scorecardresearch

विश्लेषण : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची घाई का? प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का?

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प २०२१मध्ये पूर्ण होऊन वापरात येणे अपेक्षित होते.

Why the haste of inauguration of Samrudhi Highway

मंगल हनवते

मुंबई ते नागपूर अंतर केवळ आठ तासांत पार करता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प २०२१मध्ये पूर्ण होऊन वापरात येणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि करोना, टाळेबंदीचा फटका बसल्याने प्रकल्प रखडला. सध्या ७०१ किमीपैकी केवळ २१० किमीचा मार्ग पूर्ण झाला आहे. या पूर्ण झालेल्या टप्प्याचे २ मे रोजी उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र गेल्या रविवारी या मार्गावरील निर्माणाधीन उन्नत मार्गाचा भाग कोसळला. त्यामुळे उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. ही दुर्घटना ताजी असतानाच बुधवारीही निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळला. या दोन दुर्घटना लक्षात घेता प्रकल्पाच्या उद्घाटनाची घाई केली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

समृद्धी महामार्ग प्रकल्पाची गरज का?

मुंबई ही राज्याची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही दोन्ही शहरे. मात्र रस्ते मार्गे मुंबई- नागपूर प्रवासासाठी बरीच कसरत करावी लागते. या प्रवासासाठी १५ ते १६ तास लागतात. त्यामुळे हे अंतर कमी करण्यासाठी, प्रवास वेगवान, सुकर करण्यासाठी नागपूर ते मुंबई महामार्गाची संकल्पना पुढे आली. नागपूर ते मुंबई असा ७०१ किमीचा सहा पदरी असा हा महामार्ग आहे. यासाठी ५५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला आहे. राज्यातील १० जिल्हे आणि ३९० गावांना जोडणारा हा महामार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते नागपूर अंतर साधारण आठ तासांत गाठता येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २०८२० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. महामार्गासाठी यातील ८५२० हेक्टर जागेचा वापर करण्यात आला आहे तर १०१८० हेक्टर जागेवर छोटी नगरे (टाऊनशिप) वसवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. यात एकूण २४ छेदमार्ग (इंटरचेंजेस) असून यामुळे अनेक गावे समृद्धी महामार्गाशी जोडली जातील. पाच बोगदे, ५०हून अधिक उड्डाणपूल, ४००हून अधिक भुयारी मार्ग, ३००हून अधिक पादचारी भुयारी मार्ग आणि वन्यजीवांसाठी भुयारी, उन्नत मार्ग असे १६००हून अधिक पूल या प्रकल्पात समाविष्ट आहेत. समृद्धीवरील वेग मर्यादा ताशी १५० किमी अशी आहे. पण प्रत्यक्षात या मार्गावरून ताशी १२० किमीने प्रवास करता येणार आहे.

वेगवान प्रवासासाठी टोल?

आठ तासांत मुंबई ते नागपूर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना, वाहनचालकांना टोल भरावा लागणार आहे. या मार्गावर एकूण २६ टोलनाके असून जितका प्रवास तितका टोल भरावा लागणार आहे. हलक्या मोटार वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन) १.७३ रुपये प्रति किमी, हलक्या व्यायसायिक वाहनांसाठी, मिनी बससाठी २.७९ रुपये प्रति किमी, बस, ट्रकसाठी ५.८५ रुपये प्रति किमी, तीन आसनांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ६.३८ रुपये किमी, अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी ९.१८ रुपये प्रति किमी, अति अवजड वाहनांसाठी ११.१७ रुपये प्रति किमी असे टोल दर निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई ते नागपूर ७०१ किमीच्या प्रवासासाठी प्रवासी १२०० रुपयांहून अधिक टोल मोजावा लागेल.

काम का रखडले?

