Learn everything about the FIFA 2026 Smart Football and how Trionda AI Football Technology functions on the pitch: फुटबॉलच्या मैदानावर आता केवळ खेळाडूच नाही, तर चेंडू देखील स्वतः विचार करून निर्णय प्रक्रियेत मदत करणार आहे. २०२६ फिफा विश्वचषकासाठी अधिकृत फुटबॉल म्हणून सादर करण्यात आलेला ‘ट्रिओन्डा’ (Trionda) हा केवळ फुटबॉल नसून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक सेन्सर प्रणालीने सुसज्ज असलेले एक इलेक्ट्रॉनिक उपकरणच आहे.

विश्लेषणाची साधने

फुटबॉलच्या मैदानावर धावणाऱ्या खेळाडूंच्या शरीरावर सेन्सर्स असतात, प्रशिक्षकांकडे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित विश्लेषणाची साधने असतात आणि रेफरी अर्थात पंचांकडे व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR) प्रणाली असते. आता या यादीत आणखी एका घटकाची भर यंदाच्या फिफा २०२६ मध्ये पडणार आहे, ती म्हणजे AI फुटबॉल!

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली

2026 FIFA विश्वचषकासाठी अधिकृत फुटबॉल म्हणून सादर करण्यात आलेला ‘ट्रिओन्डा’ (Trionda) हा केवळ फुटबॉल नाही, तर तो एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणच आहे. त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला पूरक अशी सेन्सर प्रणाली बसवण्यात आली असून ती प्रत्येक क्षणी फुटबॉलची हालचाल, वेग, दिशा आणि स्पर्श यांची माहिती नोंदवते.

FIFA World Cup 2026 live streaming India
फिफा विश्वचषक २०२६ (संग्रहित छायाचित्र)

फुटबॉल स्वतःच असेल निर्णयप्रक्रियेचा भाग

फुटबॉलचा शोध लागून दीडशे वर्षांहून अधिक काळ झाला. मात्र पहिल्यांदाच फुटबॉल स्वतःच खेळातील निर्णय प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे ट्रिओन्डा हा केवळ २०२६ फिफा विश्वचषकाचा अधिकृत फुटबॉल नसून तो क्रीडा क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या क्रांतीचे प्रतीक ठरला आहे.

१९७० च्या टेलस्टारपासून २०२६च्या ट्रिओन्डापर्यंत

फुटबॉलच्या आधुनिक इतिहासातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल म्हणजे १९७० च्या विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेला टेलस्टार. त्यावेळी जगभरात ब्लॅकअॅण्डवाइट टीव्हीचा जमाना होता. त्यामुळे प्रेक्षकांना चेंडू स्पष्ट दिसावा यासाठी त्यावर काळे आणि पांढरे पंचकोनी व षटकोनी तुकडे वापरण्यात आले. ३२ पॅनेल्सच्या रचनेमुळे टेलस्टारचे स्वरूप इतके लोकप्रिय झाले की, आजही ‘फुटबॉल’ म्हटले की सर्वप्रथम तेच डिझाइन असलेली प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. आधुनिक फुटबॉलच्या डिझाइनची पायाभरणी टेलस्टारनेच केली. मात्र त्यानंतरच्या पाच दशकांत विज्ञान, भौतिक अभियांत्रिकी आणि एरोडायनॅमिक्स च्या क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली. त्यामुळे फुटबॉलची रचना सतत बदलत गेली. याच प्रवासाचा अत्याधुनिक टप्पा म्हणजे ट्रिओन्डा.

इतिहासातील सर्वात कमी पॅनेल्स असलेला फुटबॉल

ट्रिओन्डाची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्याची रचना. या चेंडूत अवघी चार पॅनेल्स वापरण्यात आली आहेत. फुटबॉलच्या इतिहासात इतक्या कमी पॅनेल्सचा वापर यापूर्वी कधीही झालेला नव्हता. पॅनेल्सची संख्या कमी केल्याने चेंडूच्या पृष्ठभागावरील शिवणरेषा कमी होतात. त्यामुळे हवेत निर्माण होणारा रोध नियंत्रित राहतो आणि फुटबॉल वैज्ञानिकदृष्ट्या हवेत अधिक स्थिर राहातो. एरोडायनॅमिक्सच्या भाषेत सांगायचे झाल्यास, अशा रचनेमुळे हवेचा प्रवाह अधिक सुसंगत राहतो आणि चेंडूची दिशा अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता कमी असते. २०१० च्या विश्वचषकातील ‘जाबुलानी’ चेंडूवर अनेक खेळाडूंनी टीका केली होती. गोलरक्षकांच्या मते, तो हवेत अचानक दिशा बदलत असे. ट्रिओन्डा मात्र त्याच्या अगदी उलट आहे. अधिक स्थिर, अधिक नियंत्रित आणि अधिक अचूक नेमका जाणारा हे त्याचे प्रमुख वैशिष्ट आहे.

