scorecardresearch

विश्लेषण : विम्बल्डन स्पर्धेत टेनिस क्रमवारीचे गुण का दिले जाणार नाहीत?

टेनिसमधील प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड क्लबने विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी रशियासह बेलारूसच्या खेळाडूंना खेळण्यास मज्जाव केला

Wimbledon

संदीप कदम

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. क्रीडा क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहिलेले नाही. अनेक खेळांमध्ये रशियन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली. बेलारूसने रशियाला मदत केल्याने त्यांच्या खेळाडूंनाही याचा फटका बसला आहे. टेनिसमधील प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड क्लबने विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी रशियासह बेलारूसच्या खेळाडूंना खेळण्यास मज्जाव केला. हा निर्णय न पटल्याने यंदा कोणत्याच खेळाडूंना गुण न देण्याचा निर्णय टेनिस संघटनांनी घेतला आहे. त्यांनी असा निर्णय का घेतला, आगामी काळातही ग्रँडस्लॅम स्पर्धेबाबत खेळाडू संघटनांची भूमिका अशीच राहील का, याचा हा आढावा.

– विम्बल्डन स्पर्धेत गुण न देण्याचे कारण काय?

युक्रेनवरील आक्रमणानंतर ऑल इंग्लंड क्लबने रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घातल्याने यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी क्रमवारीचे गुण दिले जाणार नाहीत, असा निर्णय महिला टेनिस संघटना (डब्ल्यूटीए) आणि व्यावसायिक टेनिस संघटनेतर्फे (एटीपी) घेण्यात आला.  विम्बल्डन स्पर्धेला २७ जूनपासून सुरुवात होणार आहे. परंतु क्रमवारीच्या निर्णयामुळे तांत्रिकदृष्ट्या ही स्पर्धा केवळ प्रदर्शनीयच ठरण्याची शक्यता आहे. खेळाडूंना गुण मिळणार नसले तरीही ही स्पर्धा जिंकण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे आघाडींच्या खेळाडूंमध्ये जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल.

– ‘एटीपी’ आणि ‘डब्ल्यूटीए’ची या नियमाबाबत काय भूमिका आहे?

एप्रिलमध्ये ऑल इंग्लंड क्लबने रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंना विम्बल्डनमध्ये खेळण्यास बंदी घातल्यानंतर गतविजेता नोव्हाक जोकोव्हिचसह अनेक प्रमुख खेळाडूंनी टीका केली होती. त्यानंतर ‘एटीपी’कडून एक निवेदन काढण्यात आले. ‘‘कोणत्याही खेळाडूला त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर स्पर्धेत प्रवेश दिला जातो. कोणत्याही देश आणि त्याचे राष्ट्रीयत्व पाहून तो देण्यात येत नाही. आम्हाला इच्छा नसताना हे पाऊल उचलावे लागत आहे. खेळाडूंच्या हक्काचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. विम्बल्डन ही एक मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यामुळे क्रमवारीच्या गुणपद्धतीवरील परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला आहे,’’ असे ‘एटीपी’कडून सांगण्यात आले आहे.

‘डब्ल्यूटीए’ने आपल्या निवेदनात म्हटले, “जवळपास ५० वर्षांपूर्वी, सर्व खेळाडूंना गुणवत्तेवर आणि भेदभाव न करता स्पर्धा करण्याची समान संधी या मूलभूत तत्त्वावर ‘डब्ल्यूटीए’ ची स्थापना करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना केवळ त्यांच्या राष्ट्रीयत्वामुळे किंवा त्यांच्या देशातील सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे दंड आकारला जाऊ नये किंवा त्यांना स्पर्धा करण्यापासून रोखले जाऊ नये, असा विश्वास ‘डब्ल्यूटीए’ला आहे.’’ यावर्षीच्या विम्बल्डनमधील कनिष्ठ आणि व्हीलचेअर स्पर्धांसाठीही गुण दिले जाणार नाही, असे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडून सांगण्यात आले.

– कोणकोणते नामांकित खेळाडू विम्बल्डन स्पर्धेला मुकणार आहेत?

ऑल इंग्लंडच्या बंदीमुळे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेता आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला डॅनिल मेदवेदेव जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेला आंद्रे रुबलेव्ह हे पुरुष खेळाडू तर, गेल्या हंगामात विम्बल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेली आर्यना सबालेंका आणि ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा दोन वेळा जिंकणारी माजी अग्रमानांकित व्हिक्टोरिया अझारेंका या महिला खेळाडूंना स्पर्धेला मुकावे लागणार आहे. डॅनिल मेदवेदेव आणि आंद्रे रुबलेव्ह हे रशियाचे तर आर्यना सबालेंका आणि व्हिक्टोरिया अझारेंका हे बेलारूसचे खेळाडू आहेत.

– अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंबाबत काय निर्णय घेण्यात येईल?

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे आयोजक असणाऱ्या अमेरिकन टेनिस संघटनेने (युएसटीए) अद्यापही रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंबद्दल निर्णय जाहीर केलेला नाही. या स्पर्धेचे आयोजन २९ ऑगस्टपासून होणार आहे. ‘‘ रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे विम्बल्डन स्पर्धेला ज्या कठीण स्थितीचा सामना करावा लागत आहे, त्याची कल्पना आम्हाला आहे,’’ असे ‘युएसटीए’चे प्रवक्ते ख्रिस विडमायर म्हणाले. ‘‘ ज्या पद्धतीने पुरुष आणि महिला दोन्ही संघटनांकडून प्रतिसाद देण्यात आला, त्याचा आम्ही आदर करतो. मात्र, यावर्षी विम्बल्डन खेळणाऱ्या सर्वांकडून गुण काढून घेण्याचा त्यांचा निर्णय हा गंभीर आहे.’’, असे संघटनेने म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why arent tennis rank points awarded at wimbledon print exp 0522 abn