कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या जीवनशैलीजन्य आजारांप्रमाणेच आता ‘फॅटी लिव्हर’ म्हणजेच यकृतातील चरबी साठण्याच्या समस्येनेही देशात भयंकर रूप धारण केले आहे. मद्यपान न करणाऱ्या तरुणांचेही यकृत या आजाराने खराब होत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ही परिस्थिती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भारतातही पसरू लागली आहे. भारतातील सुमारे ३८ टक्के तरुणांमध्ये दिसून येणारी फॅटी लिव्हरची लक्षणे जागतिक सरासरीपेक्षा अधिक असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. यापार्श्वभूमीवर ही समस्या नेमकी कशामुळे निर्माण होतेय? त्यामागचे नेमके कारण काय? त्याविषयीचा हा आढावा…
नेमका काय आहे फॅटी लिव्हर?
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. वायुप्रदूषण घातक ठरत असल्याने नागरिकांना आरोग्याची नियमित तपासणी करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे. यादरम्यान देशातील तरुणांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज या आजाराचा धोका वाढला आहे. लिव्हर म्हणजे यकृतात झालेल्या बदलांमुळे ही स्थिती निर्माण होत आहे. सामान्य भाषेत यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याला फॅटी लिव्हर म्हणतात. प्रमाणापेक्षा जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ असणाऱ्या लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या आढळून येत आहे. या स्थितीमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फारसा त्रास होत नसला तरीही समस्या अधिकाधिक बिघडत गेल्यास यकृत खराब होण्याचा धोका वाढू शकतो. या आजाराचा सर्वात चिंताजनक पैलू म्हणजे तो २५ ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
फॅटी लिव्हरचा सर्वाधिक धोका कोणाला?
एकेकाळी फॅटी लिव्हर हा आजार केवळ मद्यपान करणाऱ्यांमध्येच आढळून येत होता. मात्र, आता त्याने मद्यपान न करणाऱ्या २०, ३० आणि ४० वयोगटातील व्यक्तींनाही ग्रासले आहे. यापूर्वी या आजाराला ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ असे म्हटले जात होते. आता जागतिक स्तरावर त्याचे नाव बदलून ‘मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टीटोटिक लिव्हर डिसीज’ असे करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत तरुण आयटी प्रोफेशनलपासून ते तासनतास डेस्कवर बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना फॅटी लिव्हरचे निदान झाले आहे. महानगरांमध्ये फॅटी लिव्हरचे प्रमाण ४१ टक्क्यांपर्यंत असून ग्रामीण भागांमध्येही ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले असल्याचे शनल नॉन-कम्युनिकेबल डिजीज मॉनिटरिंग सर्व्हेच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
आणखी वाचा : सासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर कोणाचा अधिकार? जावई हक्क सांगू शकतो का? कायदा काय सांगतो?
फॅटी लिव्हर नेमका कशामुळे वाढतोय?
तासनतास एका जागी बसून काम करण्याची पद्धत, कामाचा प्रचंड ताण आणि चुकीचा आहार यामुळे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वेगाने वाढत आहे. मद्यपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही चयापचयातील समस्यांमुळे यकृतात चरबी साठण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तब्बल ८४% कर्मचाऱ्यांच्या यकृतामध्ये चरबीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. हे कर्मचारी दिवसातील बराच वेळ डेस्कवर बसून घालवत असल्यामुळे त्यांच्या केवळ फॅटी लिव्हरच नव्हे तर लठ्ठपणा, वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आणि अपुरी झोप यांसारखी इतर जोखमीची लक्षणेही आढळली आहेत. जागतिक स्तरावर दर तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीला फॅटी लिव्हरचा त्रास आहे आणि ही संख्या सातत्याने वाढत आहे, असे क्लिनिकल आणि मॉलिक्युलर हेपॅटोलॉजीच्या अभ्यासातून समोर आले आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. वरुण बन्सल यांनी या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींमध्ये फॅटी लिव्हरचे निदान होणे ही धोक्याची घंटा आहे. फॅटी लिव्हरचा थेट संबंध इन्सुलिन रेझिस्टन्स, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि वाढलेल्या कोलेस्ट्रॉलशी असतो. हे सर्व घटक भविष्यात हृदयविकाराला निमंत्रण देणारे महत्त्वाचे ठरतात. त्याशिवाय या आजारामुळे शरीरातील चरबीचे प्रमाणही वाढत असल्यामुळे यकृत खराब होण्याचा धोका वाढतो आहे. यकृताचे आरोग्य राखण्यासाठी ऑफिसमध्ये काम करताना दर तासाला थोडे चालणे, घरचा डबा खाणे आणि दिवसातून किमान ३० मिनिटे व्यायाम करणे अनिवार्य आहे, असा सल्ला डॉ. वरुण बन्सल यांनी दिला आहे.
फॅटी लिव्हरला कोणत्या गोष्टी कारणीभूत?
कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दररोज ७ ते ९ तास किंवा त्याहून अधिक डेस्कवर बसून काम करावे लागते. त्यामुळे चयापचय क्रिया मंदावते आणि शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. त्यातच कामाच्या ताणामुळे अनेकजण सकाळची न्याहारी टाळतात किंवा जंक फूड खातात. जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ थेट यकृतामध्ये चरबी वाढवतात. उशिरापर्यंत काम करणे आणि अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील चयापचय संतुलन बिघडते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो, असे डॉ. बन्सल यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, फॅटी लिव्हर हा एक गुप्त आजार आहे. यकृतामध्ये चरबी साठत असताना त्याची सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. सतत थकवा जाणवणे, जेवणानंतर पोटात जडपणा वाटणे, पोटाच्या उजव्या बाजूला हलकी अस्वस्थता जाणवणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास यकृताला सूज येऊन ते निकामी होण्यासारखे गंभीर आजार होऊ शकतात.
हेही वाचा : भारतासह ३९ देशांतील चिकन-अंड्यांवर सौदी अरेबियाने घातली बंदी; कारण काय?
जीवनशैलीत कोणकोणते बदल आवश्यक?
यकृताचे आरोग्य हे तुम्ही काय खाता यावर ९० टक्के अवलंबून असते. गोड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, बिस्किटे, केक आणि मैद्याचे पदार्थ यकृतामध्ये थेट चरबी वाढवतात. त्यामुळे या पदार्थांचे सेवन टाळायला हवे असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राइस, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि ओट्स यात फायबर जास्त असते, जे चरबी कमी करण्यास मदत करतात. त्याशिवाय कोबी, ब्रोकोली, पालक आणि मेथी यांसारख्या भाज्या यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतात. डाळी, मूग, कडधान्ये, पनीर, अंडी किंवा मासे या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे वेगाने चालणे, धावणे, सायकलिंग किंवा पोहणे यांमुळे यकृतातील साठलेली चरबी कमी होते. मद्यपान हे यकृत खराब होण्याचे सर्वात मोठे कारण आहे. फॅटी लिव्हरचे निदान झाले असल्यास मद्यपान पूर्णपणे बंद करणे हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
