FASTag Annual Pass Price Hike : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग वार्षिक पासच्या दरात वाढ केली आहे. ही वाढ २०२६-२७ या वर्षासाठी असणार आहे. १२ मार्च रोजी एनएचएआयने याबाबत आदेश जारी केला. त्यानुसार व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जात नसलेल्या वाहनांना (नॉन-कमर्शियल) आता वार्षिक पाससाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. फास्टॅग वार्षिक पासची किंमत सध्या ३ हजार रूपये आहे, पण, १ एप्रिलपासून त्या किंमतीत वाढ होऊन ती ३०७५ रूपये असणार आहे.
मागील वर्षी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी एनएचएआयकडून फास्टॅग वार्षिक पास सुरू करण्यात आले. टोल नाक्यांवरील वाढलेल्या टोल चार्जेसपासून वाहनधारकांना दिलासा देण्यासाठी फास्टॅग वार्षिक पास सुरू करण्यात आले. टोल नाक्यावर खासगी वाहनांना जास्त वेळ थांबावे लागू नये, वाहतूक वेगाने व्हावी या उद्देशाने हे पास सुरू करण्यात आले आहेत.
व्यावसायिक कारणांसाठी वापर होत नसलेल्या वाहनांना हे पास दिले जातात. कार, जीप, व्हॅन या वाहनधारकांना हे पास दिले जातात. या वाहनांवरील फास्टॅग चालू अवस्थेत असावे, ही फास्टॅग वार्षिक पास मिळण्यासाठीची अट आहे. फास्टॅग वार्षिक पासची मुदत एक वर्षाची असते. तसेच या पासने राष्ट्रीय महामार्गावरील कोणत्याही २०० टोलनाक्यांना ओलांडता येते. या टोलनाक्यांवर टोल देण्याची आवश्यकता पासधारकांना नसते. राजमार्गयात्रा मोबाईल अॅप किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वेबसाईटवरून फास्टॅग वार्षिक पास विकत घेता येतात. फास्टॅग वार्षिक पासच्या दरात झालेली वाढ ही एनएचएआयच्या नियमांनुसार झाली आहे. नॅशनल हायवे फी रूल्स २०२५ नुसार, वार्षिक पासच्या दरात दरवर्षी बदल करणे आवश्यक आहे.
फास्टॅग वार्षिक पास किती जण वापरतात?
फास्टॅग वार्षिक पासचा वापर किती वाहने करतात, याची आकडेवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे आहे. त्या आकडेवारीनुसार, सध्या देशात ५० लाखांहून अधिक वाहनधारकांकडे फास्टॅग वार्षिक पास आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर २८ टक्के कारचालक फास्टॅग वार्षिक पासचा वापर करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे फास्टॅग वार्षिक पासच्या दरामध्ये झालेल्या वाढीने देशातील ५० लाखांहून अधिक लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
२०१६ मध्ये फास्टॅग सुरू केल्यापासून आतापर्यंत ११ कोटी ८६ लाख फास्टॅग वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी ५ कोटी नऊ लाख फास्टॅग सध्या अॅक्टिव्ह आहेत. जवळपास ९८ टक्के टोल हा फास्टॅगमार्फत इलेक्ट्रॉनिकली गोळा केला जात आहे, असे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले.
फास्टॅग वार्षिक पासचा सर्वाधिक वापर कुठे ?
देशातल्या कोणत्या टोलनाक्यांवर फास्टॅग वार्षिक पासचा सर्वाधिक वापर करण्यात आला याबाबतची माहिती मंत्रालयाकडे आहे. त्यानुसार दिल्ली-गुरूग्रामच्या सीमेवर असलेल्या बीजवासन टोलनाक्यावर सर्वाधिक फास्टॅग वार्षिक पासचा वापर करण्यात आला. ५७ टक्के कारने पासचा वापर करून हा टोलनाका ओलांडल्याची नोंद आहे. त्याखालोखाल दिल्लीच्या बाहेरील मुंडका टोलनाका ५३ टक्के कारचालकांनी फास्टॅग वार्षिक पासच्या सहाय्याने ओलांडला. तसेच ५३ टक्के कारचालकांनी सोनिपत-बवाना राष्ट्रीय महामार्गावरील झिंझोली टोलनाक्यावर फास्टॅग वार्षिक पासचा वापर केल्याचे मंत्रालयाकडे असलेल्या माहितीतून समोर आले.
