Fall Risk Symptoms and Balance and Prevention: “अहो, अजूनपर्यंत मी पडलेलो नाही, मग काळजी कशाला?” असा विचार अनेकजण करतात. पण प्रत्यक्षात कोणतीही व्यक्ती अचानक पडत नाही; त्याआधी वारंवार अडखळणे, जिना उतरताना भीती वाटणे किंवा चालण्याचा वेग मंदावणे यांसारखे सूक्ष्म संकेत शरीर देत असते.

शरीराचे महत्त्वाचे संकेत देतं

“अहो, अजूनपर्यंत मी पडलेलो नाही. मग पडण्याची काळजी कशाला?” पडण्याबद्दल बोलताना अनेकजण असंच म्हणतात. जोपर्यंत एखादी व्यक्ती प्रत्यक्ष पडत नाही, तोपर्यंत तिला स्वतःमध्ये पडण्याचा धोका आहे असं वाटत नाही. पण प्रत्यक्षात शरीर अनेकदा पडण्यापूर्वीच काही सूक्ष्म संकेत देत असतं. चालताना वारंवार अडखळणं, जिना उतरताना रेलिंग पकडणं, खुर्चीतून उठताना हाताचा आधार घेणं, अचानक दिशा बदलताना अस्थिर वाटणं किंवा पूर्वी सहज होत असलेलं चालणं आता जाणीवपूर्वक करावं लागणं हे सगळे शरीराचे महत्त्वाचे संकेत असू शकतात.

चालण्याचा वेग कमी होतो…

पडणं ही अचानक घडणारी घटना असली, तरी पडण्याचा धोका अनेकदा हळूहळू वाढत असतो. चालण्याचा वेग कमी होणं हे अनेकदा होतं. आपण पूर्वीपेक्षा हळू चालतोय का, याचा विचार करावा. हे वय वाढल्यामुळेच होतं असं समजून अनेकजण दुर्लक्ष करतात. पण चालण्याचा वेग कमी होणं हे शरीराच्या एकूण कार्यक्षमतेतील बदलाचं संकेत असू शकतं. स्नायूंची ताकद, संतुलन, सहनशक्ती किंवा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे व्यक्ती नकळत हळू चालू लागते. विशेषतः चालण्याचा वेग अचानक कमी झाला असेल, तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Fall Risk Symptoms Balance and Prevention Elderly Marathi | Early signs of losing balance in older adults | फॉल रिस्क लक्षणे आणि वृद्ध व्यक्तींमध्ये तोल जाण्याची कारणे | वयस्कर व्यक्तींमध्ये पडण्याचा धोका ओळखण्याचे उपाय
फॉल रिस्क लक्षणे: शरीर पडण्यापूर्वी देणारे महत्त्वाचे संकेत

वारंवार अडखळणं

“पाय अडखळला, पण मी पडलो नाही.” असं एखाद्या व्यक्तीने एक-दोनदा सांगितलं तर कदाचित ते अपघाती असेल. पण वारंवार पाय अडखळत असेल, दाराच्या चौकटीला किंवा कार्पेटला पाय लागून तोल जात असेल, तर हा महत्त्वाचा संकेत आहे. यामागे पाय उचलण्याची क्षमता कमी होणं, स्नायूंची कमजोरी, संतुलनातील समस्या किंवा चालण्याच्या पद्धतीतील बदल कारणीभूत असू शकतात.

हात न वापरता खुर्चीतून सहज उठता येतं का?

पूर्वी सहज उठता येत होतं आणि आता हाताने खुर्ची पकडावी लागते, तर मांडी आणि नितंबाच्या स्नायूंची ताकद कमी झालेली असू शकते. हीच ताकद जिने चढताना, बसताना आणि चालताना शरीराला स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असते. म्हणून खुर्चीतून उठण्याची क्षमता ही Functional Strength चा महत्त्वाचा संकेत मानली जाऊ शकते.

जिना उतरताना भीती वाटणं

अनेकांना जिना चढण्यापेक्षा उतरताना अधिक असुरक्षित वाटतं. पाय कुठे ठेवायचा, शरीराचा तोल कसा राखायचा आणि पुढच्या पायरीवर किती भार द्यायचा या सगळ्यासाठी संतुलन आणि नियंत्रण आवश्यक असतं. जिना उतरताना सतत रेलिंग पकडावं लागत असेल किंवा प्रत्येक पायरीवर थांबावं लागत असेल, तर शरीर आपल्याला काहीतरी सांगत असू शकतं.

अचानक दिशा बदलताना तोल जाणं

सरळ चालताना सगळं ठीक असतं, पण अचानक मागे वळताना किंवा बाजूला वळताना अस्थिर वाटतं का?
दैनंदिन जीवनात आपण सतत दिशा बदलत असतो, स्वयंपाकघरात वळणं, रस्त्यावर अडथळा टाळणं, गर्दीतून जाणं. म्हणूनच फक्त सरळ चालता येणं पुरेसं नाही. शरीराला दिशा बदलतानाही नियंत्रण ठेवता आलं पाहिजे.

एका पायावर उभं राहणं कठीण होणं

पायात चप्पल घालताना किंवा कपडे बदलताना एका पायावर उभं राहावं लागतं. जर काही सेकंदही एका पायावर उभं राहणं कठीण वाटत असेल, तर संतुलनाची क्षमता तपासण्याची गरज असू शकते. मात्र हा प्रयोग स्वतःहून असुरक्षित परिस्थितीत करू नये. आधार जवळ असणं महत्त्वाचं आहे.

