scorecardresearch

विश्लेषण : १४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी यूकेच्या न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना का दोषी ठरवले? जाणून घ्या

लंडनमधील न्यायलयाने मॉली रसेलच्या मृत्यूला सोशल मीडिया जबाबदार असल्याचे म्हटले आहे. नेमकं न्यायालयाने असे का म्हटले आहे? जाणून घेऊया.

विश्लेषण : १४ वर्षीय मुलीच्या आत्महत्येसाठी यूकेच्या न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांना का दोषी ठरवले? जाणून घ्या
संग्रहित

लंडनमध्ये राहणाऱ्या मॉली रसेल या १४ वर्षीय मुलीने २०१७ मध्ये आत्महत्या केली होती. तिच्या मृत्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने या प्रकरणाचा अहवाल ३० सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर सादर केला. या संदर्भात निर्णय देताना न्यायलयाने मॉली रसेलच्या मृत्यूला सोशल मीडिया जबाबदार असल्याचे म्हटले आहे. नेमकं न्यायालयाने असे का म्हटले आहे? जाणून घेऊया.

नेमकं प्रकरण काय आहे?

लंडनमध्ये राहणाऱ्या मॉली रसेल या मुलीने १२व्या वर्षी तिच्या आई-वडिलांच्या परवानगीने इन्स्टाग्रामवर खाते उघडले होते. १३व्या वाढदिवासाला तिला आयफोनही भेट म्हणून मिळाला होता. मृत्यूच्या पूर्वी ती एका सामान्य मुलीसारखी वागत होती. मात्र, अचानक तिने आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलले. मॉलीच्या मृत्यूच्या दोन आठवड्यानंतर वडिलांना तिच्या मोबाईलमध्ये पीनट्रेस्टकडून आलेला एक ईमेल सापडला ज्यात ‘डिप्रेशन संदर्भातील पीन्स तुम्हाला आवडतील का?’, असा उल्लेख होता. त्यानंतर त्यांनी तिचे इन्स्टाग्राम खातेही तपासले. त्यात त्यांना “Unimportant things” नावाने एक फोल्डर सापडले. या फोल्डरमध्ये त्यांना आत्महत्येसंदर्भातील अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या. तसेच एका फाईलमध्ये ‘आत्महत्या करणाऱ्या मुलीवर कोण प्रेम करेल?’ असे लिहिले होते. त्यानंतर स्वतंत्र तपास अधिकाऱ्यांकडून या प्रकणाचा तपास सुरू करण्यात आला होता.

हेही वाचा – विश्लेषण : वेगाने वितळणाऱ्या बर्फामुळे आर्क्टिक महासागर आम्लयुक्त, जीवसृष्टीला धोका कसा? वाचा…

न्यायालयाने काय म्हटले?

स्वतंत्र तपास अधिकारी अँड्र्यू वॉकर यांना मॉली रसेल आत्महत्या प्रकरणाचा तपास करत न्यायालयात अहवाल सादर केला. यावेळी न्यायालयाने सोशल मीडिया कंपन्यांवर ताशेरे ओढले. ”आत्महत्येपूर्वी मॉली एका सामान्य मुलीसारखी वागत असली, तरी ती तणावात होती. तिने मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर १६३०० पोस्ट लाईक केल्या होत्या, यापैकी २१०० पेक्षा जास्त पोस्ट या आत्महत्येसंदर्भातील होत्या. तसेच तिने पीनट्रेस्टवर आत्महत्येसंदर्भातील ४०० छायाचित्रांचे डिजिटल पीनबोर्डही तयार केले होते. इन्स्टाग्राम आणि पीनट्रेस्ट यांनी त्यांच्या अग्लोरिदमनुसार मॉलीच्या फीडवर असा मजकूर दाखलवला, ज्याची तिने कधीच मागणी केली नव्हती. याबरोबरच या कंपन्यांनी तिला प्रौढ युजर्ससाठी असलेला मजकूर दाखवला. याचा तिच्यावर वाईट परिणाम झाला. एकंदरीतच ही आत्महत्या नव्हती, तर मॉलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा हा प्रकार होता”, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सोशल मीडिया कंपन्यांचे काय म्हणणे आहे?

दोन्ही सोशल मीडिया कंपनींच्या प्रतिनिधींना न्यायालयात बोलावण्यात आले होते. दोघांनीही न्यायालयात हजर होत आवश्यक ती माहिती दिली होती. दरम्यान, पीनट्रेस्टच्या जडसन हॉफमनने यांनी मान्य केले की मॉलीच्या पीनट्रेस फीडवर अनावश्यक मजकूर दाखवण्यात आला. तसेच आम्ही हा मजकूर पूर्णपणे काढून टाकू, असेही ते म्हणाले. तर ‘मेटा’ कंपनीच्या अधिकारी एलिझाबेथ लागोन यांनीही मॉलीच्या फीडवर दाखवण्यात आलेल्या काही पोस्ट योग्य नव्हत्या, असे मान्य केले.

हेही वाचा – विश्लेषण: सर डॉन ब्रॅडमन यांनाही सर्फराजने टाकले मागे; नक्की काय केला विक्रम?

सोशल मीडिया, पालकांसाठी आव्हानात्मक काळ

मॉली रसेल आत्महत्या प्रकरण हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आजवरच्या इतिहासात एखाद्या प्रकरणात सोशल मीडिया कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजेरी लावणं, असे पहिल्यांदाच घडले आहे. ‘द नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू चिल्ड्रन’चे (NSPCC) बाल सुरक्षा धोरण प्रमुख अँडी बरोज यांनी न्यायालयाच्या या निर्णयासंदर्भात बोलताना सोशल मीडिया आणि पालकांसाठी हा आव्हानात्मक काळ असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांना धोकादायक मजकूर दाखवल्याचा आरोप होणे, ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी टीकटॉकला अमेरिकेतील दोन तरुण मुलींच्या मृत्यूसाठी जबाबदार धरण्यात आले होते. २०२१ मध्ये टीकटॉकच्या ‘ब्लॅकआउट चॅलेंज’ मध्ये भाग घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांना जाणीवपूर्वक धोकादायक व्हिडिओ दाखवले जातात, असा आरोप यावेळी करण्यात आला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या