Sperm Count & Lifestyle : जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्य हे आईच्या आरोग्यावर अवलंबून असते, असे आपण सतत ऐकत आलो आहोत. परंतु, या मान्यतेला छेद देणारे संशोधन साउथॅम्प्टन विद्यापीठात करण्यात आले आहे. बाळाचे आरोग्य कसे असेल हे त्याच्या पित्याच्या आरोग्यावर व जीवनशैलीवरही अवलंबून असते, असे संशोधनातून समोर आले. बाळ सदृढ व निरोगी जन्माला यावे म्हणून जितके आईचे आरोग्य महत्वाचे, तितकेच पित्याचेही आरोग्य महत्वाचे असते, असे नवीन संशोधन अहवाल सांगतो. या अहवालातून पित्याचे आरोग्य कसे असावे, मूल जन्माला घालण्याआधी पित्याने काय काळजी घ्यावी, पित्याच्या आरोग्याचा मूल जन्माला घालण्यावर कसा परिणाम होतो, कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

पित्याच्या कोणत्या वाईट सवयींचा होतो बाळाच्या आरोग्यावर परिणाम?

‘द लॅन्सेट’ या आरोग्य मासिकात प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार पित्याचे आरोग्य व जीवनशैली यांचा बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे आईचे आरोग्य जितके महत्वाचे तितकेच पित्याचेही आरोग्य महत्वाचे आहे. “पित्याला असलेल्या सवयी, त्याचे इतरांशी वागणे, वजन, धूम्रपान (स्मोकिंग), मद्यपान, मानसिक आरोग्य आणि वय या गोष्टींवर जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्य अवलंबून असते. आईच्या आरोग्याकडे जितके लक्ष दिले जाते, तितकेच लक्ष पित्याच्या आरोग्याकडे देणे आवश्यक असते, हे अहवालातून सांगण्यात आले आहे”, असे साऊथॅम्प्टन विद्यापीठाच्या संशोधनात सहभागी प्राध्यापक किथ गोडफ्रे यांनी म्हटले आहे.

पित्याच्या आरोग्यावरून ठरते बाळाचे आरोग्य?

गोडफ्रे म्हणाले, बाळाचे आरोग्य कसे असेल हे अनेकदा त्याच्या पित्याच्या आरोग्यावरून ठरते. पित्याचे लहानपण कसे होते, तो कोणत्या वातावरणात वाढला, त्याचे शिक्षण या गोष्टींचा देखील बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे लहान मुले व तरूणांची जीवनशैली उत्तम असावी यावर भर देणे आवश्यक आहे. असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर दिसून येईल, असे गोडफ्रे म्हणाले. पुढील पिढ्या निरोगी असाव्यात म्हणून आजची लहान मुले व तरूण मुले यांची आरोग्यदायी वाढ होणे आवश्यक आहे.

Award Banner

पित्याची स्पर्म हेल्थ चांगली असणे आवश्यक का?

गर्भ तसेच जन्माला येणाऱ्या बाळाचे आरोग्य हे पित्याच्या आरोग्यावरही अवलंबून असते. त्यामुळे पित्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फर्टिलिट सोसायटीच्या अध्यक्ष व मुंबईतील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. रिश्मा पाई म्हणाल्या. पित्याचे आरोग्य कसे आहे याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. यात पित्याची भूमिका अत्यंत महत्वाची असते. निरोगी व सदृढ बाळ जन्माला येण्यासाठी पित्याचे शुक्राणू आरोग्य (स्पर्म हेल्थ) चांगले असणे महत्वाचे असते, असे डॉ. पाई म्हणाल्या. बदलत्या जीवनशैली व सवयींमुळे पुरूषांचा स्पर्म काऊंट लक्षणीय कमी होत असल्याचे अनेक वैद्यकीय अहवालांतून समोर आले आहे. त्यामुळे चांगली जीवनशैली व सवयी आत्मसात करणे तरूणांसाठी आवश्यक आहे.