हा फुटबॉल चार्जही करावा लागतो!

  • ट्रिओन्डा हा जगातील कदाचित पहिला असा विश्वचषक फुटबॉल आहे, जो वापरण्यापूर्वी चार्ज करावा लागणार आहे.
  • या चेंडूला सुमारे 90 मिनिटे चार्ज केल्यानंतर सहा तास वापरता तो येतो. याचे कारण म्हणजे त्याच्या आत बसवलेली इलेक्ट्रॉनिक सेन्सर प्रणाली.
  • २०२२ च्या कतार विश्वचषकातील ‘अल रिहला’ फुटबॉलमध्ये Adidas ने प्रथमच अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरले होते. ट्रिओन्डामध्ये त्याची अधिक प्रगत आवृत्ती समाविष्ट करण्यात आली आहे.

चेंडूच्या आत नेमके काय आहे?

  • ट्रिओन्डामध्ये 500 Hz Inertial Measurement Unit (IMU) नावाचा अत्यंत संवेदनशील मोशन सेन्सर बसवण्यात आला आहे.
  • हा सेन्सर एका सेकंदात तब्बल ५०० वेळा डेटा संकलित करू शकतो. म्हणजे चेंडूची हालचाल जवळपास रिअल टाइममध्ये मोजली जाते.

IMU सेन्सर तीन महत्त्वाच्या गोष्टी मोजतो:

  • चेंडूवर किती बल होते
  • चेंडूची दिशा आणि कोन
  • चेंडू किती वेगाने फिरतो आहे

सोप्या भाषेत सांगायचे तर, खेळाडूने फुटबॉलला कोणत्या क्षणी स्पर्श केला, कोणत्या दिशेने तो मारला आणि तो हवेत कसा फिरला याचा संपूर्ण डिजिटल डेटा हा सेन्सर नोंदवतो. विशेष म्हणजे हा सेन्सर चेंडूच्या एका पॅनेलमध्ये बसवण्यात आला आहे. त्यामुळे वजनाचा समतोल बिघडू नये म्हणून इतर पॅनेल्समध्ये विशेष ‘काउंटरबॅलन्स’ बसवण्यात आले आहेत. यामुळे चेंडूच्या उड्डाणावर सेन्सरच्या वजनाचा कोणताही परिणाम होत नाही.

AI आणि VAR साठी गेमचेंजर

  • फुटबॉलमध्ये VAR प्रणाली आल्यानंतर अनेक वादग्रस्त निर्णय अधिक अचूक झाले. मात्र ऑफसाइडसारख्या निर्णयांसाठी अनेकदा प्रेक्षकांना आणि खेळाडूंना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते.
  • ट्रिओन्डामधील सेन्सर हीच समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
  • चेंडूचा डेटा थेट सामनाधिकारी आणि VAR प्रणालीकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या क्षणी खेळाडूने चेंडूला स्पर्श केला हे अचूकपणे समजू शकते. ऑफसाइड रेषा मोजताना ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.
  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणकीय विश्लेषणाच्या मदतीने हा डेटा काही सेकंदांत प्रक्रिया केला जातो. परिणामी ऑफसाइड निर्णय अधिक जलद आणि अधिक अचूक होण्याची अपेक्षा आहे.

फुटबॉलचे भविष्य बदलणार?

