Gold Purchase : मुलीचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीही लागली; आता मुलीला सोन्याचं पेंडंट भेट देण्याची एका आईची इच्छा आहे. पण, सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे मुंबईतील ५८ वर्षीय गृहिणी हर्षिता राणे यांनी ही सोनेखरेदी काही काळ पुढे ढकलली. आता सोन्याच्या किमतीत थोडी घट झाल्याने त्यांनी पुन्हा झवेरी बाजाराची वाट धरली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर त्यांना मुलीसाठी पेंडंट घेण्याची इच्छा होती.

राणे यांच्यासारखे अनेक ग्राहक सोन्याच्या चढ्या दरामुळे काही काळ खरेदीपासून दूर राहिले होते. आता दर काहीसे कमी झाल्याने सणासुदीच्या काळात ही रखडलेली खरेदी पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईच्या झवेरी बाजारासह देशातील प्रमुख सराफा बाजारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सणासुदीच्या काळामुळे सोनेखरेदीबाबत सुरुवातीला उत्साह दिसत असला तरी सोन्याच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची खरेदीची इच्छा असली तरी किमतीमुळे खरेदीच्या निर्णयावर प्रभाव पडत आहे.

साधारणत: वर्षाच्या उत्तरार्धात दागिन्यांची विक्री वाढत असते. नवरात्र, धनत्रयोदशी व ख्रिसमस, असे सण एकापाठोपाठ असल्यानं सोनेखरेदीचा उत्साह दिसून येतो. महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या काळात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वाढते. त्यानंतर दिवाळी आणि पुढे लग्नसराईमध्ये ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यामुळे देशभरातील सराफा बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण होतं.

उद्योग क्षेत्रातील जाणकारांच्या मते, दरवर्षीप्रमाणे यंदाही सणासुदीच्या काळात दागिन्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या किमती जास्त असल्यानं यंदा एकूण विक्रीचे प्रमाण तुलनेनं कमी राहू शकते. या दरवाढीमुळे ग्राहक मोठ्या आणि विश्वासार्ह दागिन्यांच्या खरेदीसाठी सोनेविक्रीच्या मोठ्या साखळ्यांकडे वळू शकतात. परिणामी छोट्या व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसू शकतो. यातच आज शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पिवळ्या धातूवर (सोन्यावर) विक्रीचा दबाव वाढल्याने ईटीएफचे भाव कोसळले आहेत. ज्यामुळे सोने-चांदीच्या दर काहीसे घसरत आहेत. याचा छोट्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो.

सराफा बाजारात उत्साह असूनही सोनेखरेदीत आखडता हात?

पीएनजीएस रेवा डायमंड्सचे संचालक आदित्य मोडक यांनी सणासुदीच्या हंगामाबाबत सावध आशावाद व्यक्त केला. त्यांच्या मते, वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे ग्राहक किमतींबाबत सजग झाले आणि त्यांनी हलक्या वजनाचे दागिने खरेदी करण्याला प्राधान्य दिलं. मात्र, आता सण आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्यानं ग्राहकांमध्ये पुन्हा उत्साह दिसून येत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे (IBJA) अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनीही गणेशोत्सवादरम्यान आणि त्यानंतर दागिन्यांच्या खरेदीत सकारात्मक हालचाल दिसत असल्याचं सांगितलं. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत खरेदीचा वेग मंदावला होता. मात्र, आता सणांसोबतच खरेदीलाही पुन्हा सुरुवात होत असल्यानं नवी आशा निर्माण झाली आहे. गणेशोत्सवानं सोनेखरेदीला चालना दिली. आधीच्या तुलनेत सराफा बाजारातील ग्राहकांची वर्दळ वाढली असून, ग्राहक शुभ मुहुर्तावरील खरेदीसोबतच रोजच्या वापरासाठी हलक्या वजनाचे दागिनेही खरेदी करीत आहेत, असं कोठारी यांनी नमूद केलं.

विक्रीचे प्रमाण कमी; पण वाढलेल्या किमतींचा फायदा

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या काळात दागिन्यांची कमी विक्री होऊ शकते, असे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोन्या-चांदीच्या वाढलेल्या किमतींमुळे काही ग्राहक खरेदी तात्पुरती रोखू शकतात. जे ग्राहक खरेदी करतील, त्यांच्यापैकीही अनेक जण आधी ठरवल्यापेक्षा कमी वजनाचे दागिने घेण्याची शक्यता आहे.

