शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं असताना चंद्रकांत पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. बुधवारी महाविकास आघाडी सरकार राजकीय संकटाचा सामना करत असताना दुपारी ३ च्या सुमारास महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तीन शिवसेना आमदारांना घेऊन जाण्यासाठी चार्टर्ड विमानाने सूरतमध्ये दाखल झाल्याची चर्चा होती. गुवाहाटीत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होण्यासाठी चंद्रकांत पाटील या आमदारांना घेऊन जात असल्याचं बोललं जात होतं. पण हा नावाचा गोंधळ असल्याचं नंतर स्पष्ट झालं.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारल्यानंतर २० आमदारांना घेऊन मुंबईहून सूरत गाठलं होतं. सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे इतर आमदारांसोबत वास्तव्यास होते. सूरतमध्ये असताना शिवसेनेचे इतरही आमदार त्यांच्या गोटात सहभागी झाले. यानंतर एकनाथ शिंदेंनी आमदारांसहित भाजपाशासित राज्य आसामच्या गुवाहाटीमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम हलवला होता.

अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील गुवाहाटीला जाण्यासाठी सूरतमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे योगेश कदम, गुलाबराव पाटील, अपक्ष आमदार गोपाळ दळवी आणि मंजुळा गावित होते. याच चंदकांत पाटील नावामुळे हा गोंधळ झाला असल्याचं नंतर स्पष्ट झालं.

मात्र महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रम उलगडत असताना राजकारणात तीन चंद्रकांत पाटलांची चर्चा आहे. यामधील एक चंद्रकांत रघुनाथ पाटील हे गुजरातमधील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

हे तीन चंद्रकांत पाटील नेमके कोण आहेत आणि महाराष्ट्रातील राजकीय बंडासोबत त्यांचा काय संबंध आहे त्याबद्दल जाणून घेऊयात…

१) चंद्रकांत बच्चू पाटील, महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष

६३ वर्षीय चंद्रकांत बच्चू पाटील हे महाराष्ट्रातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. चंद्रकांत पाटील हे कोथरुड मतदारसंघातून आमदार आहेत. महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपा आमदार संजय कुटे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करतील असं सांगितलं होतं. एकनाथ शिंदे त्यावेळी आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये होते.

चंद्रकांत पाटील यांनी भाजपा पक्षाला मात्र शिवसेनेच्या बंडापासून दूर ठेवलं आहे. पण जर एकनाथ शिंदे गटाने भाजपाला सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव दिल्यास यावर नक्की विचार करु असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

“सध्या काहीही बोलणं घाईचं ठरेल. पण आम्ही प्रतिक्षा करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. एकनाथ शिंदे यांनी भाजपाला कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसून आमच्याकडूनही कोणता प्रस्ताव देण्यात आलेला नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

२) चंद्रकांत रघुनाथ पाटील, गुजरात भाजपा प्रदेशाध्यक्ष

६६ वर्षीय चंद्रकांत रघुनाथ पाटील जुलै २०२० पासून गुजरात भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी आहेत. चंद्रकांत रघुनाथ पाटील हे ज्येष्ठ नेते असून तीन वेळा नवसारी मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. चंद्रकांत रघुनाथ पाटील हे मूळचे महाराष्ट्रातल्या जळगावचे आहेत.

महाराष्ट्रात राजकीय बंड पुकारण्यात आलं असता सूरतमध्ये सर्व घडामोडी घडत होत्या. यावेळी चंद्रकांत पाटील पडद्यामागून सर्व सूत्रं हलवत होते अशी चर्चा आहे. सूरतमध्ये शिवसेना आमदार विमानतळावर पोहोचल्यापासून ते त्यांना मेरिडियन हॉटेलमध्ये नेईपर्यंत सर्व जबाबदारी परेश पटेल यांच्यावर होती. परेश पटेल हे चंद्रकांत पाटील यांचे जवळचे सहकारी तसंच सूरत पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत.

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना सूरतपासून गुवाहाटीपर्यंत पोहोचवण्यासाठी परेश पटेल यांनीच सर्व व्यवस्था केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या नवसारी मतदारसंघात सूरतचा महत्त्वाचा भाग आहे.

३) चंद्रकांत निंबा पाटील, अपक्ष आमदार

४८ वर्षीय चंद्रकांत निंबा पाटील हे जळगावमधील मुक्ताईनगरमधून अपक्ष आमदार आहेत. चंद्रकांत निंबा पाटील बुधवारी सकाळी विमानाने गुवाहाटीत दाखल झाले आणि एकनाथ शिंदे गटात सामील झाले. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत इतर दोन शिवसेना आमदार आणि दोन अपक्ष आमदारदेखील होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained who is chandrakant patil and maharashtra political crisis sgy
First published on: 24-06-2022 at 19:03 IST