Festival LED laser light health risks: महाराष्ट्रातील सण-उत्सव हे केवळ धार्मिक विधीपुरते मर्यादित राहिले नसून, त्याला आता एका ‘इव्हेंट’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव, असो वा लग्नसराईच्या मिरवणुका; ढोल-ताशांचा गजर, डीजेचा बोलबाला, गुलालाची उधळण आणि गर्दी. गेल्या काही वर्षांत या पारंपरिक उत्सवांचं स्वरूप वेगानं बदललं आहे. पूर्वीचे साधे, डोळ्यांना सुखद वाटणारे दिवे जाऊन, त्यांची जागा आता हजारो वॉटच्या हाय-बीम लेझर किरणांनी, डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रखर एलईडी वॉलने (LED Walls) आणि एकापाठोपाठ एक लुकलुकणाऱ्या ‘स्ट्रोब लाइट्स’नी घेतली आहे.

रात्रीच्या अंधारात आभाळ उजळवून टाकणारा हा झगमगाट क्षणभरासाठी आकर्षक वाटत असल, तरी तो आपली दृष्टी आणि मज्जासंस्थेवर अत्यंत गंभीर परिणाम करीत आहे. जागतिक आरोग्य संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या वैज्ञानिक अभ्यासानं अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमधील कृत्रिम प्रकाशयोजनांचे मानवी आरोग्यावरील विदारक परिणाम सविस्तरपणे मांडले आहेत.

डोळ्यांवर तत्काळ होणारा आघात : ग्लेअर आणि अंधारी

निसर्गानं मानवी डोळ्यांची रचना अतिशय संवेदनशील स्वरूपाची बनवली आहे. अंधारातून प्रकाशात जाताना किंवा प्रकाशातून अंधारात येताना डोळ्यांच्या बाहुल्या (Pupil) आकुंचन आणि प्रसरण पावून प्रकाशाचं प्रमाण नियंत्रित करतात. मात्र, उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये रात्रीच्या घनदाट अंधारात जेव्हा अचानक तीव्र प्रकाशझोत डोळ्यांवर पडतो, तेव्हा डोळ्यांच्या बाहुल्यांना या बदलाशी जुळवून घेणं अशक्य होतं. यामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र चकाकीला शास्त्रीय भाषेत ‘ग्लेअर’ (Glare) असं म्हणतात.

संशोधनानुसार, प्रखर निळसर छटा असलेल्या ‘कूल एलईडी’ (Cool-toned lights) दिव्यांमुळे ग्लेअरचा सर्वांत जास्त त्रास होतो. त्यामुळे डोळे चुरचुरणं, डोळ्यांतून सतत पाणी वाहणं आणि तात्पुरती अंधारी येणं यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. धक्कादायक बाब म्हणजे या अभ्यासात १९ ते २५ या तरुण वयोगटातील लोकांमध्ये तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांतून पाणी येण्याचे आणि डोकेदुखीचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त आढळतात. त्याशिवाय तीव्र दिव्यांकडे पाहिल्यानंतर दुसरीकडे बघितल्यास डोळ्यांसमोर काळे डाग अथवा तरंग उमटल्यासारखे वाटतात. या अवस्थेला ‘आफ्टर-इमेजेस’, (Afterimages), असं म्हटलं जातं.

‘ब्लू-लाइट’च्या विळख्यामुळे दृष्टीपटलाला (Retina) त्रास होतो का?

मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक एलईडी दिव्यांमध्ये निळ्या प्रकाशाची तरंगलांबी (Wavelength ४०० ते ४९५ nm) अधिक असते. या ‘हाय-एनर्जी व्हिजिबल’ (HEV) ब्लू-लाइटमध्ये ऊर्जेची तीव्रता प्रचंड असते. मानवी डोळ्यातील कॉर्निया आणि लेन्स सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांना काही प्रमाणात अडवू शकतात. मात्र, एलईडीमधून निघणारा हा निळा प्रकाश थेट डोळ्यांच्या दृष्टिपटलापर्यंत (Retina) खोलवर पोहोचतो. संशोधनानुसार, या निळ्या प्रकाशाच्या तीव्र संपर्कामुळे रेटिनामधील संवेदनशील पेशी जळतात किंवा नष्ट होतात. या प्रक्रियेमुळे अकाली ‘मॅक्युला’ खराब होण्याचा (Macular Degeneration) धोका निर्माण होतो. जर रेटिनाचं नुकसान झालं, तर व्यक्तीची दृष्टी कायमस्वरूपी धूसर होऊ शकते किंवा दृष्टीचा मध्यवर्ती भाग निकामी होऊ शकतो. काही तासांचा क्षणिक झगमगाट आयुष्यभरासाठी अंधत्व किंवा दृष्टिदोष देऊन जाऊ शकतो, हे भयानक वास्तव अनेकांना ठाऊक नसतं.

मज्जासंस्थेवर ताण आल्याने फिट्सचा धोका होऊ शकतो?

सध्याच्या मिरवणुकांमध्ये गाण्यांच्या तालावर सेकंदाला अनेकदा चमकणारे आणि विझणारे ‘स्ट्रोब लाइट्स’ (Strobe / Blinking Lights) वापरले जातात. हा प्रकाश मानवी मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरतो. डोळ्यांच्या माध्यमातून मेंदूकडे जाणाऱ्या दृश्यांचे विभाजन करण्यासाठी मज्जासंस्थेला ठरावीक वेळ लागतो. परंतु, प्रकाशाच्या जलद आणि अनपेक्षित चालू-बंद होण्याच्या प्रक्रियेत मेंदूची सिग्नल यंत्रणा गोंधळते. त्यामुळे सामान्य माणसालाही अचानक चक्कर येणं (Vertigo), मळमळणं, तोल जाणं व तीव्र अस्वस्थता, असे त्रास जाणवू शकतात. सर्वांत भयानक धोका म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये ‘फोटोसेन्सिटिव्ह एपिलेप्सी’ची (Photosensitive Epilepsy) सुप्त लक्षणं असतात, त्यांच्यामध्ये अशा लुकलुकणाऱ्या दिव्यांमुळे थेट अपस्माराचे म्हणजेच फिट्सचे झटके येऊ शकतात. मिरवणुकीच्या गर्दीत अचानक फेफरे येऊन व्यक्ती बेशुद्ध पडण्याच्या घटनांमागे हेच प्रखर स्ट्रोब दिवे कारणीभूत असतात.

बिघडलेलं जैविक घड्याळ आणि हरवलेली शांत झोप:

निसर्गानं मानवी शरीरात एक जैविक घड्याळ (Circadian Rhythm) बसवलं आहे, जे दिवस-रात्रीच्या चक्रावर चालतं. रात्री अंधार पडल्यानंतर आपल्या मेंदूतील पिनिअल ग्रंथी ‘मेलॅटॉनिन’ (Melatonin) नावाचं संप्रेरक तयार करतं. हे संप्रेरक शरीराला शांत, गाढ झोप मिळवून देण्यासाठी आणि दिवसभरातील पेशींची झीज भरून काढण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. मात्र, जेव्हा आपण मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या मिरवणुकांमध्ये प्रखर कृत्रिम प्रकाशाच्या सान्निध्यात राहतो, तेव्हा डोळ्यांवाटे मेंदूला ‘अजूनही दिवसच आहे,’ असा खोटा संदेश जातो. त्यामुळे मेलॅटॉनिनची निर्मिती पूर्णपणे ठप्प होते. परिणामी, मिरवणुकीतून घरी परतल्यानंतरही मेंदू उत्तेजित राहतो, डोळे थकले असूनही झोप लागत नाही आणि मग तीव्र ? निद्रानाश (Insomnia)चा त्रास होतो. संशोधनानुसार, जैविक घड्याळात बिघाड होण्याचा हा त्रास सातत्यानं होऊ लागला की, पुढे जाऊन उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि मानसिक ताणतणाव यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.