मात्र, दागिन्यांच्या विक्रीचं प्रमाण कमी झालं तरी वाढलेल्या किमतींमुळे एकूण विक्रीच्या मूल्यावर त्याचा परिणाम कमी होऊ शकतो. कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांच्या मते, भारतात सणासुदीच्या काळात दागिन्यांची नेहमीच मजबूत मागणी असते. यंदा सोन्याच्या किमती जास्त असल्याने किलो किंवा टनाच्या तुलनेत विक्रीचं प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी कमी होऊ शकतं. मात्र, वाढलेल्या किमतींमुळे विक्रीच्या एकूण मूल्याची भरपाई होऊ शकते.

पीएनजीएस रेवा डायमंड्सचे संचालक आदित्य मोडक यांच्या मते, आगामी सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात दागिन्यांच्या मागणीत हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे. दागिन्यांच्या एकूण विक्रीच्या मूल्यात एक अंकी मोठी ते दोन अंकी छोटी, अशी वाढ होऊ शकते. मात्र, सोनं आणि इतर मौल्यवान धातूंच्या वाढत्या किमतींमुळे प्रत्यक्ष विक्रीचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. मोडक यांच्या मते, ग्राहक दागिन्यांची खरेदी पुढे ढकलत आहेत, असं नाही. उलट, आपल्या बजेटमध्ये राहून अधिक चांगली डिझाईन आणि चांगलं सोनं कसं मिळेल, याकडे त्यांचा कल वाढला आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी यंदाच्या सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या विक्रीच्या प्रमाणात गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ ते २० टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ग्राहकांमधील वाढत्या उत्साहामुळेही खरेदीत वाढ होऊ शकते. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत खरेदीचं प्रमाण थोडं कमी राहू शकतं.

ग्राहक सध्या कमी कॅरेटचे सोने, स्टडेड ज्वेलरी आणि कमी वजनाचे दागिने खरेदी करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीच्या वाढत्या किमतींचा परिणाम काही प्रमाणात कमी होतो आणि ग्राहकांना बजेटमध्ये खरेदी करता येते. अनेक ग्राहक नवीन दागिने घेण्यासाठी जुन्या सोन्याचा वापर करीत आहेत.
२०२६ च्या सुरुवातीला सोन्याच्या किमती १० ग्रॅममागे २.३ लाख रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. आता त्या सुमारे १.५ लाख रुपयांवर आल्या आहेत. गतवर्षी सणासुदीच्या काळात सोन्याचा भाव सुमारे १.२ ते १.३ लाख रुपये होता. दरम्यान, जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि भू-राजकीय अस्थिरतेमुळे महागाई वाढल्यानं अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याऐवजी बाँडसारख्या मोठा परतावा देणाऱ्या साधनांकडे वळत आहेत.

मोठ्या ब्रँड्सना फायदा; छोट्या व्यापाऱ्यांवर दबाव

सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सोनेखरेदी एखाद्या खास प्रसंगापुरती मर्यादित झाली आहे. त्यामुळे खास खरेदीसाठी ग्राहक मोठ्या ज्वेलरी ब्रँडवर विश्वास ठेवत आहेत. मोठ्या ब्रँड्सकडे भांडवल आणि विक्रीचं प्रमाण जास्त असल्यानं त्या ग्राहकांना अधिक सवलती देऊ शकतात. तसेच नवीन डिझाईन आणि उत्पादनांमध्ये ते नवनवीन प्रयोग करतात. कामा ज्वेलरीचे व्यवस्थापकीय संचालक कॉलिन शाह यांच्या मते, उद्योग जसजसा अधिक संघटित होत जाईल, तसतसा मोठ्या ब्रँड्सचा बाजारातील वाटाही वाढत जाईल.

याउलट, छोट्या सराफांसमोर मोठी आव्हानं आहेत. मुंबईच्या झवेरी बाजारातील एका छोट्या सराफाच्या मते, भांडवल आणि रोख व्यवहारांच्या मर्यादित प्रवाहामुळे मोठ्या ब्रँड्सएवढी सवलत देणं त्यांना शक्य होत नाही. त्यांना कामगार आणि कारागीरांना पगारही द्यावा लागतो. त्यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी वजनाचे दागिने, स्टडेड ज्वेलरी आणि नवीन डिझाईनमध्ये नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी त्यासाठीही मोठ्या भांडवलाची गरज आहे.

झवेरी बाजारातील छोट्या दुकानात काउंटरवर काम करणाऱ्या राहुल यांच्या मते, ग्राहकांची वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. पूर्वी एखाद्या दिवशी १० ते १५ दागिने विकले जायचे, तिथे आता चार ते पाच दागिने विकणंही कठीण होत आहे. काही दिवशी तर त्यापेक्षाही कमी विक्री होते. त्यामुळे सोन्याच्या वाढलेल्या किमतींचा केवळ ग्राहकांच्या खरेदीवरच नाही, तर छोट्या व्यावसायिकांवरही लक्षणीय परिणाम दिसून येत आहे.