विश्लेषण: आधी जडेजा, आता बुमरा! भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींच्या सत्राला जबाबदार कोण? | Explained Who is responsible for injury of Indian Cricketers Ravindra Jadeja Jasprit Bumrah print exp sgy 87 | Loksatta

विश्लेषण: आधी जडेजा, आता बुमरा! भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींच्या सत्राला जबाबदार कोण?

खेळाडूंना होणाऱ्या या दुखापती आणि यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) भूमिका याचा घेतलेला आढावा

विश्लेषण: आधी जडेजा, आता बुमरा! भारतीय क्रिकेटपटूंच्या दुखापतींच्या सत्राला जबाबदार कोण?
दुखापतीमुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम

अन्वय सावंत

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकण्याची दाट शक्यता आहे. बुमराची विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. त्यातच ऑस्ट्रेलियातील अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीला अनुकूल असल्याने बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू न शकणे हा भारतासाठी खूप मोठा धक्का आहे. बुमरापूर्वी डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाही दुखापतीमुळेच या स्पर्धेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या काही काळात भारताच्या बऱ्याच क्रिकेटपटूंना विविध दुखापतींमुळे काही महत्त्वाच्या सामन्यांना आणि स्पर्धांना मुकावे लागले आहे. याचा भारतीय संघाच्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे. खेळाडूंना होणाऱ्या या दुखापती आणि यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) भूमिका याचा घेतलेला आढावा.

बुमराचा दुखापतींचा इतिहास काय?

बुमराला सर्वप्रथम २०१८मध्ये अंगठ्याची दुखापत झाली. त्यानंतर २०१९मध्ये त्याने वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी सामन्यांत हॅटट्रिकसह १३ बळी मिळवले. मात्र, या दौऱ्यानंतर त्याच्या पाठीला दुखापत झाली आणि त्याला मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकावे लागले. त्याने इंग्लंडमध्ये जाऊन दुखापतीवर उपचार घेतले. त्यानंतर तो बराच काळ तंदुरुस्त राहिला आणि त्याने भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या फळीचे यशस्वीपणे नेतृत्व केले. मात्र, सातत्याने क्रिकेटचे तिन्ही प्रकार आणि ‘आयपीएल’मध्ये खेळल्यामुळे यावर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा त्याची पाठ दुखावली. त्याला अमिराती येथे झालेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेलाही मुकावे लागले.

हेही वाचा – विश्लेषण : महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतला, मग अन्य क्रिकेट लीगमध्ये का खेळत नाही? नेमके कारण काय?

बुमराला तंदुुरुस्त घोषित करण्याची घाई?

बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठीच्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर बुमराला ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त घोषित केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. मात्र, या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी त्याची अंतिम ११ खेळाडूंमध्ये निवड झाली नाही. त्यामुळे बुमरा खरेच पूर्णपणे तंदुरुस्त आहे का, असा प्रश्न क्रिकेटचे जाणकार आणि चाहत्यांना पडला. तो या मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात खेळला. परंतु त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या सराव सत्रादरम्यान बुमराची पाठ पुन्हा दुखावली. त्यामुळे त्याला पहिल्या सामन्याला मुकावे लागले. मग तो या संपूर्ण मालिकेलाच नाही, तर ट्वेन्टी-२० विश्वचषकालाही मुकण्याची शक्यता असल्याचे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे तंदुरुस्त नसतानाही बुमराला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आले का, ‘बीसीसीआय’ आणि ‘एनसीए’कडून बुमराबाबत हलगर्जी झाली का, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत.

गेल्या काही काळात कोणकोणते खेळाडू जायबंदी झाले आहेत?

