विश्लेषण : पुरुषांच्या फुटबॉल विश्वचषकात महिला क्रांती? जर्मनी-कोस्टारिका सामन्यात तीनही रेफरी महिला! | Explained Womens Revolution in Mens Football World Cup All three referees in the Germany Costa Rica match are women print explained msr 87 | Loksatta

विश्लेषण : पुरुषांच्या फुटबॉल विश्वचषकात महिला क्रांती? जर्मनी-कोस्टारिका सामन्यात तीनही रेफरी महिला!

जर्मनी आणि कोस्टा रिका यांच्यातील सामन्यात फ्रापार्ट मुख्य पंच आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या सहायक रेफरीही महिलाच आहेत.

विश्लेषण : पुरुषांच्या फुटबॉल विश्वचषकात महिला क्रांती? जर्मनी-कोस्टारिका सामन्यात तीनही रेफरी महिला!
(PHOTO : fifa world cup 2022Twitter)

ज्ञानेश भुरे

यंदाची ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा विविध कारणांसाठी चर्चेत राहिली आहे. कतारमध्ये महिलांना फारसे स्वातंत्र्य नाही आणि यावरही बरीच टीका झाली आहे. मात्र, आता याच कतारमध्ये एका महिलेकडून अनोखा विक्रम रचला जाणार आहे. फ्रान्सच्या स्टेफनी फ्रापार्ट या पुरुषांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मुख्य पंचाची जबाबदारी बजावणाऱ्या पहिल्या महिला पंच ठरतील. गुरुवारी जर्मनी आणि कोस्टारिका यांच्यातील सामन्यात फ्रापार्ट मुख्य पंच आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या सहायक रेफरीही महिलाच आहेत. फ्रापार्ट नक्की कोण आहेत आणि त्यांचा विश्वचषकात पंचाची भूमिका बजावण्यापर्यंतचा प्रवास कसा होता याचा आढावा.

स्टेफनी फ्रापार्ट कोण आहेत? –

फ्रापार्ट यांचा जन्म १९८३ डिसेंबरमध्ये फ्रान्समध्ये झाला. फ्रापार्ट यांना २०११मध्ये पंच म्हणून ‘फिफा’ची अधिस्वीकृती मिळाली. आता त्या फ्रान्समधील लीग-१ फुटबॉलमध्ये अनेकदा पंच म्हणून काम करताना दिसून येतात. त्यापूर्वी त्यांनी फ्रान्समधीलच लीग-२ स्पर्धेत काम केले आहे. लीग-१ फुटबॉलच्या नव्या हंगामातील सहा सामन्यांत फ्रापार्ट यांनी मुख्य पंच म्हणून कामगिरी पाहिली. आतापर्यंत त्यांनी २९ पिवळे कार्ड आणि दोन लाल कार्ड दिली आहेत.

पुरुषांच्या सामन्यात फ्रापार्ट यांचे मोठ्या स्तरावर पदार्पण कधी? –

चॅम्पियन्स लीग आणि युरोपीय लीगमधून फ्रापार्ट या पुरुषांच्या सामन्यात पंच म्हणून दिसू लागल्या. २०२०मध्ये युव्हेंटस आणि डायनॅमो किएव्ह यांच्यात झालेल्या सामन्यात त्या प्रथम मुख्य पंच म्हणून उभ्या राहिल्या. यंदाच्या हंगामात त्या रेयाल माद्रिद विरुद्ध सेल्टिक यांच्यातील चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात पंच होत्या. या सामन्यात त्यांनी नियोजित वेळेत तीन पेनल्टी दिल्या होत्या.

फ्रापार्ट यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये कधी संधी मिळाली? –

फ्रापार्ट यांनी पंच म्हणून अधिस्वीकृती मिळाल्यापासून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मार्च २०२१ मध्ये नेदरलँड्स आणि लातविया यांच्यातील सामन्यातून फापार्ट यांनी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पाच महिन्यांनी फ्रापार्ट यांनी लिथुआनियाचा दौरा केला. तेथील आतंराष्ट्रीय सामन्यात त्यांनी तीन पेनल्टींचा निर्णय घेतला होता. मैदानात एकदम कडक स्वभावाच्या, शिस्तबद्ध पंच अशी त्यांची ओळख झाली आहे. फ्रापार्ट यांना २०१९, २०२० आणि २०२१ अशी सलग तीन वर्षे आंतरराष्ट्रीय फुटबॉल इतिहास आणि सांख्यिकी महासंघाच्या वतीने (आयएफएफएचएस) सर्वोत्कृष्ट महिला पंचाचे पारितोषिक मिळाले आहे.

फ्रापार्ट यांची यापूर्वीची कामगिरी कशी? –

फ्रापार्ट या ‘फिफा’च्या पंच समितीवरील प्रमुख पंच आहेत. याच वर्षी मार्चमध्ये झालेल्या पुरुषांच्या विश्चचषक पात्रता स्पर्धेतील सामन्यातही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे. त्यापूर्वी लीग-१, २०१९ मध्ये ‘युएफा’ सुपर चषक स्पर्धेचा अंतिम सामना आणि २०२०मध्ये चॅम्पियन्स लीग सामन्यातही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे. सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत मेक्सिको आणि पोलंड यांच्यातील सामन्यात फ्रापार्ट या चौथ्या पंच होत्या. विश्वचषक स्पर्धेपूर्वी फ्रापार्ट यांनी ‘फिफा’ने महिला पंचांना संधी द्यावी अशी विनंती केली होती. ‘फिफा’ने त्यांच्या विनंतीला मान दिल्यावर फ्रापार्ट यांनी निर्णयाचे स्वागत केले होते.

जर्मनी-कोस्टारिका सामन्यात इतर महिला रेफरी कोण? –

यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ३६ पंचांपैकी सहा पंच महिला आहेत. ब्राझीलच्या नौझा बॅक आणि मेक्सिकोच्या करेन डियाझ मेदिना या सहायक रेफरी असतील. तर चौथ्या रेफरी म्हणून अमेरिकेच्या कॅथरीन नेस्बिट काम पाहतील. याशिवाय जपानच्या योशिमी यामाशिटा आणि रवांडाच्या सलिमा मुकसंगा या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील अन्य महिला पंच आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 18:50 IST
Next Story
विश्लेषण : ४ लाखांत खरेदी ७ हजार कोटींमध्ये विक्री, ‘बिसलरी’ कंपनीचा इतिहास काय? विकण्याचा निर्णय का घेतला?