रासायनिक धुराचा डोळ्यांवर विषारी आघात

मिरवणुकांमध्ये किंवा स्टेजवर दिव्यांचे रंगीबेरंगी किरण हवेत उठून दिसावेत यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘फॉग मशीन’द्वारे रासायनिक धूर हवेत सोडला जातो. हा कृत्रिम धूर आणि हजारो वॉटच्या दिव्यांमधून उत्सर्जित होणारी उष्णता यांच्या एकत्रीकरणामुळे डोळ्यांवर विषारी दुष्परिणाम होतो.

आपल्या डोळ्यांच्या बाहेरील भागावर अश्रूंचा एक अतिशय नाजूक नैसर्गिक थर (Tear Film) असतो, जो डोळ्यांचे बाह्य घटकांपासून रक्षण करतो. धूर आणि अतिउष्ण प्रकाशाच्या थेट संपर्कामुळे अश्रूंच्या या थराचं वेगानं बाष्पीभवन होतं आणि तो सुकतो. त्यामुळे ‘ड्राय आय सिंड्रोम’ (Dry Eyes) हा त्रास सुरू होतो. डोळे लालभडक होणं, डोळ्यांत वाळू गेल्यासारखं सतत टोचणं, प्रचंड खाज सुटणं आणि डोळ्यांना जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका अशा गर्दीच्या वातावरणात कित्येक पटींनी वाढतो.

वैज्ञानिक संशोधनातील शिफारशी व उपाययोजना:

या गंभीर परिणामांचा सखोल अभ्यास करून, शास्त्रज्ञांनी उत्सवांचे नियोजन अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी करण्यासाठी सुचवलेले काही मूलभूत उपाय खालीलप्रमाणे :

  • दिशा-नियंत्रित प्रकाशयोजना (Directional Lighting): दिव्यांचा किंवा लेझरचा झोत लोकांच्या डोळ्यांवर थेट न मारता, तो मंचावर अथवा आकाशाच्या दिशेनं सुरक्षित कोनात केंद्रित करावा.
  • लो-लाइट झोन्स (Low-Light Rest Zones) : अभ्यासातील सुमारे ३८% नागरिकांनी नमूद केल्यानुसार, मोठ्या उत्सवांच्या आवारात मंद प्रकाशाचे विश्रांती कक्ष असावेत, जिथे जाऊन डोळ्यांना काही वेळ प्रखर प्रकाशापासून आराम देता येईल.
  • स्ट्रोब आणि लेझरवर निर्बंध: डोळ्यांच्या पडद्याला कायमची इजा करू शकणाऱ्या हाय-पॉवर लेझर बीम्सवर आणि मेंदूला त्रास देणाऱ्या स्ट्रोब लाइट्सवर पूर्णपणे बंदी अथवा कडक मर्यादा असावी.
  • हाय-क्वालिटी डिफ्युज्ड एलईडी: अत्यंत प्रखर, टोकदार प्रकाशदायी दिव्यांऐवजी योग्य फिल्टर बसवलेले, डोळ्यांना सुखद वाटणारे दर्जेदार ‘डिफ्युज्ड एलईडी’ (Diffused LED) दिवे वापरण्यास ४५% लोकांनी पसंती दिली आहे.

विवेकी उत्साहाची नितांत गरज

संस्कृती आणि सणांचा आनंद हा आपल्या जगण्याचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी असतो; स्वतःचं किंवा इतरांचं आरोग्य धोक्यात घालण्यासाठी नाही. डोळे हा मानवी शरीराला लाभलेला अत्यंत नाजूक आणि अमूल्य अवयव आहे. एकदा दृष्टीला इजा झाली, तर ती पूर्ववत करणं अशक्यप्राय असतं. त्यामुळे सण-उत्सवांमध्ये डीजेच्या आवाजाच्या मर्यादेसोबतच आता प्रकाशाच्या सुरक्षिततेचंही भान ठेवणं ही काळाची गरज बनली आहे. दिखाऊ आणि अंधाधुंद झगमगाटाला फाटा देऊन, डोळ्यांना सुरक्षित वाटणारी प्रकाशयोजना स्वीकारणं हाच आपल्या परंपरेचा आणि मानवी आरोग्याचा खरा सन्मान ठरेल.