सचिन रोहेकर

शेअरमधील गुंतवणुकीच्या मार्गावर धोक्याची अनेक वळणे असतात आणि येथे अपघाताची जोखीम अटळ मानली जाते. ज्यांनी येथे यश अनुभवले आणि अचंबा वाटेल इतकी संपत्ती निर्माण करून ती टिकवलीही, त्यामध्ये ‘बिग बुल’ म्हणून ओळख निर्माण करणारे राकेश झुनझुनवाला यांचे नाव अग्रणी आहे. संशोधन आणि अभ्यासपूर्वक निवडीतून दीर्घोद्देशी गुंतवणुकीचे तत्त्व नेटाने पाळणाऱ्या झुनझुनवाला यांचा भारतीय भांडवली बाजाराबद्दल आशावादही मोठा दुर्दम्य आणि दूरगामी स्वरूपाचा होता. म्हणूनच दोन वर्षापूर्वी एका मुलाखतीत त्यांनी भारताच्या बाजारात १९८१पासूनच प्रदीर्घ तेजीचा प्रवाह सुरू असल्याचा निःसंशय दावा केला होता. त्यांना या दाव्यातून नेमके काय सुचवायचे होते? त्यांनी सांगितलेल्या कालखंडाबद्दल इतके विशेष काय आहे? सध्याच्या बदलत्या जागतिक अर्थचित्रामुळे या तेजीला लवकरच खंड पडल्याचे दिसेल काय?

राकेश झुनझुनवाला यांचा दावा आश्चर्यजनक का ठरला होता?

संपूर्ण जगाला करोना महासाथीने वेढलेले असताना तशा अनिश्चित काळात जुलै २०२० मध्ये, तेजीबद्दलचा आशावाद व्यक्त करणारा दावा राकेश झुनझुनवाला यांनी एका वित्तीय दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. २३ मार्च २०२०ला भारतात जाहीर झालेल्या देशव्यापी करोना टाळेबंदीच्या घोषणेचे बाजारात प्रचंड भीतीयुक्त पडसाद उमटले. उद्याचा सूर्य उगवताना दिसणारच नाही अशा धारणेतून बाजारात विक्रीचा सपाटा सुरू होती. ही भयाण पडझड पाहता, शेअर बाजारातील व्यवहारही काही काळासाठी स्थगित केले जावेत अशी ओरड सुरू होती. अर्थात पुढे काही दिवसांतच बाजार सावरताना दिसला तरी त्या समयी तेजीविषयी भाकिते करणे धाडसाचे होते. तशा समयी मोठ्या पडझडीचा धुरळा झटकून बाजाराने दाखविलेल्या उभारीचे उदाहरण सादर करीत, झुनझुनवाला यांनी १९८१ पासून सुरू असलेल्या प्रदीर्घ तेजीचाच हा अखंड प्रवाह सुरू असल्याचे विधान केले. ‘अधेमधे असे वादळी चढ-उतार दिसतील, पण तरी तेजी निरंतर पुढे सरकतच राहील,’ असे त्यांनी बिनदिक्कत सांगितले.

राकेश झुनझुनवालांच्या २९ हजार ७०० कोटींच्या शेअर्सचं काय होणार?

त्यांनी १९८१ सालाची निवड का केली?

झुनझुनवाला यांनी मुलाखतीत यासंबंधाने सविस्तर मत मांडलेले नाही, तरी त्यांचा संदर्भ आणि संकेत कशा दिशेने आहे, हे सांगता येऊ शकेल. जगभरातील भांडवली बाजारासाठी संपूर्ण ऐंशीचे दशक निराशादायी ठरले होते. परंतु त्यापुढचा काळ हा निराशेच्या गर्तेतून मोठ्या उत्साहपूर्ण झेपेचा होता. अमेरिकी भांडवली बाजाराचे उदाहरण द्यायचे तर, डाऊ जोन्स निर्देशांकाने १९६८ सालाला ९४३ अंशावर निरोप दिला होता आणि १९८१ च्या अखेरीस तो ८७५ वर होता. संपूर्ण तेरा वर्षात तो असाच एकाच पातळीवर घुटमळलेला होता. पण त्यानंतर मात्र त्याने मोठी झेप घेतली आणि दशकभरात ३,१६८ ची पातळी गाठली. भारतीय भांडवली बाजारातही तेव्हापासून निर्देशांकांनी वार्षिक १२ टक्क्यांहून अधिक चक्रवाढ दराने वाढ साधली आहे. प्रदीर्घ तेजीकडील त्यांचा संकेत हाच असावा.

शेअर बाजाराने त्या काळात तीव्र गतीने उसळी घेण्याचे कारण काय?