आता क्रिकेट सामन्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारताच्या प्रमुख खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देण्यात येते. असे असतानाही गेल्या काही काळात विविध भारतीय क्रिकेटपटूंना दुखापतींशी झगडावे लागले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेले कर्णधार रोहित शर्मा (पाठ), केएल राहुल (शस्त्रक्रिया), भुवनेश्वर कुमार (पाय), दीपक चहर (पाय व पाठ), हर्षल पटेल (बरगड्या), दीपक हुडा (पाठ) यांसारख्या खेळाडूंना गेल्या वर्षभराच्या कालावधीत दुखापती झाल्या आहेत. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्याची तंदुरुस्ती हा भारतासाठी कायमच चिंतेचा विषय असतो. हार्दिकला २०१८च्या आशिया चषकात पाठीची दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतर तो बराच काळ मैदानाबाहेर होता. तसेच मैदानावर पुनरागमन झाल्यानंतरही त्याने जवळपास दोन वर्षे गोलंदाजी करणे टाळले. त्याने यंदाच्या ‘आयपीएल’पासून पुन्हा गोलंदाजी करण्यात सुरुवात केली आहे.

खेळाडूंच्या दुखापतींना जबाबदार कोण?

दुखापती हा खेळाचा एक भाग मानला जातो. त्यामुळे काही खेळाडू जायबंदी होणे आणि सामन्यांना मुकणे, हे संघांना अपेक्षितच असते. परंतु गेल्या काही काळात जायबंदी होणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्या वाढते आहे. तसेच त्यांना दुखापतीतून सावरण्यासाठीही बराच वेळ लागत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आधी राहुल द्रविड आणि आता व्हीव्हीएस लक्ष्मणच्या अध्यक्षतेखाली बंगळूरुच्या ‘एनसीए’मध्ये बरेच चांगले बदल करण्यात आले आहेत. जायबंदी झाल्यानंतर उपचार घेण्यासाठी खेळाडू त्वरित ‘एनसीए’मध्ये दाखल होतात. तेथे ‘बीसीसीआय’च्या म्हणण्यानुसार त्यांना सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. खेळाडूंची यो-यो तंदुरुस्ती चाचणी होते. खेळाडूंना सर्वोत्तम फिजिओ आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाते. मात्र, त्यानंतरही खेळाडूंना तंदुरुस्तीसाठी झगडावे लागणे ही नक्कीच चिंतेची बाब आहे. तसेच संघ व्यवस्थापन आणि निवड समितीकडून खेळाडूंना सातत्याने विश्रांती दिली जात आहे. मात्र, याचा खेळाडूंना कितपत फायदा होतो, हासुद्धा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: ‘बायोमायनिंग’ प्रक्रिया काय आहे? कचरा समस्या सोडवण्यासाठी ही प्रक्रिया कशी उपयुक्त ठरते?

संबंधित बातम्या

IND vs NZ 2nd ODI: करो या मरो! मालिका वाचवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक, कशी असेल प्लेईंग ११ जाणून घ्या
विश्लेषण: कुत्र्यांच्या ‘या’ ११ प्रजातींवर गुरुग्राममध्ये बंदी! नेमकं घडलंय काय? का होतोय या कुत्र्यांना विरोध?
Fifa World Cup 2022: “फुटबॉलचं असं वेड इस्लामविरोधी”, केरळमधील धर्मगुरूंचा मुस्लिमांना सल्ला
IND vs NZ ODI Series: न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका तुम्हाला या चॅनलवर live पाहता येणार तेही अगदी निशुल्क
विश्लेषण : ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहिना मिळणार ९२५० रुपये! काय आहे सरकारची वय वंदन योजना? कसा मिळणार लाभ?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पैशांचा अपहार झालाय? चिंता करू नका, Cyber Fraud झाल्यावर या नंबरवर कॉल करा अन् पैसै वाचवा
“…तेव्हा तेव्हा विक्रमकाका तुमची उणीव भासत राहील” अमोल कोल्हे हळहळले
‘Squid Game’ या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पाच वर्षांपूर्वी घडलेला प्रकार आला समोर
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी
IND vs NZ 2nd ODI: करो या मरो! मालिका वाचवण्यासाठी भारताला दुसऱ्या सामन्यात विजय आवश्यक, कशी असेल प्लेईंग ११ जाणून घ्या