विभागवार आकडेवारीनुसार, देशात चंडिगडमध्ये सर्वाधिक फास्टॅग वार्षिक पासचा वापर करण्यात आला. देशातील एकूण फास्टॅग वार्षिक पासच्या वापरापैकी १४ टक्के वापर हा चंडिगडमध्ये करण्यात आला. १२.३ टक्के वापर तामिळनाडूत, तर ११.५ टक्के वापर दिल्लीत करण्यात आला. १५ ऑगस्ट २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत देशातील टोलनाक्यांवर झालेल्या व्यवहारांत २६ कोटी ५५ लाख व्यवहार हे फास्टॅग वार्षिक पासच्या सहाय्याने झाल्याची नोंद मंत्रालयाकडे आहे.
फास्टॅग वार्षिक पासने देशातील सगळ्याच टोलनाक्यांना लागू होतात का?
फास्टॅग वार्षिक पास हे देशातील सगळ्याच टोलनाक्यांवर लागू होत नाहीत. राष्ट्रीय महामार्ग तसेच राष्ट्रीय द्रुतगती महामार्गांवरील (एक्स्प्रेस वे) ११५० टोलनाक्यांवर फास्टॅग वार्षिक पासचा वापर करता येतो. राज्य मार्ग किंवा राज्याने बनवलेले एक्स्प्रेस वे यांवरील टोल नाक्यांवर फास्टॅग वार्षिक पास उपयोगी पडत नाही. या टोलनाक्यांवर रेग्युलर फास्टॅगमधून पैसे कटतात. तसेच त्या टोलनाक्यावर लागू असलेले यूजर फी चार्जेस द्यावे लागतात. याचा अर्थ फक्त राष्ट्रीय महामार्ग किंवा राष्ट्रीय द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) यांवरील टोलनाक्यांवरच फास्टॅग वार्षिक पासचा वापर करता येतो. इतरवेळी रेग्युलर फास्टॅगमधून पैसे कटतात.
फास्टॅग वार्षिक पास घेणे बंधनकारक आहे का ?
फास्टॅग वार्षिक पास हा फक्त नॉन कमर्शियल वाहनांसाठी आहे. म्हणजेच खासगी कार, जीप, व्हॅन या वाहनांसाठी फास्टॅग वार्षिक पास आहे. हा पास घेणे बंधनकारक नाही. फास्टॅग वार्षिक पास विकत घेतल्यानंतर त्याची मुदत एक वर्ष किंवा २००० ट्रिप्स असते. पासचा एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर रेग्युलर फास्टॅगमधून पैसे वजा होतात. देशातील २००० टोलनाके पासच्या सहाय्याने ओलांडल्यानंतर या पासचे नुतनीकरण करावे लागते. कारण या पासची मर्यादा २००० टोलनाक्यांपुरतीच मर्यादीत आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत २००० टोलनाक्यांवर पासचा वापर केला तर पासची मुदत संपते. अशावेळी वाहनधारक नवीन पास खरेदी करू शकतो.
फास्टॅग वार्षिक पास ऑनलाइन कसा खरेदी करावा ?
फास्टॅग वार्षिक पास हा राजमार्ग यात्रा मोबाईल अॅप किंवा एनएचएआयच्या वेबसाइटवरून विकत घेता येतो. राजमार्ग यात्रा अॅपने फास्टॅग वार्षिक पास विकत घ्यायचा असल्यास –
१) राजमार्ग यात्रा अॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा.
२) राजमार्गा यात्रा अॅपवर रजिस्टर मोबाइल नंबरने लॉग इन करा.
३) तुमच्या वाहनाचे फास्टॅग अकाउंट अॅपशी लिंक करा.
४) FASTag Annual Pass सेक्शनवर क्लिक करा.
५) तुमचे वाहन सिलेक्ट करा आणि पास विकत घ्यायचा असल्याचे कन्फर्म करा.
६) पेमेंट करा.
