मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे नियंत्रण कायदा (PMLA) अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. याआधीही ईडीने अनिल परब यांची चौकशी केली आहे.

जाणून घेऊयात अनिल परब कोण आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचं कारण काय आहे.

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

कोण आहेत अनिल परब?

५६ वर्षीय अनिल परब विधीमंडळातील वरिष्ठ सभागृह विधान परिषदेत तीन वेळा आमदार राहिले आहेत. डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करुन घेतला.

व्यवसायाने वकील असणारे अनिल परब हे ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जाणारे अनिल परब हे पक्षाची कायदेशीर बाजूदेखील सांभाळतात. याशिवाय मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची असते. पालिका निवडणुकीच्या रणनीतीकारांपैकी ते एक आहेत.

PHOTOS: ईडीने अनिल परबांशी संबंधित जागांवर छापेमारी केलेली ‘ती’ सात ठिकाणं कोणती?

२००१ मध्ये विभाग प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. दोन विभागांची एकाच वेळी जबाबदारी असणारे ते एकमेव नेते आहेत. वांद्रे ते अंधेरीपर्यंत त्यांचं कार्यक्षेत्र आहे.

अनिल परब यांच्यावर काय आरोप आहेत?

सप्टेंबर २०२१ मध्ये अनिल परब राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लाचखोरी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाले होते. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी १० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी अनिल परब यांना करोडोंची लाच मिळाल्याचा आरोप केल्यानंतरही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं.

सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र सादर करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही अनिल परब तपास यंत्रणेच्या रडारवर आले होते. अनिल परब यांनी एका खासगी ट्रस्टकडून ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्यास सांगितलं होतं असा दावा सचिन वाझे यांनी पत्रात केला होता.

अनिल परब यांनी मुंबई पालिकेच्या यादीतील फसव्या कंत्राटदारांच्या विरोधात चौकशी करण्यास सांगितले आणि अशा जवळपास ५० कंत्राटदारांकडून किमान दोन कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले असा आरोपही सचिन वाझेंनी केला होता. अनिल परब यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

नाशिकच्या आरटीओतील निलंबित अधिकारी गजेंद्र पाटील यांनीदेखील अनिल परब आणि इतर सहा अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा, करोडोंची रक्कम गोळा केल्याचा आरोप केला होता. आरटीओमध्ये बदली करण्यासाठी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता.

अनिल परब शिवसेनेसाठी इतके महत्वाचे का आहेत?

२०१७ मध्ये शिवसेना-भाजपाची युती तुटल्यानंतर आणि दोन्ही पक्ष मुंबई पालिका निवडणूक स्वतंत्र लढल्यानंतर अनिल परब यांना महत्व प्राप्त झालं. निवडणुकीदरम्यान अनिल परब यांनी भाजपाने केलेल्या सर्व हल्ले, आरोपांना कायदेशीर उत्तरं देत पक्षाची बाजू लढवली. भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनाही त्यांनी कायद्याच्या भाषेत उत्तर दिलं.

काही महिन्यांमध्येच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बाजूला करत अनिल परब यांची विधानपरिषदेतील गटनेतेपदी वर्णी लागली.

गेल्या अनेक वर्षांपासून अनिल परब यांची मातोश्रीसोबत जवळीक वाढली असून पक्षात महत्वाच्या भूमिका निभावत उद्धव ठाकरेंचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आलं आहे. २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाची रणनीती ठरवण्यात मोलाची भूमिका निभावली होती.

डिसेंबर २०१९ मध्ये ठाकरेंनी वरिष्ठ नेत्यांना बाजूला करत अनिल परब यांना मंत्रीपदाची ऑफर दिली. तेव्हापासून अनिल परब पक्षाची बाजू लढवत असून अनेक मुद्द्यांवरून भाजपावर हल्ला चढवत आहेत.

पक्षाचं नेतृत्व हाऊसिंग, कायदेशीर, मुंबई पालिका, प्रशासन आणि पक्षासाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर सर्व महत्त्वाच्या बाबींसाठी अनिल परब यांचा सल्ला घेतं असं म्हटलं जातं.