scorecardresearch

विश्लेषण : एका जहाजाच्या निमित्ताने भारत-चीन मधील संबंध आणखी का ताणले जाऊ शकतात?

चीनच्या yuan wang 5 नावाच्या जहाज हे सध्या श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर नांगर टाकून आहे, या जहाजाबद्दल भारताने आक्षेप नोंदवला आहे

विश्लेषण : एका जहाजाच्या निमित्ताने भारत-चीन मधील संबंध आणखी का ताणले जाऊ शकतात?
विश्लेषण : एका जहाजाच्या निमित्ताने भारत-चीन मधील संबंध का ताणले जाऊ शकतात?

जून २०२० पासून – गलवानमधील घटनेनंतर भारत आणि चीन या देशांमधील संबंध हे ताणले गेलेले आहेत. लडाख परिसरात चीनच्या आक्रमक पावलामुळे भारतानेही सीमेवर सैन्य तैनात केले असून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणखी वेगाने उपलब्ध करुन दिल्या आहेत. चीनच्या सीमेवर विविध ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधांची कामे वेगाने पुर्ण करण्यावर भारताचा भर आहे. लडाखमधील काही वादग्रस्त भागांबाबत लष्करी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. असं असतांना गेल्या काही दिवसांत चीनच्या लढाऊ विमानांनी ताबा रेषेजवळून उड्डाण केल्याने या तणावात भर पडली आहे. असं असतांना आणखी एक निमित्त दोन्ही देशांमधील तणाव वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

चीनचे yuan wang 5 हे जहाज हे मंगळवारपासून श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात उभे आहे. हे जहाज श्रीलंकेच्या दिशेने येत असतांना ते येऊ नये यासाठी भारताने आक्षेप नोंदवला होता. सध्या श्रीलंका आर्थिक संकटातून जात आहे, असं असतांना भारत भरघोस मदत श्रीलंकेला करत आहे. त्यामुळे हे जहाज येऊ नये याबाबत श्रीलंकेने शनिवारी चीनला तसं कळवले देखील. मात्र दोन दिवसांच्या चर्चेनंतर श्रीलंकेने अचानक यु टर्न घेत या जहाजाला काही अटींवर बंदरात येण्याची परवानगी दिली. हंबनटोटा बंदर हे श्रीलंकेतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर असून २०१७ पासून ते चीनच्या एका कंपनीकडे ९९ वर्षाच्या भाडेतत्त्वार हस्तांतरीत करण्यात आलं आहे. त्यामुळे चीनच्या जहाजांना अगदी युद्धनौकांनासुद्धा या बंदरात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हंटलं जात आहे.

yuan wang 5 जहाज नेमकं कसं आहे?

yuan wang 5 या जहाजाचे वजन सुमारे २५ हजार टन असून हे २००७ ला चीनमध्ये सेवेत दाखल झाले. हे एक प्रकारचे research and survey vessel असल्याचं चीनचे म्हणणं आहे. समुद्रातील प्रवाह, तळ, तसंच समुद्रात बदलणारे वातावरण याचा अभ्यास करणारे आहे असा चीनचा दावा आहे. यासाठी विविध शक्तीशाली रडार आणि तेवढीच ताकदवान अशी संदेशवहन यंत्रणा या जहाजावर तैनात आहे. अशा प्रकारची चार विविध जहाज चीनमध्ये कार्यरत आहेत. कोणत्याही प्रकारचे संशोधन-तपास केला जाणार नाही या अटीवर श्रीलंकेच्या हद्दीत प्रवेश देत हंबनटोटा बंदरात नांगर टाकण्याची परवानगी या जहाजाला देण्यात आल्याचं श्रीलंकेने स्पष्ट केलं आहे.

भारताचा आक्षेप का आहे?

yuan wang 5 हे research and survey vessel प्रकारचे जहाज नसून ते उपग्रहांचा वेध घेणारे आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग घेणारे जहाज आहे, थोडक्यात हे एक प्रकारचे हेरगिरी करणारे जहाज आहे असं भारताचे म्हणणे आहे. या जहाजांवर असलेल्या रडारची क्षमता ७५० किलोमीटरपर्यंतचे निरीक्षण करण्याची आहे. यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या श्रीहरीकोट या उपग्रह प्रक्षेपण स्थळाचा रडारद्वारे वेध घेण्याची क्षमता या जहाजात आहे. तसंच भारताच्या दक्षिण भागात अवकाशातून जाणाऱ्या उपग्रहांवर लक्ष ठेवण्याची क्षमता या जहाजात आहे. एवढंच नाही तर बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाची गस्त चालू असते यावर नजर ठेवणे चीनला या जहाजामुळे शक्य होणार आहे. तसंच बंगलाच्या उपसागरात भारत सातत्याने विविध पल्ला असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करत असतो त्याचा माग काढणे या जहाजद्वारे शक्य आहे. त्यामुळेच बंगालच्या उपसागराच्या तोंडावर पोहचलेल्या या जहाजाला भारताने विरोध केला आहे.

त्यामुळे एकीकडे उत्तरेला लडाख भागात चीनच्या आक्रमक पावलांमुळे भारत-चीन यामधील संबंध ताणले गेले आहेत. आता भारताच्या दक्षिण भागात चीनच्या जहाजाच्या प्रवेशामुळे ताणलेल्या संबंधात आणखी तेल ओतले गेल्यासारखे पाऊल चीनकडून उचलले गेले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या