तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खानने ‘पठाण’ या चित्रपटामधून दमदार कमबॅक केलं आहे. या चित्रपटाने बॉलिवूडवर आलेलं सावट दूर केलं. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत एक दोन नव्हे तर तब्बल २० वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. गेल्यावर्षी आमिर खान, अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार्सना जे जमलेलं नव्हतं ते शाहरुखने करून दाखवलं आहे. ‘पठाण’ची हवा आणि त्याने केलेली कमाई यावर बरेच लोक संशय घेत आहेत, शिवाय हे आकडे फुगवून सांगितल्याचा दावादेखील केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबरोबरच पहिल्या २ दिवसांत एवढी रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे तिकीटांचे वाढलेले दर हेदेखील एक कारण समोर आलं आहे. मुंबईतील मराठा मंदिर आणि गेटि गॅलेक्सीसारखी काही हातावर मोजता येतील एवढी चित्रपटगृह सोडल्यास बऱ्याच ठिकाणी या चित्रपटाचे तिकीटदर ५०० रुपयांपासून २८०० रुपयांपर्यंत वाढवलेले आहेत. ‘पठाण’ने केलेल्या कमाईमागे हादेखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घेणं गरजेचं आहे, पण नेमकं शाहरुख खानला हे कसं जमलं? ‘पठाण’ एवढा सुपरहीट होण्यामागची नेमकी कारणं कोणती? ती आपण जाणून घेऊयात.

१. गाण्यावरून निर्माण झालेला वाद :

ज्या चित्रपटाच्या भोवती सर्वात जास्त वाद निर्माण होतो तो चित्रपट जबरदस्त कमाई करतो हे आपण गेली कित्येक वर्षं बघत आलो आहेत. हीच गोष्ट ‘पठाण’च्या बाबतीत घडली. भगव्या रंगाची बिकिनी परिधान करून दीपिका पदूकोण ‘बेशरम रंग’ या गाण्यावर थिरकली अन् संपूर्ण देशात त्याची चर्चा झाली. या गाण्यामुळे खालच्या थरावर टीका झाली, कित्येक धार्मिक संघटनांनीही यात उडी घेत शाहरुख, दीपिकाचा दहावा तेरावासारखे विधी पार पाडले, काहींनी तर थेट या कलाकारांना जीवंत जाळायची धमकी दिली. एवढं होऊन जेव्हा चित्रपट सेन्सॉरकडे गेला तेव्हा त्यांनी दिलेले बदल निमूटपणे मान्य करूनच त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला. कितीही नाही म्हंटलं तरी नकारात्मक पब्लिसिटी ही बऱ्याच चित्रपटांसाठी उपयुक्त ठरते ही गोष्ट ‘पठाण’च्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाली.

आणखी वाचा : “पठाणचं प्रमोशन का केलं नाही?” चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख उत्तरला, “वाघ कधी…”

२. शाहरुख खानचं पुनरागमन :

२०१८ च्या अखेरीस शाहरुख ‘झीरो’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसला होता. त्यानंतर त्याने काही चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली, पण २०१८ पासून शाहरुखच्या पुनरागमनाची त्याचे चाहते अत्यंत आतुरतेने वाट पहात होते. ४ दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सुपरस्टारला प्रेक्षक एवढ्यात विसारतील असं होणं अशक्य होतं. शिवाय २०१९ पासून शाहरुख कमबॅकसाठी कोणता चित्रपट निवडणार याची प्रचंड हवा तयार करण्यात आली. अखेर जेव्हा ‘पठाण’बद्दल माहिती जेव्हा समोर आली तेव्हापासून त्याच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या स्टारचं हे कमबॅक धूमधडाक्यात साजरं करायचं असं ठरवलं होतं आणि तसंच झालं. काही लोकांना ही गोष्ट पेड पीआर स्ट्रॅटजी वाटते पण शाहरुखने ते करून दाखवलं आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या बुडत्या नौकेला आधार देत वर आणलं.

३. स्मार्ट प्रमोशन :

एका गाण्यामुळे निर्माण झालेला वाद पाहता ‘पठाण’च्या पीआर टीमने प्रमोशनची स्ट्रॅटजी बदलली असंही म्हंटलं जात आहे. ‘पठाण’च्या टीमने एकाही चॅनलला किंवा मोठ्या युट्यूबरला एकही मुलाखत दिलेली नाही. सर्वसाधारणपणे प्रत्येक चित्रपटाच्या रिलीज आधी ही गोष्ट सगळेच करतात कारण त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असतं. यावेळी पठाणची दोन गाणी आणि एका ट्रेलरमुळेच वातावरण एवढं तयार झालं की त्यांना पुढील प्रमोशन करायची गरजच भासली नाही. थेट चाहत्यांशी संवाद साधून या कलाकारांनी प्रमोशन केलं पण कोणत्याही प्रकारची मुलाखत देऊन आणखी वाद ओढवून घेण्याचं या चित्रपटाच्या टीमने टाळलं आणि चित्रपटाबद्दल कुठेच फारसं काही बोललं न गेल्यामुळे लोकांची उत्सुकतादेखील कायम राहिली. यामुळेच या चित्रपटाला एवढं यश मिळालं असल्याचं सध्या अनेक ट्रेड एक्स्पर्टसुद्धा सांगत आहेत.

४. शाहरुख आणि ट्विटर :

मुलाखत एकही दिली नसली तरी शाहरुख मात्र कायम त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुखने त्याच्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ‘AskSRK’ हा ट्रेंड चालवत चाहत्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरं दिली. यातून चित्रपटाला किंवा शाहरुखला कोणतंही नुकसान न होता फायदाच झाला आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्या या कृतीमुळे त्याला डोक्यावर उचलून धरलं आणि चाहत्यांशी थेट संवाद साधणाऱ्या शाहरुखने त्यांच्या मनात स्वतःची जागा करून घेतली. आजही चित्रपट सुपरहीट होऊनही शाहरुख मध्येच त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहे. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून शाहरुख आणि ‘पठाण’च्या टीमने हे साध्य करून दाखवलं की या माध्यमातूनही उत्तम प्रमोशन करता येतं.

५. शाहरुखचं ग्लोबल स्टारडम :

‘पठाण’ जसा वादात अडकला तसं लोकांनी शाहरुख खानच्या ‘स्टारडम’वर प्रश्नचिन्ह उभं करायला सुरुवात केली. किंग खानचं स्टारडम आता संपलं अशी हवा तयार करण्यात येत होती, पण जगभरातील शाहरुख खानच्या चाहत्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. जर्मनी, दुबईसारख्या कित्येक देशात शाहरुख या नावाची जादू तसंच दुबईमध्येसुद्धा शाहरुखने केलेलं जोरदार प्रमोशन आणि जगभरातील त्याच्या असंख्य फॅन क्लब्सनी शाहरुखला जिंकवून दाखवण्याचा दृढनिश्चयच केला होता. यामुळेच ‘पठाण’ मोठ्या संख्येने स्क्रिन्सवर झळकला आणि रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत सुपरहीट ठरला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained why shahrukh khan deepika padukone starrer pathaan movie became massive hit at box office avn
First published on: 29-01-2023 at 14:07 IST