वैशाली चिटणीस
मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना गुजरात पोलीसांनी मुंबईत येऊन अटक केल्यानंतर अहमदाबाद न्यायालयाने त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसंदर्भात एक एसआयटी नव्याने स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखीही काही जणांची चौकशी होणार असल्याचे संकेत आहेत. काय आहे हे सगळे प्रकरण?

तिस्ता सेटलवाड यांना अटक का झाली आहे?

sandeshkhali shahajahan shiekh
Sandeshkhali Case: लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्याला अटक नेमकी कशी झाली?
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

गोधरा जळितकांडानंतर २००२मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली होती. त्यात अहमदाबादमधील गुलबर्ग सोसायटीतील काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पंतप्रधान मोदी तसेच आणखी ६३ जणांना एसआयटीने (विशेष तपास पथक) निर्दोषत्व किंवा क्लीन चिट दिली होती. २००२मधील गुजरात दंगल हे मोठे षड्यंत्र असून त्यासंदर्भात पुन्हा चौकशी व्हावी अशी याचिका अहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेत तिस्ता सेटलवाड सहयाचिकाकर्त्या आहेत. झाकिया जाफरी यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली असून एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल्या क्लीन चिटनंतर आता गुजरात एसआयटीने तिस्ता सेटलवाड यांना मुंबईत त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सेटलवाड यांचे नाव घेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे, असे मानले जात आहे.

तिस्ता सेटलवाड यांचा ताबा ‘एटीएस’कडून अहमदाबाद गुन्हे शाखेकडे; नवा गुन्हा दाखल

तिस्ता यांच्यावर काय आरोप आहेत?

गुजरात दंगलीसंदर्भातील पुराव्यांबाबत छेडछाड, साक्षीदारांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि कारवाईदरम्यान सहकार्य न करणे असे आरोप तिस्ता सेटलवाड यांच्यावर ठेवले गेले असून त्यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगलीशी संबंधित प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले. त्यात तिस्ता सेटलवाड यांच्या स्वयंसेवी संघटनेची महत्त्वाची भूमिका आहे असा तिस्ता यांच्यावर आरोप आहे. या कामी त्यावेळच्या यूपीए सरकारने तिस्ता यांच्या एनजीओला मदत केली असून अनेक पीडितांना कल्पना न देता त्यांच्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याशिवाय झाकिया जाफरी यांच्या भावनांशी खेळत, त्यांना चुकीची माहिती देत तिस्ता यांनी त्यांना न्यायालयात जायला भाग पाडले असा देखील तिस्ता सेटलवाड यांच्यावर आरोप आहे.

हेही वाचा >> मोदींनी १९ वर्षे वेदना निमूट सहन केली, आता सत्य सोन्यासारखे चकाकले – शहा

या प्रकरणी एसआयटीने त्यांच्यासह कोणाकोणावर आणि कोणते गुन्हे दाखल केले आहेत?

पोलिसांनी या प्रकरणात तिस्ता सेटलवाड यांच्याशिवाय मूळ प्रकरण उघडकीस आणणारे ‘व्हिसल ब्लोअर’ मानले जाणारे माजी आयपीएस अधिकारी आर. बी. श्रीकुमार यांना नुकतीच अटक केली आहे. गुजरात दंगलींबाबत चुकीची माहिती दिल्याचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्याबरोबरच बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट (हे २० जून २०१९ पासून तुरुंगात आहेत) आणि तिस्ता सेटलवाड अशा तिघांवर कलम ४६८ (फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटेपणा करणे), कलम ४७१ (जाणीवपूर्वक खोटी कागदपत्रे ), कलम १९४ (खोटे पुरावे देणे किंवा बनवणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबरोबरच त्यांच्यावर कलम २११ (दुखापत करण्याच्या उद्देशाने गुन्ह्याचा खोटा आरोप करणे), कलम २१८ (सरकारी अधिकाऱ्याने चुकीच्या नोंदी करणे), आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  

हेही वाचा >> “मलाही अटक करण्यात आली होती, पण …”; गुजरात दंगलप्रकरणी गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

तिस्ता सेटलवाड कोण आहेत?

तिस्ता सेटलवाड या मुंबईतील सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांना पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे. त्यांच्या घरात वकिलीची परंपरा होती. त्यांचे वडील वकील होते, तर त्यांचे आजोबा एम. सी. सेटलवाड हे देशाचे पहिले अॅटर्नी जनरल होते. तिस्ता यांनीही वकिलीचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली, पण ते मध्येच सोडून त्या पत्रकारितेत शिरल्या आणि तिथे त्यांनी चांगले नाव कमावले. त्यानंतर ते क्षेत्र सोडून त्यांनी सिटीझन्स फॉर जस्टिस अॅण्ड पीस नावाची स्वयंसेवी संस्था सुरू केली. त्यांच्या या संस्थेने २००२ च्या गुजरात दंगलीप्रकरणी गुजरात न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. तिस्ता यांना त्यांच्या कामाबद्दल २००७ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

श्रीकुमार आणि संजीव भट्ट यांची या प्रकरणात भूमिका काय आहे ?

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय जंगलीच्या काळात श्रीकुमार हे राज्य गुप्तचर विभागाचे प्रभारी होते. या दंगलींमध्ये राज्य सरकारने पोलिसांना दंगली थांबवण्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखले, असा आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे. तर संजीव भट्ट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन दंगलीतील त्यांच्या भूमिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. अयोध्येहून परतणारी साबरमती एक्स्प्रेस गोध्रा येथे जाळण्यात आली, तेव्हा तिच्यात असलेल्या ५९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. त्यासंबंधी गुजरातच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी (नरेंद्र मोदी) त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत आपण उपस्थित होतो, या बैठकीत त्यांनी गुजरात पोलिसांना, हिंदूंना मुस्लिमांवर जो राग काढायचा आहे तो काढू द्या, असे सांगितले,  असे भट्ट यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष शोध पथकाने भट्ट या बैठकीला उपस्थितच नव्हते, असा दावा करून त्यांचे आरोप फेटाळून लावले. २०१५ मध्ये भट्ट यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. गुजरात सरकारने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या प्रकरणांची विशेष शोध पथक नेमून चौकशी करण्यात यावी ही त्यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने २०१५ मध्ये फेटाळली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांना १९९० मध्ये झालेल्या पोलीस कोठडीतील एका मृत्यूच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यामुळे २०१९ पासून ते तुरूंगात असून आता गुजरात दंगलीप्रकरणात तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांच्यासह त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुजरातच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार एक एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांना २ जुलै रोजी न्यायालयासमोर उपस्थित केले जाईल.