रात्री उठताना अस्थिर वाटणं

रात्री झोपेतून उठून बाथरूमला जाताना अंधार, झोपेची गुंगी आणि अचानक उभं राहिल्यामुळे शरीराचा तोल बिघडू शकतो. विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये हा काळ पडण्यासाठी अधिक धोकादायक ठरू शकतो. बेडजवळ पुरेसा प्रकाश, अडथळे नसलेला मार्ग आणि गरज असल्यास आधाराची व्यवस्था करणं उपयोगी ठरतं.

दृष्टीतील बदलांकडे दुर्लक्ष करू नका

पडण्याच्या धोक्यामध्ये फक्त स्नायू आणि संतुलनच कारणीभूत नसतात. दृष्टी कमी होणं, खोलीतील वस्तू स्पष्ट न दिसणं किंवा जमिनीवरील अडथळे नीट लक्षात न येणं यामुळेही पडण्याचा धोका वाढू शकतो. म्हणून नियमित दृष्टी तपासणीही महत्त्वाची आहे.

पायातील संवेदना कमी होणं

पाय जमिनीवर ठेवताना त्याची स्थिती आपल्याला अचूक कळणं आवश्यक असतं. पायात मुंग्या येणं, बधिरपणा किंवा संवेदना कमी होणं असल्यास शरीराला पायाची स्थिती समजण्यात अडचण येऊ शकते. विशेषतः मधुमेह किंवा काही न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

‘पडण्याची भीती’ हीसुद्धा एक खूण आहे

काही व्यक्ती प्रत्यक्ष पडलेल्या नसतात, पण त्यांना सतत पडण्याची भीती वाटते. म्हणून त्या जिने टाळतात, बाहेर जाणं कमी करतात किंवा चालताना सतत कोणाचा तरी हात धरतात. यामुळे हालचाल कमी होते आणि परिणामी स्नायू आणखी कमकुवत होऊ शकतात. अशा प्रकारे भीती → कमी हालचाल → कमजोरी → अधिक अस्थिरता → आणखी भीती, असं चक्र तयार होऊ शकतं. हे चक्र लवकर ओळखणं महत्त्वाचं आहे.

घरातील वातावरणही महत्त्वाचं…

पडण्याचा धोका फक्त शरीरामुळे वाढत नाही. घरातील पुढची कारणंही महत्त्वाची असतात:

  • सैल कार्पेट
  • निसरडी फरशी
  • कमी प्रकाश
  • वाटेत ठेवलेल्या वस्तू
  • बाथरूममध्ये आधार नसणं
  • योग्य आकाराची नसलेली पादत्राणं
    अशा गोष्टी असतील तर पडण्याची शक्यता वाढू शकते.

म्हणून Fall Prevention मध्ये व्यक्ती आणि तिच्या भोवतालच्या वातावरण, दोन्हींचा विचार आवश्यक आहे.

फिजिओथेरेपीमध्ये Fall Risk कशी तपासली जाते?

व्यक्तीची चालण्याची पद्धत, स्नायूंची ताकद, संतुलन, प्रतिक्रिया देण्याची क्षमता यांचं मूल्यमापन फिजिओथेरेपिस्ट करू शकतो. गरजेनुसार विविध फंक्शनल टेस्ट्स च्या मदतीने पडण्याचा धोका ओळखता येतो. यामध्ये उद्देश फक्त “तुम्हाला पडण्याचा धोका आहे” असं सांगणं नसून, धोका नेमका कुठे आहे हे शोधून त्यावर काम करणं हा असतो. कुणासाठी Strength Training आवश्यक असेल, तर कुणासाठी Balance Training. काहींना चालण्याच्या पद्धतीवर काम करण्याची गरज असू शकते, तर काहींच्या घरातील वातावरणात बदल करणं आवश्यक असू शकतं.

पडण्याची वाट पाहू नका

फॉल प्रिव्हेंशनचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे पहिल्यांदा पडल्यावरच उपाय सुरू करू नका. वारंवार अडखळणं, चालण्याचा वेग कमी होणं, खुर्चीतून उठताना आधार घेणं, जिन्यावर असुरक्षित वाटणं किंवा संतुलन बिघडणं यापैकी काही संकेत जाणवत असतील, तर त्यांचं मूल्यमापन करून घेणं फायदेशीर ठरू शकतं. कारण पडणं ही अनेकदा शेवटची घटना असते; त्यापूर्वी शरीराने दिलेले संकेत आपण ओळखले, तर पडणं टाळता येत. हे संकेत “वय झाल्यामुळे होतंय” म्हणून दुर्लक्षित करण्याऐवजी शरीराची कार्यक्षमता तपासण्याची संधी म्हणून पाहा.

फॉल प्रिव्हेंशनची पहिली पायरी

पडल्यावर उपचार करण्यापेक्षा पडण्यापूर्वी धोका ओळखणं अधिक शहाणपणाचं आहे. लक्षात ठेवा पडणं हा अपघात असू शकतो, पण पडण्याचा धोका अनेकदा आधीपासून शरीर सांगत असतं. त्या संकेतांकडे लक्ष देणं हीच फॉल प्रिव्हेंशनची पहिली पायरी आहे.