How to port Fastag Bank : फास्टॅग लावलेली गाडी आहे, पण फास्टॅगची सेवा देणारी बँक बदलायची असेल तर पुन्हा नवीन फास्टॅग घ्यावा लागतो… ही अडचण आता दूर होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ‘OneTag’ नावाची फास्टॅग पोर्टेबिलिटी सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे वाहनावरील फास्टॅग स्टिकर न बदलता त्याच फास्टॅगला दुसऱ्या बँकेशी जोडता येणार आहे.
ही सुविधा महामार्ग प्राधिकरणाच्या ‘राजमार्गयात्रा’ ॲपवर उपलब्ध झाली आहे. यापूर्वी फास्टॅगची सेवा देणारी बँक बदलायची असल्यास जुना फास्टॅग काढून नवीन फास्टॅग घ्यावा लागत होता. आता मात्र ही प्रक्रिया मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसारखी होणार आहे. म्हणजे मोबाईल नंबर न बदलता जसा टेलिकॉम कंपनी बदलता येते, त्याचप्रमाणे फास्टॅग स्टिकर न बदलता त्याची बँक बदलता येणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये नुकतीच या सुविधेची घोषणा केली आहे. आतापर्यंत देशात १३ कोटींहून अधिक फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गांवरील वाहनांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कापैकी ९८ टक्क्यांहून अधिक शुल्क फास्टॅगद्वारे डिजिटल पद्धतीने जमा होत आहे, त्यामुळे ‘वन टॅग’ सुविधेचा वाहनचालकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
मग वन टॅग नेमकं कसं काम करणार? बँक बदलण्यासाठी काय करावं लागेल आणि या सुविधेचा वाहनचालकांना काय फायदा होणार? हे समजून घेऊया.
सेवा पुरवणारी बँक बदलताना काय करायचं? स्टेप बाय स्टेप समजून घ्या
- सर्वांत आधी राजमार्गयात्रा ॲपवर लॉगिन करा आणि वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. यानंतर फास्टॅग पोर्ट करण्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासता येईल.
- तुम्हाला सध्या फास्टॅगची सेवा देणाऱ्या बँकेकडून मोबाईलवर सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळेल.
- यानंतर फास्टॅग ज्या नवीन बँकेत पोर्ट करायचा आहे ती बँक निवडा. नवीन बँकेकडील ग्राहक पडताळणी आणि वॉलेट ऑनबॉर्डिंगची प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
- ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबरशी जोडलेला फास्टॅग आयडी बदलणार नाही, त्यामुळे नवीन फास्टॅग घेण्याची गरज पडत नाही.
- तुम्ही गाडीवर असलेला जुना फास्टॅग तसाच वापरू शकता. मात्र, यापुढे टोलचे पैसे भरण्यासाठी नवीन बँकेशी जोडलेलं खातं वापरता येणार आहे.
फास्टॅग पुन्हा दुसऱ्या बँकेत पोर्ट करता येईल का?
हो, पण लगेच नाही. महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, एकदा फास्टॅग दुसऱ्या बँकेत पोर्ट केल्यानंतर सहा महिन्यांनंतरच पुन्हा पोर्ट करता येणार आहे. पोर्टेबिलिटी पूर्ण झाल्यानंतर जुनी बँक फास्टॅगचं वॉलेट बंद करेल आणि आवश्यक रक्कम वजा करून त्यातील उरलेली शिल्लक परत करेल. त्यानंतर पुन्हा पोर्ट करण्यासाठी सहा महिन्यांचा ‘कूलिंग पीरियड’ असेल.
महामार्ग प्राधिकरणाने सांगितले की, ‘वन टॅग’मुळे वारंवार नवीन फास्टॅग तयार करण्याची गरज भासणार नाही, त्यामुळे फास्टॅग तयार करणे, पाठवणे आणि पुन्हा जारी करण्याचा खर्चही कमी होण्यास मदत होईल. यासोबतच बँक बदलण्याची प्रक्रिया अधिक सोपी होईल, ग्राहकांना बँक निवडण्याचं स्वातंत्र्य मिळेल आणि फास्टॅगची संपूर्ण व्यवस्था अधिक सुलभ आणि कार्यक्षम होण्यास मदत होईल.
फास्टॅग कसं काम करतं?
राष्ट्रीय महामार्गांवर २०१९ पासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला. फास्टॅगमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हा फास्टॅग गाडीच्या पुढच्या काचेवर लावलेला असतो आणि त्याच्याशी प्रीपेड किंवा सेव्हिंग्ज खातं जोडलेलं असतं, त्यामुळे टोल प्लाझावर गाडी थांबवण्याची गरज पडत नाही आणि टोलची रक्कम थेट संबंधित खात्यातून वजा होते.
आरएफआयडी हे वायरलेस तंत्रज्ञान आहे. यात टॅग आणि रीडर यांचा वापर केला जातो. रेडिओ लहरींच्या माध्यमातून टॅगवरील माहिती जवळच्या रीडरपर्यंत पोहोचते. हे रीडर हातात धरता येऊ शकतात किंवा टोल प्लाझासारख्या ठिकाणी ठरावीक जागी बसवलेले असू शकतात. मेट्रोच्या स्मार्ट कार्डमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाप्रमाणेच फास्टॅगमध्येही ही प्रक्रिया होते.
फास्टॅगमध्ये इंटिग्रेटेड सर्किट आणि अँटेना असतो. हे दोन्ही रेडिओ लहरींच्या माध्यमातून रीडरशी संपर्क साधतात. यासाठी लो फ्रिक्वेन्सी (LF), हाय फ्रिक्वेन्सी (HF) आणि अल्ट्रा-हाय फ्रिक्वेन्सी (UHF) अशा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो. फास्टॅगकडून रेडिओ लहरींच्या स्वरूपात पाठवलेली माहिती डेटामध्ये रूपांतरित केली जाते आणि त्याच संबंधित संगणक प्रणाली विश्लेषण करत असते.
बारकोडपेक्षा आरएफआयडीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यासाठी थेट समोरासमोर संपर्क असण्याची गरज नसते, त्यामुळे फास्टॅग रीडरसमोर आणण्याची आवश्यकता नसते. या टॅगमध्ये एन्क्रिप्टेड माहिती, सीरियल नंबर आणि वस्तू किंवा वाहनाची थोडक्यात माहितीही साठवता येते. मोठ्या प्रमाणात माहिती साठवता येणाऱ्या आरएफआयडी टॅगचा वापर विमान वाहतूक क्षेत्रासारख्या उद्योगांमध्ये केला जातो.
