इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या आणि द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतात मधुमेहाचे संकट अतिशय चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. सुमारे १० कोटींपेक्षा अधिक भारतीय मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०१९ मधील मधुमेहाच्या आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण ४७ टक्क्यांनी जास्त आहे. त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे या १० कोटींव्यतिरिक्त १३ कोटी ६० लाख लोकांना प्री-डायबेटिक लक्षणे असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या जवळपास एक-चतुर्थांश लोकसंख्येला मधुमेहाचा धोका असल्याचे यावरून स्पष्ट होते.
मधुमेह हा आजार डोळ्यांसह शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम करतो. बहुतांश हानिकारक परिणाम करणाऱ्या या गंभीर आव्हानाबाबत रेटिना तज्ज्ञ डॉ. दरायस श्रॉफ आणि श्रॉफ आय सेंटरचे रेटिना सर्जन डॉ. गगन भाटिया यांनी माहिती दिली आहे. या तज्ज्ञांनी डायबेटिक रेटिनोपॅथीच्या गंभीर पैलूंवर आणि त्याच्या दूरगामी परिणामांवर प्रकाश टाकला आहे.

भारतातील मधुमेहाची आकडेवारी काय सांगते?
भारतातील मधुमेहाची आकडेवारी अतिशय चिंताजनक परिस्थिती समोर आणते. अलीकडेच केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, फक्त सात टक्के भारतीय रक्तातील साखरेची पातळी योग्यरीत्या नियंत्रित ठेवतात. बहुतेकांना तर त्यांच्या मधुमेहाची सद्य:स्थिती माहीतच नाही किंवा त्यांनी कधीही ग्लुकोज चाचणी करून घेतलेली नाही. या संदर्भात जागरूकता नसल्याने मधुमेही रेटिनोपॅथीच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ होताना दिसत आहे. या आजारात रक्तातील साखर हळूहळू रेटिनाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. परिणामी दृष्टी कायमस्वरूपी कमी होण्याची शक्यता असते.

मधुमेहींना डोळ्यांच्या कोणत्या समस्या उद्भवतात?
डॉ. गगन भाटिया यांनी या संदर्भात सांगितले की, अनियंत्रित मधुमेह डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करतो. त्यामुळे रक्तातील साखर दृष्टीसंदर्भात अतिशय धोकादायक समस्या निर्माण करते. त्यामध्ये साधारणपणे दृष्टीत वारंवार बदल, अकाली मोतीबिंदू व डायबेटिक रेटिनोपॅथी यांचा समावेश आहे. कालांतराने मधुमेह रेटिनाच्या रक्तवाहिन्यांना कमकुवत करतो. त्यामुळे दृष्टीचे हळूहळू नुकसान होत जाते. द्रवगळतीमुळे रेटिनाला सूज येते आणि कोलेस्ट्रॉल जमा होते. यामधील गंभीर प्रकरणांमध्ये डोळ्यात रक्तस्राव होण्याचीही शक्यता असते. हे बदल अनेकदा संथ गतीने परिणाम करतात. मात्र, शेवटी दृष्टीवर अपरिवर्तनीय बदल होऊन, ती कमी होऊ शकते.

मधुमेही रुग्णांनी किती वेळा डोळ्यांची तपासणी करावी?
डॉ. श्रॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजाराचे निदान लवकर झाल्यास दृष्टी वाचू शकते. मधुमेह रुग्णांनी दरवर्षी डोळ्यांची डायलेटेड (पसरलेले डोळे) तपासणी करावी. त्यामध्ये निदान झाल्यानंतर लगेचच उपचार सुरू करावेत, जेणेकरून रेटिनल बेसलाइन स्थापित होते. अभ्यासात असे आढळले आहे की, भारतात नवीन निदान झालेल्या मधुमेहींपैकी चार ते सात टक्के रुग्णांमध्ये आधीच डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणे दिसून येतात.
जोखीम जास्त असलेल्या व्यक्तींसाठी म्हणजेच विद्यमान रेटिनोपॅथी किंवा रक्तात अनियंत्रित साखर असलेल्यांनी वारंवार तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये वेळेवर योग्य उपचार आणि व्यापक तपासणी महत्त्वाची ठरते. लक्षणे नसतानाही प्रत्येक मधुमेही व्यक्तीसाठी वार्षिक रेटिनल तपासणी कुठल्याही परिस्थितीत करणे आवश्यक आहे.

भारतात डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये कोणते घटक जोखमीचे आहेत?
भारतीयांना मधुमेह होण्याची शक्यता असते. शहरी भागात कार्बोहायड्रेटयुक्त आहार आणि व्यायामाचे कमी प्रमाण यामुळे रक्तातील अनियंत्रित साखरेची समस्या वाढत आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीच्या विकास आणि बिघाड यांत अनेक घटक महत्त्वाचे ठरतात. रक्तातील साखरेवर कमी नियंत्रण, दीर्घकाळ मधुमेह असणे, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, तसेच इतर आजारांबाबत जागरूकताच नसणे हे घटक यासाठी कारणीभूत ठरतात.

डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी कोणत्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत?
मधुमेहाचा उपचार मधुमेह कोणत्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून असतो. त्यामध्ये लेसर फोटोकेग्युलेशन, इंट्राव्हिट्रिअल अँटी-व्हीईजीएफ इंजेक्शन्स आणि व्हिट्रेक्टॉमी सर्जरी अशा उपचारपद्धतींचा समावेश आहे. अँटी-व्हीईजीएफ इंजेक्शन्स मधुमेहींसाठी सर्वांत मोठे वरदान आहेत. कारण- ते रेटिनाच्या बारीक दृष्टीच्या भागात सूज कमी करण्यास आणि दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करतात. असामान्य रक्तवाहिन्या असलेल्या रुग्णांमध्ये लेसर उपचार प्रोलिफेरेटिव्ह रेटिनोपॅथीच्या टप्प्यात केले जातात, जेणेकरून रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजार आहे तिथवर थांबण्यास मदत होते. लेसर उपचारांबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. लेसर उपचारपद्धती हानिकारक असते, असा समज आहे. मात्र, हीच उपचारपद्धती रेटिनामधील रक्तस्राव रोखण्यासाठीची सर्वांत सिद्ध आणि महत्त्वाची ठरते.
गंभीर प्रकरणांमध्ये रक्त आणि डोळ्याचा पडदा काढून टाकण्यासाठी सर्व असामान्य रक्तवाहिन्या नष्ट करण्यासाठी व्हिट्रेक्टॉमी उपचारपद्धती वापरली जाते. त्यामुळे वारंवार होणारा रक्तस्राव थांबवता येतो. तसेच रेटिनोपॅथीच्या काही शेवटच्या टप्प्यांतील प्रकरणांमध्ये रेटिनाचा थर वेगळा झाल्यास रेटिनामध्ये सुधारणा होऊ शकते.

मधुमेही व्यक्तींनी त्यांची दृष्टी सुरक्षित राहावी यासाठी काय करावे?
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रक्तातील साखरेचे काटेकोरपणे नियंत्रण करणे, त्यासाठी औषधांचे वेळेवर सेवन करा किंवा एंडोक्रायनोलॉजिस्टने सांगितलेल्या इन्सुलिन थेरपीद्वारे नियंत्रण ठेवा.

आधुनिक मॉनिटरिंगद्वारे आता नियमित ग्लुकोज ट्रॅकिंग शक्य आहे. या आजारासाठी उपचार घेत असताना त्यासोबत पोषणतज्ज्ञांनी मान्यता दिलेला संतुलित आहार घ्या, सातत्यपूर्ण शारीरिक व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी यांची जोड द्या. रुग्णांनी डायबेटिक रेटिनोपॅथीची संकेत देणारी चिन्हे ओळखली पाहिजेत आणि त्यानुसार त्वरित काळजी घ्यायला हवी. तुमचा मधुमेह जरी नियंत्रणात असेल तरीही दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी डोळ्यांची तपासणी खूप महत्त्वाची आहे.

मधुमेहाचा दृष्टीवर होणारा परिणाम कधी लक्षात येतो?
साखरेचे अनियंत्रित प्रमाण असलेल्या बहुतेक रुग्णांना दृष्टीत चढ-उतार, अंधुक दिसणे, फ्लोटर्समध्ये वाढ (डोळ्यांसमोर काळे ठिपके येणे), दृष्टी कमी होणे असे अनुभव येऊ शकतात. कोणतीही लक्षणे नसतानाही मधुमेहींनी दरवर्षी डोळ्यांची तपासणी करून घ्यायलाच हवी.

मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि आरोग्य सेवेवर परिणाम
या आजाराबाबतचा भार खूपच धक्कादायक आहे. लेसर थेरपी, इंजेक्शन व शस्त्रक्रियांच्या कठीण पद्धतींसह डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करणे यामुळे आधीच आरोग्य सेवेवर ताण निर्माण होत आहे. तरीही मधुमेहाचे व्यवस्थापन करण्याच्या मोठ्या आव्हानासमोर तो कमीच आहे. या आजारात दृष्टी कमी होत असल्यामुळे ही समस्या आणखी बळावते. परिणामी नोकरी गमावली जाते, उत्पादकता कमी होते आणि अवलंबित्व वाढते. तसेच आयुष्य आणि आपली अर्थव्यवस्था अशा दोन्हीवर याचा परिणाम होतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर होते. ग्रामीण भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधा, तसेच जागरूकतेचा अभाव यामुळे टाळता येण्याजोगे अंधत्व वेगाने वाढत जाते. या आजारावरील अभ्यासात मोठा इशाराही देण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत भारतातील मधुमेहाशी संबंधित खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

भारतात रेटिनोपॅथी व्यवस्थापनासाठी कोणत्या धोरणांची आवश्यकता
सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून डायबेटिक रेटिनोपॅथी यालाही मधुमेहाबरोबरच प्राधान्य दिले जाणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या उपचारांशी संबंधित गैरसमज दूर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आजाराचे वेळेवर निदान, वेळेवर उपचार व व्यापक व्यवस्थापन यांची सांगड घातली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे. सर्वांत प्रथम जनजागृती मोहिमा आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवेची उपलब्धता यांमार्फत मधुमेह प्रतिबंध आणि व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता आहे. दुसरी बाब ही की, लवकर निदान होण्यासाठी डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी देशव्यापी स्क्रीनिंग कार्यक्रम होणे महत्त्वाचे आहेत. तसेच एआय मॉडेल्ससह या क्षेत्रात काही प्रगतीही झाली आहे. तिसरी बाब म्हणजे अधिकाधिक लोकांनी रेटिना तपासणी करणे, तसेच रेटिना तज्ज्ञांनी पुरेपूर प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. कारण- रेटिना तज्ज्ञांची संख्या खूप कमी आहे. त्याशिवाय या आजारावर नवीन उपचार आणि तंत्रज्ञानाचे संशोधन सुरू आहे.