अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक   कारवायांनी सध्या संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. हॉटेल्स, अन्नभेसळखोर आणि औषध माफियांच्या विरोधात त्यांनी उघडलेली मोहीम चर्चेत आहे. तुकाराम मुंढेंसारखीच कार्यशैली असणार्‍या ठिकठिकाणच्या अन्य काही अधिकार्‍यांबाबत…
‘करप्शन किलर’  लॉरा कोवेसी कोण आहेत?
रोमानियाच्या लॉरा कोवेसी यांनी मंत्री, खासदार आणि अनेक महापौरांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवल्यामुळे त्या जागतिक स्तरावर ‘करप्शन किलर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यकाळात १४ कॅबिनेट मंत्री किंवा माजी मंत्री आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांतील ५३ खासदार-आमदारांवर भ्रष्टाचाराचे खटले चालवण्यात आले. शेकडो महापौर, न्यायाधीश, वरिष्ठ सरकारी वकील आणि उद्योगपतींना त्यांनी लाचखोरी आणि गैरव्यवहाराच्या आरोपांखाली तुरुंगात पाठवले.

त्यांनी काही वर्षांमध्ये हजारो भ्रष्टाचाराचे खटले न्यायालयात उभे केले, ज्यामुळे देशाच्या तिजोरीचे होणारे कोट्यवधी रुपयांचे (युरोचे) नुकसान टळले. सिसिलियन माफियांचा नायनाट करणारे इटलीतील जिओव्हानी फाल्कोन हेही जगप्रसिद्ध तपास अधिकारी होते. ‘मॅक्सी ट्रायल’च्या माध्यमातून त्यांनी शेकडो कुप्रसिद्ध माफियांना तुरुंगात धाडले. १९९२ मध्ये माफियांच्या एका भीषण बॉम्बस्फोटात त्यांना प्राण गमवावे लागले.

सरवर आलम यांनी कोणाला तुरुंगात का धाडले?

सरवर आलम यांनी बांगलादेशात अन्न व औषधांमधील भेसळ, अस्वच्छ हॉटेल्स आणि बनावट औषध कारखान्यांवर ऐतिहासिक छापे घालून त्यांनी संपूर्ण देशात अन्नसुरक्षेचे नियम कडक केले. बेकायदा कृत्यांमध्ये सामील असलेल्या प्रभावशाली राजकारण्यांवर आणि त्यांच्या नातेवाईकांवरही त्यांनी कायदेशीर कारवाई करून तुरुंगात धाडले. अन्न सुरक्षा आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, यामुळे सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास वाढला. 

‘वॉल स्ट्रीटवर जरब बसवणारा माणूस’ कोण?

प्रीत भरारा हे ‘वॉल स्ट्रीट’वरील बड्या उद्योगपतींचे बेकायदेशीर शेअर व्यवहार, आंतरराष्ट्रीय बँकांचे मनी लाँड्रगिं आणि शक्तिशाली नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी जगभर ओळखले जातात. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे २०१२ मध्ये जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर त्यांना स्थान दिले होते आणि ‘वॉल स्ट्रीटवर जरब बसवणारा माणूस’ असा त्यांचा गौरव केला होता. अमेरिकेच्या ‘एफबीआय’चे माजी संचालक आणि विशेष तपास अधिकारी रॉबर्ट म्युलर यांचाही असाच आदराने उल्लेख केला जातो. त्यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील परकीय हस्तक्षेप आणि उच्चस्तरीय प्रशासकीय गैरव्यवहारांच्या तपासादरम्यान राजकीय वर्तुळातून आलेला दबाव बाजूला सारून निष्पक्षपणे तपास पूर्ण केला.

भारतातील धडाकेबाज अधिकारी कोण?

‘डेमॉलिशन मॅन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई महापालिकेच्या गो. रा. खैरनार या अधिकार्‍याने ९०च्या दशकात मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि बड्या नेत्यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर थेट बुलडोझर चालवला. अशोक खेमका हे भारतातील नोकरशाहीत ५०हून अधिक बदल्यांचा विक्रम असणारे आयएएस अधिकारी. व्हीआयपी जमीन घोटाळे आणि बड्या राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचाराचे व्यवहार त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता धाडसाने उघड केले. संजीव चतुर्वेदी हे २००२ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालय आणि हरियाणातील वन विभागातील कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस आणल्याबद्दल त्यांना २०१५ मध्ये प्रतिष्ठेच्या ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नेत्यांना कायद्याची चौकट कोणी शिकवली?

टी. एन. शेषन हे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त. देशातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, ओळखपत्र सक्ती आणि कडक शिस्त आणून त्यांनी सर्व राजकीय पक्षांना कायद्याचे पालन करण्यास भाग पाडले. त्यांनी निष्पक्ष काम करून सर्वच राजकीय पक्षांना आणि बलाढ्य नेत्यांना कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक लढवण्यास भाग पाडले. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त आणि शक्तिशाली संस्था आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले.

कोणत्या भारतीय अधिकार्‍यांचीही नावे चर्चेत?

के. विजय कुमार हे वीरप्पन या चंदनाच्या तस्कराचा खात्मा करणार्‍या ‘ऑपरेशन कोकून’चे नेतृत्व करणारे तमिळनाडू केडरचे आयपीएस अधिकारी होते. यू. सगायम हे तमिळनाडूतील २० वर्षांच्या कारकीर्दीत २० हून अधिक बदल्या झालेले आयएएस अधिकारी. राज्यातील बेकायदेशीर ग्रॅनाइट उत्खननाचा हजारो कोटींचा घोटाळा उघड करताना पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून त्यांनी थेट स्मशानात रात्रभर मुक्काम ठोकला होता. दिल्लीत थेट पंतप्रधानांच्या ताफ्यातील गाडीवर कारवाई करण्यापासून ते तिहार तुरुंगात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यापर्यंत  किरण बेदी यांची कारकीर्द प्रसिद्ध आहे. याशिवाय शिवदीप लांडे, डी. रूपा, बी. चंद्रकला, व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, स्मिता सबरवाल, नरेंद्र कुमार या अधिकार्‍यांची नावेही धडाकेबाज कारवाईमुळे कायम चर्चेत आलेली आहेत.  

chandrakant.dadas@expressindia.com