रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढतच चालला आहे. त्याचा परिणाम इतर देशांवरही दिसून येत आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांनी माहिती दिली की, इराणने रशियाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे पुरवली आहेत. “रशियाला आता बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्राप्त झाले आहे आणि हे क्षेपणास्त्र रशिया युक्रेनविरुद्ध काही आठवड्यांत वापरेल अशी शक्यता आहे,” असे ब्लिंकन यांनी मंगळवारी लंडनमधील एका पत्रकार परिषदेत सांगितले. ब्लिंकन यांच्या म्हणण्यानुसार या क्षेपणास्त्रांमुळे रशियाची ताकद दुप्पट होणार आहे. ही हालचाल बघता, यूएस ट्रेझरी व स्टेट डिपार्टमेंट्सने इराणी शस्त्रास्त्रे रशियाला नेणार्‍या रशियन ध्वजधारक नऊ जहाजांवर निर्बंध लादले, तसेच इराणी एअरलाइन्स आणि कंपन्यांविरुद्धही कारवाई केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युक्रेनियन अधिकाऱ्यांनी तेहरान व मॉस्कोच्या पुढील हालचाली टाळण्यासाठी रशियावर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, “जागतिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या या बाबी टाळण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला इराण व रशियावर दबाव वाढविण्याचे आवाहन करतो.” डझनभर रशियन सैन्य कर्मचाऱ्यांनी इराणमध्ये Fath-360 क्षेपणास्त्र प्रणाली चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याच्या वृत्तामुळे चिंता आणखी वाढली आहे. युक्रेनियन युद्धभूमीवर हे क्षेपणास्त्र वापरले जाण्याच्या शक्यतेने भीती निर्माण झाली आहे. Fath-360 नक्की काय आहे? या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य काय? या क्षेपणास्त्राने अमेरिकेची चिंता का वाढवली आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : ९/११ च्या आत्मघातकी हल्ल्यानंतर काय बदललं? विमान वाहतुकीच्या सुरक्षा व्यवस्थेत काय बदल झाले?

Fath-360 म्हणजे काय?

Fath-360 ला काही वेळा Fateh-360, असेही संबोधले जाते. हे इराणने विकसित केलेले कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र त्याच्या अचूक आणि जलद तैनाती क्षमतेसाठी ओळखले जाते. Fath-360 क्षेपणास्त्र लष्करी आणि पायाभूत सुविधांच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट असलेल्या बाबी खालीलप्रमाणे :

-लाँच वजन : ७८७ किलोग्रॅम

-वॉरहेड वजन : १५० किलोग्रॅम

-रेंज: अंदाजे १२० ते ३०० किलोमीटर

-वेग : मॅच तीन ते मॅच चार

-मार्गदर्शन प्रणाली : उपग्रह नेव्हिगेशन

-अचूकता : ३० मीटर सीईपी

-लाँचिंग : ट्रक-माउंटेड ट्रान्स्पोर्टर इरेक्टर लाँचर (टीईएल)वरून लाँच केले जाते.

Fath-360 ला काही वेळा Fateh-360, असेही संबोधले जाते. (छायाचित्र-रॉयटर्स)

क्षेपणास्त्राच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे एकाच लाँचरवर अनेक क्षेपणास्त्रे बसविता येतात. त्यातील सॉलिड-इंधन इंजिन जलद प्रक्षेपणास सक्षम आहे. Fath-360 ची अनेकदा अमेरिकेच्या HIMARS क्षेपणास्त्राशी तुलना केली जाते. गतिशीलता व परिणामकारकतेमध्ये ही दोन्ही क्षेपणास्त्रे जवळजवळ सारखी आहेत. परंतु, Fath-360 मध्ये १५० किलोग्रॅम वॉरहेड आहे आणि ते ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करू शकते; तर HIMARS च्या M31 GMLRS या क्षेपणास्त्रामध्ये वॉरहेड ९० किलोग्रॅमचे आहे आणि हे क्षेपणास्त्र ७० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य गाठते. HIMARS त्याच्या अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाते; तर Fath-360 त्याच्या लहान डिझाईन व लांब रेंजमुळे एक शक्तिशाली क्षेपणास्त्र ठरते.

Fath-360 क्षेपणास्त्राचा युक्रेनला धोका आहे का?

लष्करी विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, Fath-360 क्षेपणास्त्र युक्रेनियन सैन्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषत: त्याची श्रेणी आणि अचूकता यांमुळे. १२१ किलोमीटरची कमाल मर्यादा असणारे हे क्षेपणास्त्र रशियन सैन्याला युक्रेनमधील आघाडीच्या स्थानांवर, पोकरोव्स्क, सुमी व खार्किव यांसारख्या शहरांवर लक्ष्य करण्याच्या दृष्टीने रशियासाठी फायद्याचे ठरू शकते. क्षेपणास्त्राच्या लहान आकारामुळे हे क्षेपणास्त्र अत्यंत खास आहे. कारण- दूरवरून हे क्षेपणास्त्र पाहता येणे कठीण आहे. त्यामुळेच हे क्षेपणास्त्र रोखणेदेखील कठीण आहे. इराणच्या लष्करी तंत्रज्ञानावर रशिया अवलंबून आहे. क्षेपणास्त्रांच्या या कराराद्वारे दोन्ही राष्ट्रांमध्ये विशेषत: लष्करी आणि आण्विक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाण बाबतीत सखोल सहकार्य असल्याचे दिसून येते. ब्लिंकन यांच्या मते, रशियाने इराणला त्यांच्या ग्लोनास उपग्रह नेव्हिगेशन प्रणालीमध्ये प्रवेश दिला आहे.

इराणची क्षेपणास्त्रांवर काय प्रतिक्रिया?

मोठे पुरावे असूनही इराणने रशियाला बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा पुरवठा केल्याच्या आरोपांचे खंडन सातत्याने सुरूच ठेवले आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी, ही माहिती खोटी असल्याचे सांगितले. “संघर्षात गुंतलेल्या देशांमध्ये मानवी घातपात वाढतो, पायाभूत सुविधांचा नाश होतो. त्यामुळे इराण लष्करी साह्य पुरवतो. युद्धविराम वाटाघाटीपासून दूर राहणे अमानवीय आहे,” असे इराणने सांगितले आहे. रशियाने अनेक संवेदनशील क्षेत्रांमध्ये इराणशी आपले लष्करी सहकार्य कायम ठेवले आहे. परंतु, युक्रेनियन अधिकार्‍यांना दोन्ही देशांमधील हालचालींवर संशय आहे. काही तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की, Fath-110 सारखी मोठी व अधिक शक्तिशाली क्षेपणास्त्रेदेखील या वितरणाचा भाग असू शकतात.

हेही वाचा : भारतीय वायूदलातील विंग कमांडरवर बलात्काराचा आरोप : भारताच्या सशस्त्र दलांमध्ये वाढला महिलांचा लैंगिक छळ?

युक्रेनच्या संघर्षात इराणी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा सहभाग युद्धाची परिस्थिती आणखीनच बिकट करील, हे खरे आहे. इतकेच नव्हे तर, युक्रेनच्या संरक्षण धोरणांसमोर नवीन आव्हाने येऊन उभी राहतील. युक्रेन आता युक्रेनमधील रशियन-नियंत्रित भागात आणि संभाव्यतः रशियन प्रदेशांत हल्ला करण्यासाठी अमेरिकेने पुरविलेली शस्त्रे वापरण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fath 360 missiles iran reportedly sent to russia rac
Show comments