जगभरातील अनेक घडामोडींनी त्या काळावर अमीट छाप सोडली आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून रोनाल्ड रेगन यांची निवड झाली. ५ ऑगस्ट १९८१ रोजी, रेगन यांनी संपावर असलेल्या हजारो हवाई वाहतूक नियंत्रकांना तडकाफडकी निलंबित करण्याचा निर्णय घेऊन इतिहास घडविला. अमेरिकेत त्या काळात जोर पकडत असलेल्या कामगारांच्या चळवळी आणि शक्तीवर निर्णायकपणे अंकुश आणणारे ते पाऊल ठरले. दुसरीकडे काही वर्षांनंतर, ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचर यांनी खाण कामगारांचा संपही असाच मोडून काढला. रेगन आणि थॅचर दोघेही मुक्त-बाजार व्यवस्थेचे शिल्पकार. त्यांनी राज्यशकटाची नवीन विचारसरणी पुढे आणली, जी पुढे नवउदारवाद म्हणून ओळखली जाऊ लागली. सत्तेचा अक्ष निर्णायकपणे श्रमाकडून भांडवलाकडे त्यातून वळताना दिसून आला. हा तोच कालखंड आहे ज्यावेळी प्रमुख विकसित अर्थव्यवस्थांमध्ये कमी चलनवाढ आणि परिणामी कमी व्याजदरांचे युग हे अनेक दशके टिकून राहिले. ‘द ग्रेट मॉडरेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या काळातच अत्यल्प व्याजदर असल्यामुळे पैसा समभाग गुंतवणुकीकडे वळताना दिसून आल्याचे झुनझुनवाला यांनी त्या मुलाखतीतच सांगितले होते.

हेही वाचा – विश्लेषण: ‘२०४७ पर्यंत अखंड भारत’ हे RSS चं लक्ष्य पण ‘अखंड भारत’ म्हणजे काय? त्यातून कोणते प्रांत देश म्हणून अस्तित्वात आले?

काळाच्या त्या प्रवाहाचे भारतासह अन्यत्र पडसाद कसे उमटले?

ऐंशीच्या दशकातच जागतिकीकरणाला सुरुवात झाली. चीनने परदेशी भांडवलाच्या स्वागताचे धोरण स्वीकारले आणि जगातील पहिली चार विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) तेथे १९८० मध्ये सुरूही झाली. सोव्हिएत युनियनचे पतन आणि चीनही आर्थिक उदारीकरणाकडे वळल्याने भांडवलशाहीला प्रतिस्पर्धीच राहिला नाही. ‘इतिहासाचा अंत’, ‘युगान्त पर्व’ असे त्या कालखंडाबाबत सर्वत्र वर्णन केले जाऊ लागले. भारतातही उदारीकरण धोरणाची बीज-पेरणी वस्तुतः ऐंशीच्या दशकापासूनच झाली. मात्र त्याला अंकुर फुटण्यासाठी आणखी एका दशकाची वाट पाहावी लागली. नव्वदच्या दशकात, जागतिकीकरण आणि नियंत्रणमुक्तीमुळे विकसित देशांमधून उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये भांडवलाचा मुक्त प्रवाह सुरू झाला. काळाची पावले ओळखून ज्यांनी या प्रवाहाशी जुळवून घेतले त्यांच्यासाठी ते सुवर्णयुग ठरले. हे काही व्यापक संकेत होते ज्यामुळे झुनझुनवाला यांचा दीर्घोद्देशी बाजार तेजीबद्दलचा विश्वास दुणावत गेला.

यापुढे तेजी अशीच टिकून राहिल काय?

काळ बदलतो तशा समजुती आणि धारणाही बदलाव्या लागतात. अगदी अलिकडच्या घटना ज्याने जागतिकीकरणापुढे, किंबहुना भांडवलशाही व्यवस्थेपुढे आव्हान उभे केले आहे. भू-राजकीय संकटांची मालिकाच सुरू असून, जगाची वाटचाल एका नवीन शीतयुद्धाच्या दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः जगभरात मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढीचे चक्र आक्रमकपणे सुरू केले आहे. त्याचे भोग म्हणून भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये गुंतलेली विदेशी गुंतवणूक वेगाने माघारी चालली आहे. पण तरी तेजीच्या बाजाराला अलविदा म्हणण्याची वेळ आलेली नसल्याचे झुनझुनवाला निशंकपणे म्हणत असत. ‘जागतिकीकरण एक पाऊल मागे सरकल्याचे दिसत असले, तरी मोठ्या घुसळणीतून घडून आलेल्या प्रक्रियेची खोली आणि गरज ही सामान्यजनांच्या लक्षात येणार इतकी किती तरी मोठी आहे आणि ती पुढेही राहणार,’ असा आशावाद त्यांनी कायम जपला. विशेष म्हणजे इतरांकडूनही तो अनुसरला जावा यासाठी ते प्रयत्नरत असत.