Female brain grey matter hormonal transitions: आपले संपूर्ण आयुष्य हे विविध टप्प्यांमध्ये विभागले गेले आहे. बालपण, किशोरावस्था, युवावस्था, प्रौढत्व, मध्यम वय व वृद्धत्व, असे माणसाच्या आयुष्याचे सहा टप्पे आहेत. त्यासोबत आपल्या शरीरामध्येसुद्धा अनेक बदल होत असतात. या बदलांमध्ये यौवनावस्था (puberty), शारीरिक परिपक्वता (physical maturation), संप्रेरकांच्या प्रमाणात बदल (hormonal changes/ hormonal imbalance), गर्भावस्था, पेरीमेनोपॉज व रजोनिवृत्ती (Perimenopause & Menopause), अँड्रोपॉज (Andropause / Male Climacteric), प्रेसबायोपिया (Presbyopia – डोळ्यांतील भिंगाची लवचिकता कमी झाल्यामुळे उद्भवणारा दृष्टिदोष), सेनिसन्स (Senescence / जैविक वार्धक्य) इ. म्हणतो.

यौवन, गर्भधारणा व रजोनिवृत्ती हे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे टप्पे असतात. या तीनही टप्प्यांदरम्यान शरीरातील संप्रेरकांमध्ये लक्षणीयरीत्या बदल होतात, ज्यांचा परिणाम स्त्रियांच्या मेंदूवर होत असतो. ८ सप्टेंबर रोजी ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नव्या संशोधनाने या तीनही टप्प्यांमध्ये घडणाऱ्या मेंदूतील बदलांचा एकत्रित आणि सखोल अभ्यास केला आहे. या अभ्यासाने मेंदूच्या ‘करड्या पदार्था’वर (ग्रे मॅटर) विशेष भर दिला आहे, जो मेंदूच्या बाह्य, सुरकुत्या/चुण्या असलेल्या पृष्ठभागाचा म्हणजेच ‘सेरेब्रल कॉर्टेक्स’चा मोठा भाग बनतो.

करडा पदार्थ म्हणजे काय?

आपल्या मेंदूच्या वरच्या भागात करड्या रंगाचा थर असतो, जिथे विचार आणि भावनांची प्रक्रिया सुरू असते. आपण काय पाहतो, काय ऐकतो, जुन्या गोष्टी कशा आठवायच्या, भावना कशा व्यक्त करायच्या आणि निर्णय क्षमता या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हा करडा पदार्थ करीत असतो.

संशोधन पद्धती (Research Methodology)

या संशोधनासाठी अभ्यासकांनी दोन वेगवेगळ्या स्रोतांमधून माहिती गोळा केली. रजोनिवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी यूके बायोबँक या वैद्यकीय माहिती संचाचा वापर करून पाच लाख ब्रिटिश प्रौढ स्त्रियांची माहिती गोळा केली, ज्यामध्ये लोकांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन अहवालही समाविष्ट होते. यौवन आणि गर्भधारणेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी नेदरलँड्समधील लायडेन विद्यापीठाने गोळा केलेल्या माहितीचा आधार घेतला.

एकूण १,०९५ स्त्रियांच्या मेंदूचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला. प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूचे दोन वेगवेगळ्या वेळी निरीक्षण करून, वेळेनुसार त्यात काय बदल होतात आणि इतरांच्या मेंदूशी त्याची तुलना कशी होते, हे तपासण्यात आले. यौवनाच्या गटात मासिक पाळी सुरू न झालेल्या मुली, नुकतीच पाळी सुरू झालेल्या मुली आणि सरासरी १९ महिने पाळी सुरू असलेल्या मुलींचा समावेश होता. गर्भधारणेच्या गटात पहिल्यांदा गरोदर राहिलेल्या ४० आणि दुसऱ्यांदा गरोदर राहिलेल्या ३० स्त्रियांसह, तुलनेसाठी कधीही गरोदर न राहिलेल्या ४० स्त्रियांचाही समावेश करण्यात आला होता.

लाइव्ह सायन्सशी ई-मेलद्वारे बोलताना कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वैज्ञानिक संचालिका मॅग्डालेना मार्टिनेझ-गार्सिया यांनी स्पष्ट केले,

“स्त्रियांच्या तिन्ही प्रमुख हार्मोनल संक्रमणांमधील मेंदूच्या संरचनात्मक बदलांची थेट, दीर्घकालीन तुलना करणारा हा पहिलाच अभ्यास आहे.”

यौवन आणि गर्भधारणेदरम्यान करड्या पदार्थाची घट

या संशोधनात असे दिसून आले की, यौवनावस्थेत प्रवेश करणाऱ्या मुली आणि गरोदर स्त्रिया या दोघींच्याही मेंदूत करड्या पदार्थाचे प्रमाण कमी होते. मात्र, शास्त्रज्ञांच्या मते, ही घट नकारात्मक मानण्याची गरज नाही. या अभ्यासाच्या सहलेखिका व अ‍ॅमस्टरडॅम विद्यापीठ वैद्यकीय केंद्रातील मानसोपचारशास्त्राच्या पीएचडी विद्यार्थिनी सोफी वांट होफ यांनी सांगितले,

“आम्ही याकडे सकारात्मक बाब म्हणून पाहतो… आम्ही याला न्यूरल फाइन-ट्युनिंग म्हणून पाहतो.”