सोळा टप्प्यांत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वेगवेगळे कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहेत. प्रकल्पाचे काम २०१९मध्ये सुरू झाले आणि कामाने वेग घेतला तोच करोनाचे संकट उभे राहिले. टाळेबंदीत प्रकल्पातील मजुरांची संख्या प्रचंड कमी झाली. परिणामी काही टप्प्यांत काम बंद होते तर काही टप्प्यांत कामाची गती संथ होती. त्यामुळे प्रकल्प रखडल्याचे स्पष्ट करून एमएसआरडीसीने तीन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर ते शिर्डी असा ५२० किमी टप्पा १ मे २०२१ रोजी, शिर्डी ते इगतपुरी असा ६२३ किमीचा टप्पा डिसेंबर २०२१मध्ये आणि इगतपुरी ते मुंबई असा ७०१ किमीचा टप्पा १ मे २०२२ रोजी सुरू होईल असे जाहीर केले. मात्र हा मुहूर्तही चुकला. अखेर पहिल्या टप्प्यासाठी मार्च २०२२ ची नवीन तारीख दिली. परंतु त्यावेळेतही हा टप्पा पूर्ण होऊ शकला नाही. मार्च २०२२मध्ये पहिला टप्पा सुरू होणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने जानेवारी २०२२मध्येच एमएसआरडीसीने ५२० पैकी ३६० किमीचा नागपूर ते वैजापूर, औरंगाबाद (शेलू बाजार, वाशिम ते सिंदखेड राजा, बुलढाणादरम्यानचा टप्पा वगळत) टप्पा सुरू करण्याचे जाहीर केले. मात्र ही तारीखही गाठता आली नाही. तारखांवर तारखा देत त्या चुकविल्या जात असल्याने यावरून टीका होत होती. या पार्श्वभूमीवर अखेर २१० किमीचा सलग तयार असलेला नागपूर ते शेलू बाजार असा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी २ मे चा मुहूर्त सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या टप्प्याचे उद्घाटन करत २१० किमीचा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच अचानक हे उद्घाटन रद्द करण्याची वेळ एमएसआरडीसीवर आली. पहिला टप्पा पुन्हा रखडला.

उद्घाटनाची घाई?

मुळात नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा टप्पा करणे अपेक्षित आहे. एकाच वेळी मोठा टप्पा सुरू करणे प्रवाशांच्या आणि एमएसआरडीसीच्या फायद्याचे आहे. पण ५२० किमीच्या महामार्गाचे काम पूर्ण नसल्याने आणि हे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार असल्याने एमएसआरडीसीची अडचण झाली आहे. त्यामुळेच तुकड्या-तुकड्यात मार्ग खुला करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. याचाच भाग म्हणून सलग तयार असलेला २१० किमीचा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेत २ मे हा दिवस ठरवण्यात आला. मात्र या टप्प्यातील काही छोटीमोठी कामे राहिली असताना, वन्यजीवांसाठीच्या एका उन्नत मार्गाचे काम शिल्लक असतानाही उद्घाटनाची घाई करण्यात आली. काम पूर्ण करण्याची घाई सुरू असताना त्यात हलगर्जी झाली आणि रविवारी, २४ एप्रिलला कामादरम्यान पुलाचा काही भाग कोसळला. या मार्गाची नव्याने बांधणी करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. ‘आर्च’ पद्धतीचा वापर करून हा मार्ग बांधण्यात येत होता ती रचना समृद्धीसाठी योग्य नसल्याचेही समोर आले. त्यामुळे काँक्रीट गर्डरचा वापर करत नव्याने उन्नत मार्गाची बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्याने काम करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ही दुर्घटना ताजी असतानाच बुधवारी, २७ एप्रिलला सिंदखेड राजा येथे पुलाचे काम सुरू असताना क्रेनचा जॅक घसरला आणि गर्डर कोसळले. या दोन्ही दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि एमएसआरडीसीकडून उद्घाटनाची घाई केली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एमएसआरडीसी वेगळीच अडचण?

एमएसआरडीसीने बांधकामात कोणतीही घाई नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या टप्प्यातील (पॅकेज) काम १०० टक्के पूर्ण झाले आहे त्या टप्प्याचे कंत्राटदार प्रकल्पस्थळावरून निघून गेले आहेत. त्यामुळे आता प्रकल्पस्थळावरील सामानाची चोरी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे रस्ता पूर्ण असताना तो धूळ खात पडून आहे. त्याच वेळी या प्रकल्पासाठी ५५ हजार कोटीहून अधिक खर्च आला आहे. हा खर्च ही एमएसआरडीसीला वसूल करायचा आहे. अशा वेळी जो भाग पूर्ण आहे तो सुरू करत टोल वसूलीतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न एमएसआरडीसीचा आहे. त्यामुळे आता पुढील दोन महिन्यांत जितका टप्पा पूर्ण होईल तितका टप्पा सुरू करण्याचा विचार एमएसआरडीसीचा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained why the haste of inauguration of samrudhi highway print exp 0522 abn

ताज्या बातम्या