जागतिक पातळीवर स्पर्म काऊंटमध्ये घट?

जागतिक पातळीवर १९७३ ते २०१८ दरम्यान पुरूषांच्या शुक्राणुंच्या संख्येत (स्पर्म काऊंट) ५० टक्क्यांहून अधिकची घट झाली आहे. सध्याच्या एकविसाव्या शतकात स्पर्म काऊंटमध्ये वेगाने घट होत आहे. बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्पर्म क्वालिटीवर (शुक्राणुंच्या गुणवत्तेवर) होत आहे, असे डॉक्टर सांगतात. धूम्रपान (स्मोकिंग), लठ्ठपणा, उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर), मद्याचे अतिसेवन, वय आणि मानसिक आजार व तणाव यांचा शुक्राणुंवर (स्पर्म) परिणाम होऊन बाळाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

बाळासह आईच्याही जीवाला धोका का?

पत्नी गरोदर राहण्याआधी तिच्या पतीचे आरोग्य कसे होते, याचा देखील परिणाम गर्भधारणेवर होतो. पतीच्या आरोग्याशी संबंधित वाईट सवयींमुळे पत्नी गरोदर राहिल्यानंतर तिला प्री-एक्लॅम्पसिया या आजाराचा सामना करावा लागू शकतो. हा आजार होणे हे काहींच्या बाबतीत पतीच्या आरोग्याशी संबंधित असते. या आजारात मूल व आई दोघांच्या जीवाला धोका असतो. पतीची चयापचय क्रिया मंदावणे, लठ्ठपणा, हायपरटेन्शन आणि वाढलेली शुगर यांमुळे हा आजार गरोदर स्त्रीला होण्याची शक्यता असते. त्यामुळे आईचे आरोग्य धोक्यात येते.

स्त्रीला गर्भधारणा होण्याआधी पित्याने व्यायाम केल्यास बाळाच्या आरोग्याशी संबंधित अनेक संभाव्य धोके टाळता येतात. तसेच लठ्ठपणा व स्मोकिंग केल्याने बाळात जन्मजात विकृती येऊ शकते. धूम्रपान व मद्याचे सेवन केल्याने बाळाला कॅन्सर होण्याचाही धोका असतो.

लहानपणी व तारूण्यात घडलेल्या घटनांचाही परिणाम?

पुरूषांच्या जीवनात त्यांना सुरूवातीला असलेला शारीरिक व मानसिक ताण तणाव, वातावरण, शिक्षण यांचा त्यांच्या पुनरूत्पादनावर परिणाम होतो. तसेच पुढील आयुष्यात त्यांच्या जोडीदारावरही या गोष्टी परिणाम करतात. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळावरही त्याचा परिणाम होतो, असे साऊथॅम्प्टन विद्यापीठातील संशोधनात सहभागी डॉ. डॅनियल शोनेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, बाळाचे आरोग्य हे फक्त पित्याच्या आरोग्यावर अवलंबून नसते, ते आईच्याही आरोग्यावर अवलंबून असते. त्यामुळे पुरूष व स्त्री या दोघांनी सदृढ व निरोगी बाळासाठी आरोग्यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे.

तरूणांनी कोणती काळजी घ्यावी?

तरूणांनी चांगला आहार घ्यावा. नियमितपणे व्यायाम करावा. तणाव टाळावा. धूम्रपान, मद्यपान टाळावे. वजन नियंत्रणात ठेवावे. चयापचय क्रिया चांगली राहिल याची काळजी घ्यावी. शुगर होणार नाही याची काळजी घ्यावी. मानसिक व शारीरिक आरोग्य कसे चांगले राहिल यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. स्वत:चे व्यक्तिमत्व चांगले घडवावे. येणारे बाळ निरोगी व आरोग्यदायी असावे यासाठी तरूणांनी काळजी घ्यावी.