बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. वायुप्रदूषण घातक ठरत असल्याने नागरिकांना आरोग्याची नियमित तपासणी करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यादरम्यान देशातील तब्बल दीड कोटींहून अधिक नागरिकांना डोळ्यांच्या गंभीर आजाराने विळखा घातल्याचे समोर आले आहे. ‘एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन’ असे या आजाराचे नाव आहे. २०४० पर्यंत जगभरात या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा आकडा २८८ दशलक्ष पर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेमका काय आहे हा आजार? त्याची लक्षणे नेमकी कोणती? त्याविषयीचा हा आढावा…
काय आहे एएमडी आजार?
एएसजी आय रुग्णालयाचे क्लिनिकल अधिकारी डॉ. हिमांशू शेखर यांनी न्यूज १८ शी बोलताना ‘एज रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन’ (एएमडी) आजारासंदर्भात माहिती दिली. एएमडीची लागण झाल्यानंतर डोळ्याच्या पडद्याच्या मध्यभागी असलेल्या प्रकाशसंवेदक पेशी खराब होतात. सहसा हा आजार वाढत्या वयामुळे होतो आणि तो डोळ्यातील मॅकुला नावाच्या भागाला खराब करतो. एएमडीमुळे दृष्टीच्या मध्यभागातील स्पष्टपणा नाहीसा होतो, असे त्यांनी सांगितले. अलीकडील अभ्यासांनुसार हा आजार तरुणांमध्येही आढळून येत असल्याने डॉ. हिमांशू यांनी चिंता व्यक्त केली आहे.
भारतातही वाढतेय एएमडीची रुग्णसंख्या
भारतासह जगभरात एज-रिलेटेड मॅक्युलर डीजनरेशन (एएमडी) आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. सध्या जगभरात १९ कोटींहून अधिक लोक एएमडीने प्रभावित असून २०२४ पर्यंत ही संख्या २८.८ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतामध्ये ५१ ते ६० वयोगटातील सुमारे १२.५ टक्के नागरिकांना एएमडीचा त्रास आहे; तर ७१ ते ८० वयोगटात हे प्रमाण थेट ४१.७ टक्क्यांपर्यंत असल्याने ही गंभीर बाब मानली जात आहे. भारतासह अमेरिका आणि चीन हे तीन देश एएमडीच्या रुग्णसंख्येत आघाडीवर असल्याचे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना या आजाराची अधिकच लागण होत आहे.
आणखी वाचा : जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानची चिथावणीखोर भाषा; भारतासाठी धोक्याची घंटा? पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय घडले?
डॉ. हिमांशू शेखर यांनी काय सांगितलं?
बदलती जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे भारतात एएमडीने बाधित असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉ. शेखर यांनी सांगितले. हा आजार दृष्टी कमजोर करण्याचे महत्त्वाचे कारण ठरत असून वृद्ध वयोगटातील लोकसंख्या वाढत गेल्याने पुढील काळात त्याची संख्या आणखीनच वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय मधुमेहाचे वाढते प्रमाण, शहरी जीवनशैलीतील शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीचा आहार, धूम्रपान आणि हृदयविकाराचा धोका यामुळे आजाराची तीव्रता वाढते. शहरीकरणामुळे या आजाराची लवकर सुरुवात आणि वेगाने प्रगती होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे भारतात डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्याची तातडीची गरज अधोरेखित झाली आहे.
एएमडी आजारामागे कोणते घटक कारणीभूत?
- धूम्रपान करणाऱ्यांना एएमडी होण्याचा धोका चार पटीने अधिक असतो.
- सिगारेटमधील हानिकारक पदार्थांमुळे शरीरातील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.
- धूम्रपानामुळे डोळ्यांकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि एएमडीचा धोका वाढतो.
- शरीरातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे डोळ्यांतील मॅकुला नावाचा भाग कमकुवत होतो.
- मॅकुला कमकुवत झाल्यास कालांतराने दृष्टी जाण्याची शक्यता वाढते आणि एएमडीचा धोका निर्माण होतो.
- मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांना मॅक्युलर डिजनरेशन होण्याचा धोका अधिक असतो.
- हृदयाचे आरोग्य खराब असल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्यांतील मॅकुला नावाच्या भागावर होतो.
- गंभीर हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये एमएमडी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या जास्त असते.
- या कारणांमुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सकस आहार आणि निरोगी जीवनशैली राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
हेही वाचा : इस्लामाबादमधील मशिदीतील स्फोटाबद्दल प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? पाकिस्तानमधले दहशतवादी कोण?
एएमडीची सुरुवातीची लक्षणे कोणती?
एएमडी हळूहळू वाढत असल्यामुळे त्याची सुरुवातीची लक्षणे अनेकदा लक्षात येत नाहीत. डोळ्यांच्या गंभीर आजाराची हीच सर्वात धोकादायक बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वाचन करताना अक्षरे थोडी धूसर दिसणे हे एएमडीचे प्राथामिक लक्षण आहे. त्याशिवाय दरवाजाच्या चौकटी किंवा खिडकीच्या ग्रील्स सारख्या सरळ रेषा वाकड्या किंवा विकृत दिसू लागणे, रंग फिके दिसणे आणि चेहरे ओळखण्यासाठी जास्त लक्ष केंद्रित करावे लागणे, पूर्वीपेक्षा जास्त प्रकाशाची गरज भासणे, यांसारख्या लक्षणांचाही त्यात समावेश आहे. अनेकदा हे बदल हळूहळू होत असल्याने अनेकजण याकडे थकवा, वाढते वय किंवा नवीन चष्म्याची गरज म्हणून दुर्लक्ष करतात; त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेण्यास उशीर होतो आणि तोपर्यंत डोळ्यांचे बरेच नुकसान झालेले असते.
एएमडी आजार टाळण्यासाठी काय करावे?
एएसजी नेत्र रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. विकास जैन यांनी या आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना सांगितल्या आहेत. वयाची चाळिशी गाठलेल्या नागरिकांनी वर्षातून किमान एकदा नेत्र तपासणी करून घ्यावी. डोळ्यांच्या आजारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या लोकांनी दरवर्षी तपासणी करावी, धूम्रपानाची सवय तातडीने सोडावी, आहारामध्ये पालेभाज्यांसह पौष्टिक पदार्थ, सुका मेवा आणि मासे यांचा समावेश करावा. नियमित व्यायाम केल्यास डोळ्यांसह रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित राहतो, असा सल्ला डॉ. विकास जैन यांनी दिला आहे. डोळ्यांची काळजी व वेळीच उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो असेही ते म्हणाले.

