आमिर खानचा बहुचर्चित लाल सिंग चड्ढा बॉक्स ऑफिसवर साफ आपटला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाला ट्रोल करण्यात आले होते. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या अगोदरच बॉयकॉट ‘लाल सिंग चड्ढा’ असा हॅशटॅग व्हायरल करण्यात आला होता. चित्रपटाला फारसे यश मिळाले नसले तरी परदेशात मात्र चांगली कमाई केली आहे. बॉलिवूड बबलच्या एका अहवालानुसार ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाने परदेशात ७.५ मिलियन इतकी कमाई केली आहे. आलिया भट्टच्या गंगुबाई चित्रपटाला मागे टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप मात्र परदेशात हिट हिंदी चित्रपटांची ही पहिली वेळ नाही, याआधी देखील काही चित्रपटांनी परदेशात चांगली कमाई केली आहे, नेमकं यामागचं गणित काय असते ते समजून घेऊयात…

विषयांची हाताळणी :

भारतीय प्रेक्षक करोना काळानंतर फार चोखंदळ झाला आहे. आज ओटीटीसारखे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. नेहमीच्या साच्यातील कथांना प्रेक्षक कंटाळले आहेत. वादग्रस्त विषय, हलक्याफुलक्या कथा, ग्रामीण बाजातील चित्रपट, दाक्षिणात्य चित्रपटांचे गारुड इत्यादी कारणं असू शकतात. तर दुसरीकडे ‘रा वन’, ‘कभी अलविदा ना केहना’, ‘अशोका’, ‘ब्लू’, ‘ट्यूबलाईट’ यासारख्या चित्रपटांना समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र यातील विषय हे परदेशात आवडले गेले, जसे की ‘रा वन’ या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर व्हीएफएक्स तंत्रज्ञान वापरले आहे.

परदेशात अशा चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याकाळात कभी अलविदा ना केहना सारखा चित्रपट आजच्या काळात प्रेक्षकांनी कदाचित पसंत केला असता कारण यातील विषय हा विवाहबाह्य संबंधांवर आधारित होता. परदेशात प्रामुख्याने अमेरिकेत या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. क्रिश चित्रपटाच्या बाबतीत हेच गणित आहे, क्रिश ३ चित्रपटाला परदेशात प्रामुख्याने अमेरिकेत मोठे यश मिळाले. भारतीय सुपरहिरो संकल्पना तिथे यशस्वी ठरली.

‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमिरच्या ‘या’ आगामी चित्रपटाचं काम थांबलं, कारण काय?

अभिनेत्यांचा प्रभाव :

आमिर खानला आज अनेकजण ट्रोल करत असले तरी आमिर खानची लोकप्रियता परदेशात मोठ्या प्रमाणावर आहे. प्रामुख्याने चीनमध्ये त्याचे चित्रपट मोठ्या प्रमाणावर पहिले जातात. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान जितका भारतात प्रसिद्ध आहे तितकाच तो परदेशात देखील प्रसिद्ध आहे. हेच सलमान खान, अमिताभ बच्चन यासारख्या कलाकारांच्या बाबतीत लागू होते. या अभिनेत्यांच्या लोकप्रियतेमुळे परदेशातील चाहते त्यांचे चित्रपट हमखास बघणारच.

चित्रीकरण :

आज बॉलिवूडचे चित्रपट जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात चित्रित होतात. प्रामुख्याने बॉलिवूडकरांचा अमेरिकेतील चित्रीकरणावर भर जास्त दिसून येतो. तसेच सध्या बॉलिवूडचे अनेक चित्रपट हे इस्तंबूल, इजिप्त, बहरीन, टर्की यासारख्या ठिकाणी होत असल्याने तिकडच्या लोकांना देखील बॉलिवूडचे आकर्षण वाटू लागले आहे.

प्रदर्शित किती ठिकाणी झालेत?

ज्या प्रमाणे भारतात प्रामुख्याने बॉलिवूड चित्रपट हे काही ठराविक ठिकाणीच जास्त चालतात अथवा त्यांना चित्रपटगृह मिळतात त्याचपद्धतीने जगभरात बॉलिवूडच्या चित्रपटांना किती चित्रपटगृह मिळतात यावर कमाई अवलंबून असते. सलमानच्या ट्यूबलाईटला प्रेक्षकांनी जरी नाकारले असले तरी जगभरात एकावेळी १०००० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. तसेच परदेशात चित्रपटगृहांची संख्या देखील वाढत असल्याने याचा फायदा बॉलिवूडच्या चित्रपटांना होत आहे.

बॉयकॉट ट्रेंडच्या वादात स्वप्निल जोशीची उडी, रणवीर आणि अर्जुनचा फोटो शेअर करत म्हणाला “खऱ्या अर्थाने सुपरस्टार…”

दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांचा प्रभाव अधिक

आज भारतात दाक्षिणात्य चित्रपटांची जरी चर्चा असली तरी परदेशात हिंदी चित्रपटांचा प्रभाव अधिक आहे. मात्र दक्षिणेतील रजनीकांत यांची लोकप्रियता आशिया खंडात प्रामुख्याने जपान या देशात प्रचंड आहे. त्यांचे चित्रपट आवर्जून बघिलते जातात. बॉलिवूडचा इतिहास बघितला तर राज कपूर यांच्या चित्रपटांना देखील रशियात मागणी होती. रशियामध्ये ते प्रसिद्ध होते.

एकूणच सध्या प्रेक्षकांनि सध्या बड्या स्टार्सना नाकारले आहे. दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बड्या स्टार्सचे चित्रपट जरी भारतात अपयशी ठरले असले तरी बाहेर ते यशस्वी होताना दिसून येत आहेत.