वायू दलामध्ये लढाऊ विमानांचे अनन्य साधारण महत्व आहे. शत्रु प्रदेशात खोलवर मारा करण्यासाठी, हवाई वर्चस्व गाजवण्यासाठी, स्वप्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची लढाऊ विमाने ही सेवेत असतात. एककीडे लढाऊ विमानांना वायू दलात महत्व आहेच पण मालवाहु विमानांशिवाय वायू दलाच्या ताकदीचे वर्तुळ हे पुर्ण होऊ शकत नाही. वेगाने कसरती करत कमांडोना युद्धभुमिवर उतरवणे, लष्करासाठी आवश्यक मालवाहतुक करणे गरज पडल्यास आप्तकालिन नागरी वापराकरता धावून जाणे अशीही कामगिरी मालवाहु विमाने चोखपणे पार पाडतात. भारतीय वायू दलात असंच ताज्या दमाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले एअरबसचे ( airbus company) सी - २९५ ( C - 295 ) हे मालवाहू विमान दाखल झाले आहे. सोमवारी नवी दिल्ली इथल्या वायू दलाच्या तळावर एका शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सी - २९५ चा वायू दलात सहभागी होण्याचा शानदार कार्यक्रम पार पडला. हेही वाचा. मेंदूच्या पेशी कशा मृत पावतात? अल्झायमरच्या उपचारासाठी शास्त्रज्ञांनी लावला नवीन शोध सी - २९५ ची वैशिष्ट्ये काय आहेत? ४ ते १० टन वजन वाहून नेण्याची या मालवाहू विमानाची क्षमता आहे. तसंच एकाच वेळी सुमारे ७० सैनिकांना किंवा मग ४५ पेक्षा जास्त छत्रीधारी सैनिकांना ( paratroopers ) यामधून नेलं जाऊ शकतं. वैद्यकीय मदतीच्या वेळी सुमारे ३० स्ट्रेचर असलेल्या रुग्णांना हे विमान नेऊ शकते. या विमानाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हे कच्च्या धावपट्टीवरुन कमी अंतर कापत उतरण्याची किंवा उड्डाण करण्याची या विमानाची अनोखी क्षमता आहे. विशेष म्हणजे चीनच्या सीमेलगतत अत्यंत प्रतिकुल असं वातावरण असलेल्या विमानतळावर याचा वापर सहज शक्य होणार आहे. आप्तकालिन प्रसंगी नागरी वापराकरताही हे विमान महत्त्वाची भुमिका बजावू शकते. या विमानाच्या मागे असलेला दरवाजामुळे विविध कामांकरता याचा वापर करणे हे सहज सोपे ठरणार आहे. हेही वाचा. विश्लेषण : आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांच्या शतकपूर्तीचे भारताचे ध्येय साध्य होणार? नीरज चोप्रासह कोणत्या खेळाडूंकडून अपेक्षा? सी - २९५ ची विमान कोणाची जागा घेणार? सी - २९५ ही विमाने ब्रिटन बनावटीचे Hawker Siddeley HS 748 या विमानांची जागा घेणार आहे. सुमारे सहा टन वजन वाहुन नेण्याची क्षमता असलेले HS 748 हे मालवाहू विमान १९६० दशकात भारतीय वायू दलात झाले. गेली ५० वर्षे हे विमान भारतीय वायू दलाचा एक महत्त्वाचा भाग राहिले. मात्र जुनं झालेले तंत्रज्ञान, सुट्या भागांची कमतरता, होणारे अपघात यामुळे हे विमान सेवेतून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सी - २९५ समावेशामुळे टप्प्याटप्प्याने HS 748 विमाने पुढील काही वर्षात सेवेतून बाद केली जातील. हेही वाचा. विश्लेषण : कसोटी, एकदिवसीय, ट्वेन्टी-२०… क्रिकेटच्या तीनही प्रकारांत भारतीय संघ अव्वल कसा ठरला? सी - २९५ ची भारतात निर्मितीचे काय फायदे? आतापर्यंत भारतात विविध लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांची निर्मिती केली आहे. मात्र मालवाहू विमानांची निर्मिती कधी केली नाही. विविध मालवाहू विमाने ही थेट आयात करण्यात आली, परदेशाकडून विकत घेण्यात आली. एअरबस कंपनीची ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ ही कंपनी स्पेनमध्ये पहिली १६ सी - २९५ विमाने तयार करत भारताकडे सोपवणार आहे. तर उर्वरित ४० विमाने टाटाची कंपनी ‘ टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड’ ही एअरबसच्या मदतीने पुढील आठ वर्षात बडोदा इथे बनवणार आहे. एकुण २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असणार आहे. यामुळे पहिल्यांदाच भारतात मालवाहू विमाने बनवली जाणार असून अशी विमाने बनवण्याचा बहुमोल असा अनुभव एका भारतीय कंपनीला मिळणार आहे. यामुळे देशात रोजगार निर्मिती होणार आहे आणि विमानासाठी आवश्यक छोटे भाग तयार करण्याचा अनुभव देशातील उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. या सर्व घडामोडींमुळे भविष्यात विविध वजन वाहुन नेणाऱ्या मालवाहु विमानांची निर्मिती भारतात शक्य होणार आहे.