठोर कारवाई केली जाईल.”

कोर्टात वकिलांची फौज –

जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी अडीचनंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोर्टात दोन्ही बाजूंकडून वकिलांची फौज उभी करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना वकील संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. त्यावेळी त्यांच्याबरोबर राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब, प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम सहकार्यासाठी असणार आहे. तर विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत आणि भूषण साळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is santosh parab attack case and how nitesh rane is involved in it sgy
First published on: 28-12-2021 at 14:06 IST