विश्लेषण : मोबाईल फॅन्टसी गेम आणि सट्टेबाजी…; दोहोंत फरक काय असतो? | Explained What is the difference between a mobile fantasy game and a betting game print exp abn 97 | Loksatta

विश्लेषण : मोबाईल फॅन्टसी गेम आणि सट्टेबाजी…; दोहोंत फरक काय असतो?

सर्व जण पैसे कमवत असताना चाहतेदेखील का मागे राहावे, यातूनच या फँटसी गेम्स ॲपची कल्पना पुढे आली.

विश्लेषण : मोबाईल फॅन्टसी गेम आणि सट्टेबाजी…; दोहोंत फरक काय असतो?
(फोटो सौजन्य – AP)

संदीप कदम

करोनातून सावरत सध्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) हंगाम महाराष्ट्रात बहरला आहे. प्रत्यक्षात किंवा टीव्हीवर हे सामने पाहत असतानाच अनेक क्रिकेटप्रेमी विविध प्रकारच्या फॅन्टसी गेममध्येही (काल्पनिक पण लाभकेंद्री खेळ) रमलेले आढळतात. हे खेळ अजून न खेळलेल्यांना त्याच्या जाहिराती नक्कीच आठवत असतील. या काल्पनिक लाभकेंद्री खेळांच्या उपयोजने किंवा ॲपबाबत अनेकांना प्रश्न असतात. ‘आयपीएल’ लिलावाच्या माध्यमातून अनेक खेळाडू कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात. मात्र, यामधून क्रिकेटचाहत्यांना किती पैसा मिळतो? सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पैसा भारतातून उभा राहतो आहे. सर्व जण पैसे कमवत असताना चाहतेदेखील का मागे राहावे, यातूनच या फँटसी गेम्स ॲपची कल्पना पुढे आली. यासाठी घरबसल्या चाहत्यांना ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही हा काल्पनिक खेळ कुठेही खेळू शकता. त्यामुळे काल्पनिक खेळ नक्की काय, तो कसा खेळला जातो, या खेळांवर पैसे लावणे म्हणजे सट्टा का, याच प्रश्नांचा आपण वेध घेणार आहोत.

फॅन्टसी गेम कोणत्या ॲपवर/वेबसाइटवर उपलब्ध आहेत?

भारतात सध्याच्या घडीला जवळपास ४५ क्रिकेट फॅन्टसी ॲप आहेत. यामध्ये ड्रीम ११, माय इलेव्हन सर्कल, मोबाईल प्रीमियर लीग (एमपीएल), गेमझी, हलाप्ले, बल्लेबाजी,  पेटीएम फर्स्ट गेम, ११ विकेट्स, फँटेन, स्टारपिक, वेलप्लेड, लीग११, मायटीम११, याहू फँटसी स्पोर्ट्स, रिअल1११, प्लेवन, हाऊझदॅट, लीगएक्स सारख्या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाइन काल्पनिक खेळ खेळू शकताे.

फॅन्टसी गेम कशा पद्धतीने खेळता येतो? किती रुपयांचा डाव खेळता येतो?

फॅन्टसी गेमचे स्वरूप जवळपास सारखे असते. मोबाइलवर ॲप डाऊनलोड केल्यानंतर बँकेप्रमाणे येथेही आपली माहिती म्हणजेच ‘केवायसी’ द्यावी लागते. तुम्हाला तुमचे नाव, ई-मेल आणि बँक खात्याची माहिती भरावी लागते. यासोबत पॅन किंवा आधार क्रमांकदेखील द्यावा लागतो. विशेष म्हणजे हा गेम खेळण्यासाठी १८ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. समजा ‘आयपीएल’ सामना आज संध्याकाळी होणार आहे. मग दोन्ही संघांचा अभ्यास करून आपल्याला ११ खेळाडूंची निवड करायची असते. यामध्ये आपण ‘पब्लिक कॉन्टेस्ट’मध्ये सहभागी होऊ शकता आणि यामध्ये हजारो लोक एकत्र हा गेम खेळतात. खेळाडूच्या सामन्यातील कामगिरीनुसार आपल्या गुण मिळतात. यामध्ये कर्णधाराला दुप्पट आणि उपकर्णधाराला दीडपट गुण मिळतात. तर, कोणी शतक झळकावले किंवा कोणी गोलंदाजाने पाच गडी बाद केले तर, खेळाडूंना अतिरिक्त गुण मिळतात. या गुणांनुसार विजेता ठरतो आणि त्याच्या खात्यात विजयी रक्कम जमा होते. काही ॲपवर एकाच वेळी तुम्ही तुमचे २० संघ तयार करू शकता अर्थात त्याचे पैसेदेखील तितकेच असतील. अनेक ॲपमध्ये काही रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत पैसे खर्च करून संघ तयार करू शकता.

