येमेनच्या हुथी बंडखोरांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथील अबू धाबी येथे सोमवारी संशयित ड्रोन हल्ला केला. या स्फोटक हल्ल्यांमध्ये आतापर्यंत तीन जण ठार झाल्याची नोंद झाली असून त्यात दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. अबू धाबी पोलिसांनी सांगितले की, अबुधाबीच्या औद्योगिक शहरामध्ये एडीएनओसीच्या स्टोरेज टँकजवळ पेट्रोलियम वाहतूक करणाऱ्या तीन टँकरला आग लागल्याने दोन भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक ठार झाले आणि सहा जण जखमी झाले. मुसाफा परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी स्फोट केल्याची माहिती अबू धाबी पोलिसांनी दिली.
येमेनच्या हुथी बंडखोरांनी जबाबदारी स्विकारली
यूएईमधील या ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी हुथी बंडखोरांनी स्वीकारली. इराण-समर्थित येमेनच्या हुथी बंडखोरांनी सांगितले की संयुक्त अरब अमिरातीमध्ये ड्रोन हल्ल्यांमागे त्यांचा हात आहे. संयुक्त अरब अमिरातीने येमेनमध्ये नुकत्याच केलेल्या कारवाईला उत्तर म्हणून हे पाऊल उचलल्याचे बंडखोरांनी सांगितले आणि अबू धाबीला लक्ष्य केले. गेल्या आठवड्यात, अमीराती-समर्थित सैनिकांनी शाब्वा या तेल समृद्ध प्रांतात हुथींचा अनपेक्षित पराभव केला. येमेनमधील सौदीच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये स्थानिक सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी अमीरातने अलीकडेच आपले प्रयत्न वाढवले आहेत.
हुथी बंडखोर आणि हुथी चळवळ काय आहे?
हुथी चळवळीला अधिकृतपणे अन्सार अल्लाह म्हटले जाते आणि हुथी ही एक इस्लामिक राजकीय आणि सशस्त्र चळवळ आहे जी १९९० च्या दशकात उत्तर येमेनमधील सादा येथून उदयास आली. हुथी चळवळ ही मुख्यत्वे झैदी शिया शक्ती आहे, ज्याचे नेतृत्व मुख्यत्वे हुथी टोळी करते. येमेनच्या उत्तरेकडील भागातील शिया मुस्लिमांची ही सर्वात मोठी आदिवासी संघटना आहे. उत्तर येमेनमध्ये सुन्नी इस्लामच्या सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला हुथींचा विरोध आहे.
येमेनमध्ये हुथींनी दोन राष्ट्राध्यक्षांना सत्तेवरून हटवले
येमेनच्या सुन्नी मुस्लिमांशी हुथींचा संबंध हे चांगला नसल्याचा इतिहास आहे. या चळवळीने सुन्नींशी भेदभाव केला, पण त्यांच्याशी युती करून त्यांची भरतीही केली. हुसेन बदरेद्दीन अल-हौती यांच्या नेतृत्वाखाली, हा गट येमेनचे माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांचा विरोधक म्हणून उदयास आला, ज्यांच्यावर त्यांनी व्यापक आर्थिक भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या पाठिंब्यावर टीका केली. २००० च्या दशकात बंडखोर शक्ती बनल्यानंतर, २००४ ते २०१० पर्यंत येमेनचे अध्यक्ष सालेह यांच्या सैन्याशी हुथींनी सहा वेळा युद्ध केले. २०११ मध्ये, अरब देशांच्या (सौदी अरेबिया, यूएई, बहरीन आणि इतर) हस्तक्षेपानंतर हे युद्ध शांत झाले. मात्र, देशातील जनतेच्या निदर्शनामुळे हुकूमशहा सालेह यांना पद सोडावे लागले. यानंतर अब्दारब्बू मन्सूर हादी येमेनचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. अपेक्षा असूनही, हुथी त्यांच्यावर खूश झाले नाहीत आणि त्यांनी पुन्हा बंडखोरी केली आणि त्यांना अध्यक्षपदावरून काढून टाकून राजधानी सना ताब्यात घेतली.
हुथी का लढत आहेत?
येमेनच्या सत्तेवर हुथींनी ताब्या मिळवल्यानंतक शेजारील देशांतील सुन्नी मुस्लिमांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे सांगितले जाते. सुन्नीबहुल सौदी अरेबिया आणि यूएई हे घाबरले होते, त्यानंतर त्यांनी अमेरिका आणि ब्रिटनकडे मदतीसाठी धाव घेतली. पाश्चिमात्य देशांच्या मदतीने हुथींवर हवाई आणि जमिनीवरुन हल्ले सुरू केले आणि या देशांनी सत्तेतून हकालपट्टी केलेल्या हादीला पाठिंबा दिला. परिणामी, येमेन आता गृहयुद्धाची रणभूमी बनली आहे. येथे सौदी अरेबिया, यूएईचे सैन्य हुथी बंडखोरांचा सामना करत आहेत.
सौदीच्या नेतृत्वाखालील युतीला अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सकडून लष्करी आणि गुप्तचर मदत मिळाली. युद्धाच्या सुरूवातीस सौदी अधिकाऱ्यांनी असे भाकीत केले की ते फक्त काही आठवडे टिकेल. पण सहा वर्षांचा लष्करी संघर्ष सुरूच आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये एडन या बंदर शहरात उतरल्यानंतर, युतीच्या भूदल सैन्याने हुथी आणि त्यांच्या सहयोगींना दक्षिणेतून बाहेर काढण्यास मदत केली. मात्र, बंडखोरांना सना आणि बहुतेक उत्तर-पश्चिम भागातून बाहेर काढता आले नाही.