आजचा फुटबॉल हा केवळ खेळ राहिलेला नाही, तो डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय विश्लेषण आणि प्रगत अभियांत्रिकी यांचे अफलातून एकत्रिकरण ठरला आहे. ट्रिओन्डा हा त्याच परिवर्तनाचा पुढचा टप्पा आहे.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक संशोधनात ट्रिओन्डाच्या एरोडायनॅमिक वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी हा फुटबॉल हवेत कसा प्रवास करतो, त्याच्या गतीवर कोणते घटक परिणाम करतात आणि लांबवर मारलेल्या पल्ल्याच्या किकमध्ये तो कसा जातो याचे परीक्षण केले. अभ्यासात असे आढळून आले की, अत्यंत वेगाने मारलेला लाँग बॉल काही मीटर आधीच जमिनीवर येऊ शकतो. म्हणजेच खेळाडूंना अपेक्षित अंतरापेक्षा चेंडू खाली येण्याचे किंवा थांबण्याचे प्रत्यक्ष अंतर कमी असू शकते.

अधिक संशोधनाची गरज

संशोधकांनी मात्र या निष्कर्षांबाबत सावधगिरीही बाळगली आहे. त्यांच्या मते, हा प्रयोग ‘नो-स्पिन’ परिस्थितीत करण्यात आला होता; म्हणजेच चेंडूला कोणतीही फिरकी नसताना त्याच्या वेगात जाण्याचा अभ्यास. प्रत्यक्ष सामन्यांमध्ये मात्र खेळाडू फुटबॉलला विविध प्रकारची गिरकी- फिरकी देतात. त्याशिवाय हवेतली आर्द्रता, तापमान, वाऱ्याचा वेग आणि मैदानावरचे वातावरण यांचाही चेंडूच्या गतीमानतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे वास्तविक सामन्यांमधील परिस्थिती लक्षात घेऊन अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचेही संशोधकांनी नमूद केले आहे. हा अभ्यास प्रतिष्ठित Applied Sciences या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

प्रथमच यजमानपद तीन देशांकडे

ट्रिओन्डाच्या डिझाइनमागेही एक विशेष आहे. 2026 FIFA विश्वचषक हा तीन देशांनी संयुक्तपणे आयोजन केलेला स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच विश्वचषक असणार आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश या महास्पर्धेचे एकत्रित यजमान आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक घटनेचे प्रतिबिंब चेंडूच्या डिझाइनमध्येही दिसून येते. ट्रिओन्डाचा मुख्य रंग पांढरा ठेवण्यात आला असून त्यावर लाल, निळे आणि हिरवे रंग वापरून आकर्षक ग्राफिक्स तयार करण्यात आली आहेत. हे रंग तीनही यजमान देशांच्या रंगसाधर्म्याशी संबंधित आहेत. चेंडूवरील चार प्रमुख पॅनेल्सवर आधुनिक शैलीतील डिझाइन करण्यात आले आहे. मात्र या चेंडूचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण अंग म्हणजे त्यावरील प्रतीके.

तीन राष्ट्रीय प्रतीके

चेंडूवर मेपल लीफ दाखवण्यात आले आहे, हे कॅनडाचे राष्ट्रीय प्रतीक मानले जाते. त्याचप्रमाणे ईगल म्हणजे गरुड हे अमेरिकेच्या सामर्थ्याचे, स्वातंत्र्याचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक आहे. तर स्टार चिन्ह मेक्सिकोच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाशी संबंधित प्रतीकात्मक संदर्भ दर्शवते. या तीन प्रतीकांद्वारे FIFA ने तीन यजमान राष्ट्रांच्या एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर विज्ञान आणि डेटा तंत्रज्ञान

२०२६ चा फिफा कप अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरणार आहे. प्रथमच ४८ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे सामने, प्रेक्षक आणि स्पर्धेचा विस्तार यामध्ये मोठी वाढ होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, आधुनिक फुटबॉलमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका झपाट्याने वाढते आहे. खेळाडूंच्या फिटनेस माहिती, व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR), गोल-लाइन तंत्रज्ञान आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स यानंतर आता फुटबॉलशी संबंधित विज्ञानाकडेही अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. ट्रिओन्डावर झालेले संशोधन हे त्याचेच उदाहरण आहे.
२०२६ च्या फिफा विश्वचषकात जगातील सर्वोत्तम खेळाडू ट्रिओन्डाला पहिली किक मारतील, तेव्हा मैदानावर केवळ फुटबॉल नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सर विज्ञान आणि डेटा तंत्रज्ञानाची नवी क्रांतीही धावताना दिसेल.