बोरिस जॉन्सन सरकारमधील विद्यमान मंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी नाधिम झहावी यांची ब्रिटनचे नवीन अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

भारतीय वंशाच्या इन्व्हेस्टमेंट बँकरपासून राजकारणी झालेल्या ऋषी सुनक यांनी मंगळवारी जॉन्सन सरकारमधील एका घोटाळ्यानंतर राजीनामा दिला. तसेच आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनीही राजीनामा दिला आहे. सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा रिचमंड मतदारसंघातून ब्रिटीश संसदेत निवडून आले होते. सुनक २०१७ मध्ये पुन्हा निवडून आले होते. सुनक यांचे लग्न इन्फोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या कन्या अक्षता मूर्तीशी झाले आहे.

ऋषी सुनक यांची जागा घेणारे झहावी हे २०१० मध्ये खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. रॉयटर्सच्या अहवालानुसार, त्यांचा जन्म इराकी कुर्दिस्तानमध्ये झाला होता. १९७८ मध्ये त्यांच्या कुटुंबाने इराकमधून पळून काढल्यानंतर झहावी ११ वर्षांचे असताना ते इंग्लंडमध्ये आले. शिक्षकांनी झहावीच्या पालकांना इशारा दिला की त्याला सुरुवातीला इंग्रजी बोलण्यात अडचणी आल्याने त्यांना शिकण्यात अडचणी येऊ शकतात.

राजकारणाकडे वळण्यापूर्वी ५५ वर्षीय नाधिम झहावी यांनी एक व्यावसायिक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. ते कादंबरीकार आणि माजी खासदार जेफ्री आर्चर यांचे सल्लागार होते. कोविडच्या दरम्यान ब्रिटनच्या यशस्वी लसीकरण मोहिमेवर देखरेख करण्याच्या त्यांच्या भूमिकेसाठी झहावी प्रसिद्ध झाले होते. संपूर्ण पार्टीगेट घोटाळ्यात त्यांनी बोरिस जॉन्सन यांचे समर्थनही केले होते.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नाधिम झहावी आणि त्यांच्या पत्नीकडे १७ दशलक्ष पौंड किमतीची तीन लंडनमध्ये, एक वॉर्विकशायरमध्ये आणि एक दुबईमध्ये अशी पाच निवासस्थाने आहेत.

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे दीर्घकाळ सदस्य असलेल्या झहावी यांनी १९९० च्या दशकात कादंबरीकार आणि राजकारणी जेफ्री आर्चर यांचे सहाय्यक म्हणून काम केले. आर्चर यांना २००१ मध्ये खोट्या साक्षीसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते.

२०० मध्ये त्यांनी YouGov या कंपनीची सह-स्थापना केली आणि २०१० पर्यंत ते तिचे मुख्य कार्यकारी होते. त्यांनी या कंपनीला ब्रिटनच्या सर्वोच्च बाजार संशोधन कंपन्यांपैकी एक बनवले. झहावी २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि विजयी झाले होते.

शिक्षण आणि व्यवसाय विभागांमध्ये कनिष्ठ मंत्रिपदाच्या भूमिकेत काम केल्यानंतर, त्यांना २०२० मध्ये कोविड-१९च्या लसीकरण कार्यक्रमाचे कामाचे प्रभारी मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. २०२१ मध्ये, बोरिस जॉन्सन यांनी त्यांची मंत्रीमंडळामध्ये शिक्षण सचिव म्हणून नियुक्ती केली.