हवामान विभागाने देशातल्या २७ शहरांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अशा ‘हीट वेव’मध्ये प्रत्यक्ष तापमानावर अवलंबून राहण्यापेक्षा शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेचा अदमास घेतल्यास ते अधिक फायद्याचे ठरते.
प्रत्यक्ष तापमान म्हणजे काय?
प्रत्यक्ष तापमान म्हणजे हवामान मोजणाऱ्या उपकरणांनी ठरावीक, नियंत्रित परिस्थितीत (साधारणपणे सावलीत) मोजलेले हवेचे तापमान. हे तापमान हवा किती गरम किंवा थंड आहे ते दाखवते, पण त्यात मानवी शरीरावर होणाऱ्या इतर परिणामांचा विचार केला जात नाही. उदाहरणार्थ, ४१ अंश सेल्सियस तापमान तीव्र उष्णतेची स्थिती दर्शवते, पण बाहेर प्रत्यक्षात ती उष्णता कशी जाणवते, याचा अंदाज यातून येत नाही.

‘जाणवणारे’ तापमान म्हणजे काय?

‘जाणवणारे’ (फील्स लाइक) तापमान हा असा निर्देशांक आहे, जो हवामान प्रत्यक्षात कसे जाणवते याचा अंदाज देतो. यात हवेचे तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग यांचा एकत्रित विचार केला जातो. उष्णतेच्या लाटेदरम्यान हे शरीराला जाणवणारे तापमान अनेकदा प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त असते, त्यामुळे तापमापकाचा पारा दाखवतो, त्यापेक्षा हवामान अधिक तीव्र वाटते.

हेही वाचा

उष्णता आणि आर्द्रतेमुळे जाणिवेत बदल?

उष्ण हवामानात ‘हीट इंडेक्स’च्या आधारे गणना केली जाते. जास्त आर्द्रतेमुळे घाम वाफेत लवकर रूपांतरित होत नाही. घामाचे बाष्पीभवन हा शरीर थंड ठेवण्याचा मुख्य मार्ग आहे. पण घाम नीट वाफेत न बदलल्यास शरीरात उष्णता साचून राहाते आणि तापमान अधिक जाणवते. म्हणूनच ४१ अंश सेल्सियस तापमान आर्द्र हवेत प्रत्यक्षात आणखी जास्त गरम वाटू शकते.

वारा आणि सूर्यप्रकाशाची भूमिका

वारा आणि सूर्यप्रकाशही हवामानाची जाणीव बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. थेट सूर्यप्रकाशामुळे शरीरात उष्णता अधिक प्रमाणात शोषली जाते आणि ‘ऊन लागते’. पण वारा असल्यास शरीरावर घाम फुटला असेल तरी वाऱ्यामुळे तो वाफेत रूपांतरित होण्यास मदत होते आणि थोडा आराम मिळतो. अनेक हवामान प्रणाली सूर्यकिरणांचा परिणाम आणि ढगांचे प्रमाण यांचाही विचार करून ‘फील्स लाईक’ किंवा ‘जाणवणारे’ तापमान मोजतात. त्यामुळे हा निर्देशांक अधिक वास्तव परिस्थिती दर्शवणारा ठरतो.

‘जाणवणारे’ तापमान कसे मोजले जाते?

जाणवणारे तापमान थेट थर्मामीटरने मोजले जात नाही. ते गणिती सूत्राने काढले जाते. हे तापमान मोजण्याचे मुख्य घटक आहेत – हवेचे तापमान, आर्द्रता, (कधी) वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाश.

उदाहरणार्थ, उष्ण हवामानात जास्त आर्द्रता असेल तर घामाचे वाफेत रूपांतर होत नाही. त्यामुळे शरीर जास्त गरम वाटते. याउलट थंड हवामानात (विशेषतः परदेशात) वारा जास्त असेल तर ‘विंड चिल’मुळे अधिक थंड वाटते. एक सोपे उदाहरण घेऊ. तापमान ४० अंश सेल्सिअस असेल आणि हवेत आर्द्रताही खूप जास्त असेल तर शरीराला तेच ४० अंश तापमान ४५ ते ४७ अंश सेल्सिअससारखे जाणवू शकते. म्हणजे कधीकधी आपल्याला तापमापकाच्या तेवढ्यात तापमानावर काहिली जाणवते तर कधी ते सह्य असू शकते.

हेही वाचा

‘जाणवणाऱ्या तापमानाचा’ कोणत्या देशांत वापर?

ही संकल्पना जगभर वापरली जाते. वेगवेगळ्या देशांत याला वेगवेगळी नावे आहेत. अमेरिकेत या तापमानाला ‘हीट इंडेक्स’ म्हणतात, कॅनडात ‘ह्युमिडेक्स’, ऑस्ट्रेलियात ‘अॅपॅरंट टेम्परेचर’ म्हटले जाते. युरोपात काही ठिकाणी याला ‘फील्स-लाइक टेम्परेचर’ म्हणतात. ही जागतिक पातळीवर मान्य केलेली पद्धत आहे.

भारतात हे मोजले जाते का?

भारतातही याची गणना केली जाते. ‘जाणवणारे तापमान’ ही संकल्पना विशेषतः भारतासारख्या उष्ण आणि दमट हवामानात खूपच महत्त्वाची आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) आता ‘हीट इंडेक्स’ जाहीर करू लागला आहे. विशेषतः उष्णतेच्या लाटेदरम्यान लोकांना सावध करण्यासाठी या शरीराला जाणवणाऱ्या तापमानाचा वापर वाढतो आहे. काही खासगी हवामान ॲप्स (जसे अॅक्युवेदर, वेदर डॉट कॉम) भारतासाठीही ‘जाणवणारे तापमान’ दाखवतात.

उष्णतेच्या इशाऱ्यांमध्ये महत्त्व किती?

हवामान विभागाने अनेक शहरांसाठी इशारे दिले असताना ‘जाणवणारे’ तापमान अत्यंत महत्त्वाचे ठरते. हे शरीरावर होणाऱ्या उष्णतेच्या ताणाचा अधिक अचूक अंदाज देते. त्यामुळे लोकांना बाहेर जाण्याची वेळ, पाणी पिण्याचे प्रमाण आणि उन्हात राहण्याचा कालावधी याचे योग्य नियोजन करता येते. तीव्र उन्हाळ्यात फक्त प्रत्यक्ष तापमान पाहण्यापेक्षा ‘जाणवणारे’ तापमान पाहिल्यास धोका अधिक स्पष्टपणे समजतो.

manisha.devne@expressindia.com