US Stealth Tech vs Iranian Defense : २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील इस्रायल व अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले केले. २१ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झळा जगभरातील अनेक देशांना जाणवत आहेत. पश्चिम आशियातील या तणावामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक प्रभावीत झाल्याने बहुतांश देशात खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यादरम्यान इराणच्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याविषयीचा हा आढावा…

अमेरिकेचे प्रगत एफ-३५ विमान निकामी?

पश्चिम आशियातील एका अमेरिकन हवाई तळावर अमेरिकेच्या एफ-३५ या लढाऊ विमानाला गुरुवारी आपत्कालीन लँडिग करावे लागले. इराणी सैनिकांनी केलेल्या गोळीबारामुळे या विमानाला फटका बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एफ-३५ हे अमेरिकेच्या लष्करी ताफ्यातील अत्यंत प्रगत विमान मानले जाते. इराणने आता अधिकृतपणे दावा केला आहे की, त्यांनी या विमानावर यशस्वी प्रहार केला असून, असा हल्ला करणारा तो जगातील पहिला देश ठरला आहे. जर त्यांचा हा दावा खरा ठरला, तर ती जागतिक संरक्षण क्षेत्रातील एक मोठी घटना असेल. कारण- २०१८ पासून प्रत्यक्ष युद्धभूमीवर तैनात असणाऱ्या एफ-३५ या प्रगत विमानाचे शत्रूच्या गोळीबारात नुकसान झाल्याचे एकही अधिकृत उदाहरण समोर आलेले नाही. एफ-३५ हे विमान त्याच्या ‘स्टेल्थ’ तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते, ज्यामुळे ते अदृश्यपणे शत्रूच्या रडारलाही चकवा देऊ शकते. अशा विमानाला इराणने लक्ष्य करणे ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब ठरू शकते.

आणखी वाचा : US Immigration : दोन लाख रुपये घ्या अन् तातडीने देश सोडा; अमेरिकेने भारतीयांना काय ऑफर दिली?

अमेरिकेच्या हवाई शक्तीला मोठा तडाखा?

इराणच्या हल्ल्यात खरेच अमेरिकेच्या प्रगत लढाऊ विमानाचे नुकसान झाले का, याबाबतची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरीदेखील अमेरिकेच्या काही वृत्तवाहिन्यांच्या माहितीनुसार, इराणवर हवाई हल्ला करून परतताना एफ-३५ विमानाचे शत्रूंच्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आणि त्यामुळेच वैमानिकाला जवळच्या हवाई तळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. हॉकिन्स यांनी सांगितले की, एफ-३५ विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले असून, वैमानिकाला कोणतीही इजा झालेली नाही. या प्रकरणाचा सध्या कसून तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानाला इराणच्या हल्ल्याचा फटका बसला असण्याची दाट शक्यता आहे.

इराणचा दावा इतका का महत्त्वाचा?

अमेरिकेच्या एफ-३५ विमानाच्या आपत्कालीन लँडिंगची बातमी समोर येताच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अधिकृत निवेदन जारी केले. गुरुवारी पहाटे स्थानिक वेळेनुसार २:५० वाजता मध्य इराणच्या आकाशात इराणच्या प्रगत हवाई संरक्षण प्रणालीने अमेरिकेच्या लढाऊ विमानाला लक्ष्य केल्याचा दावा या निवेदनातून करण्यात आला. यादरम्यान ‘तेहरान टाइम्स’ने या हल्ल्याचा एक व्हिडीओही शेअर केला, ज्यामध्ये आकाशात स्फोट, धुराचे लोट आणि विमानाचा मार्ग भरकटताना दिसून येत आहे. जर इराणचा हा दावा खरा ठरला, तर जगातील सर्वांत महागड्या (सुमारे ८०० कोटी रुपये) आणि अमेरिकेच्या हवाई दलाचा कणा मानल्या जाणाऱ्या पाचव्या श्रेणीतील या लढाऊ विमानावर झालेला हा पहिला यशस्वी हल्ला ठरेल.

इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे किती नुकसान?

इराणने केलेल्या हल्ल्यांत आतापर्यंत अमेरिकन लष्कराच्या तब्बल १६ विमानांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, कुवैतच्या हवाई संरक्षण प्रणालीने अमेरिकेची तीन एफ-१५ विमाने चुकून पाडली होती; मात्र सर्व वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. त्याशिवाय गेल्या आठवड्यात पश्चिम इराकमध्ये अमेरिकेचे केसी-१३५ हे इंधन भरणारे विमान कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता. अमेरिकन लष्कराने हा अपघात शत्रूच्या हल्ल्यामुळे झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. या युद्धात आतापर्यंत १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून, २०० हून अधिक जखमी झाल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Iran Execution : इराणमध्ये १९ वर्षीय कुस्तीपटूला फाशी; कोण होता सालेह मोहम्मदी? त्याचा नेमका गुन्हा काय?

अमेरिका व इस्रायलचा नेमका दावा काय?

अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इराणविरोधातील कारवाईत आपल्याला मोठे यश मिळत असल्याचा दावा कायम ठेवला आहे. संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी अमेरिकन सैनिक निर्णायक कामगिरी करून इराणच्या सुरक्षा यंत्रणेला कमकुवत करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी इराणची हवाई संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात निष्प्रभ झाल्याचाही दावा केला आहे. इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षाबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खळबळजनक विधान केले आहे. २० दिवसांच्या भीषण संघर्षानंतर इराणची अण्वस्त्र व क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे नष्ट झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. इराणच्या अणू प्रकल्पांना आणि क्षेपणास्त्र निर्मिती केंद्रांना इतका मोठा तडाखा बसला आहे की, ते जवळपास नष्ट झाले आहेत. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखणे हे इस्रायलचे मुख्य उद्दिष्ट होते आणि ते साध्य झाल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.