यौवनावस्थेदरम्यान होणारी ही घट मेंदूच्या प्रौढावस्थेकडे होणाऱ्या सामान्य विकासाचा भाग मानली जाते. गर्भधारणेदरम्यान अशी घट होण्यामागचे नेमके कारण अजूनही पूर्णपणे समजलेले नाही, असे वांट होफ यांनी स्पष्ट केले. मात्र, आतापर्यंतच्या पुराव्यांवरून असे दिसत नाही की, या घट होण्याचा संबंध प्रसूतीनंतर काही स्त्रियांना जाणवणाऱ्या विस्मरण आणि गोंधळाच्या स्थितीशी म्हणजेच तथाकथित ‘मॉमी ब्रेन’शी आहे. वांट होफ यांनी स्पष्ट केले की, करड्या पदार्थातील घट आणि विसरभोळेपणा किंवा मानसिक गोंधळाची स्थिती जाणवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

रजोनिवृत्तीदरम्यान करड्या पदार्थाची स्थिरता

मेंदूत करड्या पदार्थाची घट ही वृद्धत्वाची सुरुवात मानली जाते. मात्र, रजोनिवृत्तीकडे नेणाऱ्या संक्रमण काळात ही घट काही काळासाठी थांबते, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

संशोधनातील या प्रश्नाच्या अभ्यासात १२० स्त्रियांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यास सुरू झाला तेव्हा या स्त्रियांची मासिक पाळी सलग वर्षभर थांबली नव्हती; मात्र पुढील साडेतीन वर्षांत ती पूर्णपणे बंद झाली. रजोनिवृत्तीच्या व्याख्येनुसार, ‘एखाद्या स्त्रीच्या शेवटच्या मासिक पाळीपासून पूर्ण एक वर्ष उलटल्यानंतर ती रजोनिवृत्त झाली, असे मानले जाते.’ या स्त्रियांची तुलना शेवटची पाळी न आलेल्या सुमारे ५० स्त्रिया (सरासरी वय ५१) आणि आधीच रजोनिवृत्ती झालेल्या ६७० हून अधिक स्त्रियांशी (सरासरी वय ५५.५) करण्यात आली.

रजोनिवृत्तीच्या शेवटच्या काळात करड्या पदार्थात होणारी घट थांबते, असे वांट होफ यांनी सांगितले. ज्यांचा रजोनिवृत्तीचा काळ पूर्ण झाला आहे, त्यांच्यात ही घट पुन्हा सुरू होते. प्रत्येक स्त्रीसाठी ही घट थांबण्याची नेमकी वेळ वेगवेगळी असली तरी संपूर्ण गटात हा नमुना (pattern) सातत्याने दिसून आला आहे.

मॅग्डालेना मार्टिनेझ-गार्सिया यांच्या मते, रजोनिवृत्तीच्या संक्रमण काळात मेंदूच्या आकारातील वयाशी संबंधित सततची घट काहीशी कमी होणे, हा या अभ्यासातील सर्वांत लक्षणीय निष्कर्ष आहे. रजोनिवृत्तीपूर्व आणि रजोनिवृत्तीनंतरच्या तुलनेने स्थिर गटांच्या तुलनेत हा बदल स्त्रियांच्या मेंदूची गतिशीलता दर्शवतो, असे त्या म्हणाल्या.

विशेष बाब म्हणजे स्त्रियांनी रजोनिवृत्तीसाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली होती की नाही, तसेच त्यांनी किती मुलांना जन्म दिला होता, या घटकांचा निकालांवर कोणताही मोजता येण्याजोगा परिणाम झाला नाही, असे संशोधकांनी नमूद केले.

मेंदूतील गोंधळाची स्थिती आणि पुढील दिशा

रजोनिवृत्तीच्या आधी, दरम्यान आणि नंतरच्या काळात अनेक स्त्रियांना मानसिक गोंधळाची स्थिती सामान्यपणे जाणवते, असे वांट होफ यांनी सांगितले. त्याचे कारण संप्रेरकांची पातळी कमी होणे आणि झोपेत येणारा व्यत्यय असू शकतो. मात्र, या मानसिक गोंधळामागे न्यूरोलॉजिकल म्हणजे चेतासंस्थेशी संबंधित नेमके कारण काय आहे, हे अजून स्पष्ट झालेले ना. कारण- याविषयीचा हा पहिलाच अभ्यास आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी आणखी अभ्यासांची गरज आहे.

मार्टिनेझ-गार्सिया यांनी सांगितले की, कोणत्याही अभ्यासाप्रमाणे यातही काही मर्यादा आहेत; मात्र एकूणच या अभ्यासाची पद्धत आणि निष्कर्ष उपलब्ध माहितीच्या आधारे सुयोग्य वाटतात. मार्टिनेझ-गार्सिया आणि वांट होफ या दोघींनीही अशी आशा व्यक्त केली की, इतर संशोधकही या निष्कर्षांचा आधार घेऊन, स्त्रियांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील मेंदूविषयक ज्ञानात अधिक भर घालतील.