फॅन्टसी गेम सट्टेबाजीपासून वेगळे कसे?

सर्वोच्च न्यायालयाने ३० जुलै २०२१च्या आदेशाद्वारे ऑनलाइन फँटसी गेमिंग साइट ड्रीम ११च्या फँटसी स्पोर्ट्स फॉरमॅटला कौशल्याचा खेळ म्हणून मान्यता दिली आहे. या आदेशाद्वारे गेमिंग म्हणजे जुगार व सट्टेबाजीच असा दावा करणारी विशेष याचिका फेटाळून लावली गेली. या याचिकेत ड्रीम ११ॲपद्वारे राबवण्यात येत असलेले खेळाचे स्वरूप हे जुगार, पैज आणि सट्टेबाजीचे आहे. यात कोणताही कौशल्याचा खेळ नाही, असा दावा केला होता. त्यामुळे तूर्तास तरी कायद्याच्या कचाट्यातून या फॅन्टसी गेमची सुटका झाली आहे. याबाबत अधिक सांगायचे म्हणजे ॲपच्या माध्यमातून हा खेळ खेळला जात असला तरीही आपली सर्व माहिती ॲपवर भरल्यानंतर डिजिटल पद्धतीने व्यवहार होतो. प्रत्येक ॲपचे एक वॉलेट असते आणि आपण ऑनलाइन पद्धतीने पैसे काढू अथवा भरू शकतो. त्यामुळे या सर्व व्यवहारांची नोंद आपल्याला दाखवता येऊ शकते. पण, सट्टेबाजीचा कोणताच हिशेब नसतो. याचप्रमाणे भारतात सट्टेबाजी बेकायदेशीर आहे. फॅन्टसी गेममध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी रक्कम ही त्या ॲपवर निर्धारित केलेली असते. यासोबत यामधील व्यवहारात कराचाही समावेश असतो. पण, सट्टेबाजीत तसे होत नाही. काल्पनिक खेळासाठी विविध पद्धतीची ऑनलाइन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असतात. सट्टेबाजीत मात्र कुठल्याही गोष्टीची शाश्वती नसते.

फॅन्टसी गेममध्ये एकूण किती उलाढाल आहे?

फेडरेशन ऑफ इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, जगामध्ये भारतात सर्वाधिक फॅन्टसी स्पोर्ट्सचा वापर केला जातो. जवळपास १३ कोटी लोक या खेळाचा आनंद घेतात. जवळपास ५,२०० कोटी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होते आणि यामध्ये येणाऱ्या दोन वर्षांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मोठ्या शहरांसोबतच छोट्या शहरांमध्ये हा फॅन्टसी स्पोर्ट्सचा वापर अधिक पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे स्मार्टफोन, स्वस्तात मिळणारा डेटा यामुळे देखील फॅन्टसी स्पोर्ट्सला फायदा होत आहे.

जाहिरातींसंदर्भात आलेल्या तक्रारींचे स्वरूप किंवा आक्षेप काय आहे?

मार्चमध्ये २८५ समाजमाध्यमाच्या जाहिरातींनी ‘एएससीआय’ नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले असून सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’वर ऑनलाइन रिअल-मनी गेमिंग उद्योगातील जाहिरातींसह, ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय) काही जाहिराती  मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करत नसल्याचे दाखवून दिले आहे. ‘एएससीआय’नुसार ट्वेन्टी-२० लीगच्या सुरू असलेल्या हंगामातील पहिल्या आठवड्यात ऑनलाइन रिअल-मनी गेमिंग कंपन्यांच्या ३५ जाहिराती प्रदर्शित केल्या आणि त्यामधील १४ जाहिराती नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले. ‘‘स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे असूनही, काही ऑनलाइन रिअल-मनी गेमिंग फर्म छुप्या मार्गाने प्रयत्न करत आहेत. ‘आयपीएल’ हे एक मोठे व्यासपीठ असल्याने, गेमिंग फर्म, ब्रॉडकास्टर, सेलिब्रिटी आणि जाहिरात निर्माते यासह सर्व पक्षांकडून जबाबदार वर्तन आवश्यक आहे. ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना सामोरे जावे लागणार नाही, याची खात्री करण्यासाठी सर्व पक्ष आपली भूमिका बजावतील अशी आम्हाला आशा आहे,’’ असे ‘एएससीआय’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरचिटणीस मनीषा कपूर म्हणाल्या. रिअल-मनी गेमिंगवरील ‘एएससीआय’ची मार्गदर्शक तत्त्वे १५ डिसेंबर, २०२०ला लागू झाली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-04-2022 at 07:19 IST
Next Story
विश्लेषण : कांजूरमार्ग कारशेडवरून वाद का?