संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेतील महत्त्वाचे आणि वजनदार नेते एकनाथ शिंदे यांनीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक होत काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांपासून दूर होत भाजपशी युती करावी, असा प्रस्ताव नेतृत्वापुढे ठेवला आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासाठी गेल्या काही वर्षांतील हे सर्वांत मोठे आव्हान ठरले आहे. कारण पक्षच फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात शिवसेना संपेल असा अंदाज वर्तविणाऱ्यांना उद्धव यांनी पक्ष अधिक जोमाने पुढे नेऊन उत्तर दिले. राज ठाकरे वा नारायण राणे यांची बंडे त्यांनी मोडून काढली. शिवसेनेचे जास्त नुकसान झाले नाही. आता एकनाथ शिंदे यांचे बंड मोडून काढण्यात उद्धव ठाकरे हे यशस्वी होतात का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. देशातील अत्यंत शक्तिशाली असा भाजप ठाकरे किंवा महाविकास आघाडी सरकारवर कुरघोडी करण्यास टपूनच बसलेला आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आणि संकटविमोचन कौशल्याचा कस लागणार आहे.

शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात आतापर्यंत किती बंडे झाली ?

शिवसेनेच्या पोलादी शिस्तीला पहिले भगदाड पडले ते १९९१मध्ये. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली १८ आमदारांनी वेगळा गट स्थापन करीत शिवसेनेला आव्हान दिले. शिवसेनेत अस्वस्थता आहे अशा बातम्या येत असताना, ‘माझे शिवसैनिक असे काही करणार नाहीत’, असा दावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भुजबळांबरोबर १८ आमदार बाहेर पडले. तो शिवसेनेला मोठा धक्का होता. पण शिवसेना लगेचच सावरली. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत भुजबळ हेच पराभूत झाले. त्यामुळे भुजबळांच्या बंडाचा शिवसेनेवर तसा परिणाम झाला नाही. उलट शिवसेना भाजपच्या मदतीने राज्यात सत्तेत आली. १९९८मध्ये नवी मुंबईतील गणेश नाईक यांनी बंड पुकारले. नाईक यांनाही शिवसेनेने दणका दिला. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक हे नवी मुंबईतच पराभूत झाले. २००५मध्ये नारायण राणे यांनी बंड केले. ‘राणे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे’ अशा घोषणा दिल्या गेल्या. शिवसेनाप्रमुखांनी तात्काळ राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. राणे यांच्या बंडानंतर राणे समर्थक आणि शिवसेैनिकांमध्ये अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या. राणे यांच्या पक्षांतरानंतरही कोकणात शिवसेना मजबूतपणे उभी राहिली. सिंधुदुर्ग वगळता रत्नागिरी, रायगडमध्ये शिवसेनेवर फारसा परिणाम झाला नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यावर मोठी फूट अपेक्षित होती. मनसे शिवसेनेचे नुकसान करेल अशी शक्यता वर्तविली जात होती. पण शिवसेनेवर तेवढा परिणाम झाला नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शेवट काय होतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी कोणते आक्षेप घेतले जातात?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी नेहमीच आक्षेप घेतले गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २००२च्या महाबळेश्वरमधील अधिवेशनात उद्धव हा आपला राजकीय उत्तराधिकारी असेल हे स्पष्ट केले तेव्हापासून ही चर्चा घडत गेली. पण पक्षाची सूत्रे हाती घेत उद्धव यांनी शिवसेनेवर आपली पकड बसविली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता कायम राहील या दृष्टीने नियोजन केले. नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ आरोप केले. पण शिवसैनिकांवर त्याचा परिणाम झाला नाही. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यावर शिवसेना किंवा उद्धव यांना आव्हान असेल अशी शक्यता वर्तविली गेली. पण दोन ठाकरे बंधूंच्या वादात उद्धव यांनी बाजी मारली. मनसेला गेल्या १६ वर्षांत बाळसे धरता आले नाही. मनसे राज्याच्या कानाकोपऱ्यात विस्तारला नाही.

बाळासाहेबांच्या पश्चात उद्धव यांची कामगिरी कशी राहिली?

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर गेल्या दहा वर्षांत शिवसेना तेवढ्याच मजबुतीने उभी राहिली. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले होते. राज्यात सत्तेत आल्यावर भाजपने शिवसेनेला आव्हान दिले. सत्तेसाठी अपरिहार्यपणे दोघे एकत्र होते, पण उभयतांमध्ये अजिबात पटत नसे. भाजपबरोबर युती करून २५ वर्षे सडली असे विधान उद्धव ठाकरे यांनी २०१७च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी केले होते. पण शिवसेनेची ताकद लक्षात घेऊनच युतीसाठी अमित शहा हे ‘मातोश्री’वर आले होते.

मग आता ते नवे बंडही मोडून काढतील का?

एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा मांडला आहे. सामान्य शिवसैनिक व शिवसेनेच्या मतदारांना हिंदुत्वाचेच जास्त अप्रूप आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी करणे हे अनेकांना पचनी पडले नव्हते.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये गेले काही महिने अस्वस्थता होती. मुख्यमंत्रीपद पक्षाकडे असूनही मतदारसंघातील कामांना निधी उपलब्ध होत नाही ही आमदारांची सार्वत्रिक तक्रार होती. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल या आमदारांमध्ये अधिक नाराजी बघायला मिळायची. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार हे निधी देत नाहीत, असा आमदारांचा आक्षेप असायचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क न होणे किंवा आमदारांसाठी ते उपलब्ध नसणे हे शिवसेनेच्या आमदारांचे विशेष दुखणे होते. मुख्यमंत्री आम्हाला भेटतच नाहीत ही त्यांची तक्रार होती. अशा अनेक आमदारांना एकनाथ शिंदे यांचा आधार होता. शिंदे आमदारांची कामे मार्गी लावण्याकरिता स्वतः पुढाकार घेत असत. यातूनच मग अनेक आमदारांमध्ये ठाकरे यांच्याऐवजी शिंदे यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली. शिंदे यांच्या बंडानंतर पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ शिंदे यांना मिळू नये, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. पण बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला कितपत दाद देतील याबाबत साशंकताच आहे. पक्षप्रमुख आणि आमदारांमध्ये निर्माण झालेली दरी दूर करणे हे उद्धव यांच्यापुढे आव्हान असेल. ठाकरे यांच्या आवाहनाला आमदार कितपत दाद देतात यावरच या बंडाचे भवितव्य अवलंबून असेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained will uddhav thackeray also succeed in crushing the rebellion print exp 0622 abn
First published on: 22-06-2022 at 11:58 IST