scorecardresearch

विश्लेषण: मेसीशिवाय कोणी दिले अर्जेंटिनाच्या विश्वविजयात योगदान?

मेसीशिवायही अनेकांनी हे जेतेपद मिळवून देण्यातून निर्णायक भूमिका पार पाडली, त्याचा घेतलेला हा आढावा…

विश्लेषण: मेसीशिवाय कोणी दिले अर्जेंटिनाच्या विश्वविजयात योगदान?
मेसीशिवाय कोणी दिले अर्जेंटिनाच्या विश्वविजयात योगदान? (फोटो – रॉयटर्स)

संदीप कदम

फ्रान्सला नमवत अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फुटबाॅल विश्वचषकावर आपले नाव कोरले. अर्जेंटिनाच्या या विजयात प्रामुख्याने लिओनेल मेसीने पुढाकार घेत निर्णायक भूमिका बजावली. या जेतेपदानंतर मेसीचे विश्वविजयाचे स्वप्नही साकार झाले. मात्र, मेसीशिवायही अनेकांनी हे जेतेपद मिळवून देण्यातून निर्णायक भूमिका पार पाडली, त्याचा घेतलेला हा आढावा.

गोलरक्षक एमिलिआनो मार्टिनेझची भूमिका कशी ठरली निर्णायक?

अर्जेंटिनाने जेतेपद मिळवल्यानंतर सर्व जगभर मेसीची चर्चा होत असली तरीही, या विजयात निर्णायक भूमिका पार पाडणारा गोलरक्षक एमिलिआनो मार्टिनेझने सर्वांचे लक्ष वेधले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये चमकदार कामगिरी करत मार्टिनेझने सर्वांचे लक्ष वेधले. त्याआधी मार्टिनेझने अतिरिक्त वेळेमध्ये फ्रान्सचे अनेक प्रयत्न रोखत अर्जेंटिनाचे आव्हान शाबूत ठेवले. मार्टिनेझला त्याच्या या कामगिरीसाठी गोल्डन ग्लव्ह पुरस्काराने गौरवण्यात आले. मार्टिनेझने एक वर्षापूर्वीच अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्यास सुरुवात केली. यानंतर मेसीच्या संघाने दोन आंतरराष्ट्रीय किताब जिंकले.

कोपा अमेरिका स्पर्धेच्या जेतेपदातही मार्टिनेझने महत्त्वाची भूमिका पार पाडली. विश्वचषकात नेदरलँड्सविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाने शूटआऊटमध्ये विजय नोंदवला. त्यावेळीही मार्टिनेझने चुणूक दाखवली. तसेच, क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही मार्टिनेझने आपले योगदान दिले होते. २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने अर्जेंटिनाला पराभूत केले होते, तेव्हा मार्टिनेझ स्टेडियममध्ये उपस्थित होता.

विश्लेषण : विश्वचषक विजयामुळे मेसीचे सर्वश्रेष्ठत्व सिद्ध? पेले, मॅराडोना, रोनाल्डो यांच्यासोबतच्या तुलनांना पूर्णविराम मिळणार?

अनुभवी एंजेल डी मारियाची भूमिका अंतिम सामन्यात का ठरली महत्त्वाची?

एंजेल डी मारियाने आपल्या कामगिरीने पुन्हा एकदा सिद्ध केले की, त्याला मोठ्या सामन्यांतील खेळाडू का म्हटले जाते. या सामन्यापूर्वी मारियाला गेल्या काही सामन्यात संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या संधीचे सोने केले. २००८च्या ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाकडून एकमात्र गोल मारियाने केला होता. २०२१च्या कोपा अमेरिकेच्या अंतिम लढतीतही मारियाने गोल झळकावला. त्यामुळे संघाला जेतेपद मिळवण्यात मारियाची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे.

मेसीच्या सोबत मिळून २००५ मध्ये २० वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्या मारियाने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. संघातील सर्वात अनुभवी मध्यरक्षक म्हणून डी मारिया ओळखला जातो. विशेष म्हणजे मेसी आणि मारिया हे समवयस्क असून दोघांनीही संघाची आजवर महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये निर्णायक भूमिका पार पाडली आहे. गेल्या काही सामन्यांत त्याला वगळण्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, अंतिम सामन्यातील आपल्या गोलने त्याने संघातील आपले महत्त्व पटवून दिले.

विश्लेषण : मेसीने World Cup ची ट्रॉफी उचलताना अंगावर काळा पारदर्शक ‘कोट’ का घातला होता? त्यावरुन का सुरु झालाय वाद?

अर्जेंटिनाच्या विजयात प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांचे योगदान महत्त्वाचे का?

तीन कोपा अमेरिका आणि एक विश्वचषक अंतिम सामन्याच्या पराभवानंतर प्रशिक्षक लिओनेल स्कालोनी यांनी संघात बदल आणले. मेसीवरील जबाबदारी कमी करून त्याच्यावरील ओझे कमी केले आणि संघात युवा खेळाडूंना संधी दिली. यानंतर २०१९च्या कोपा अमेरिकेच्या उपांत्य सामन्यात ब्राझीलकडून मिळालेल्या पराभवानंतर अर्जेंटिनाने जोरदार पुनरागमन केले. संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१च्या कोपा अमेरिका संघाचे जेतेपद मिळवले. यानंतर संघ सलग ३६ सामन्यांत अपराजित राहिला. या विश्वचषक स्पर्धेत सौदी अरेबियाकडून पराभूत झाल्यानंतर त्यांची विजयाची मालिका खंडित झाली. यानंतर मात्र, अर्जेंटिना संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली विजय नोंदवत जेतेपद पटकावले.

कोपा अमेरिका स्पर्धेच्या पराभवानंतर मेसीने निवृत्तीची घोषणा केली होती. तेव्हा स्कालोनींना मेसीचे मन वळवण्यात यश मिळाले होते. मेसीने यानंतर पुनरागमन करत २०१८मध्ये विश्वचषक संघाचे नेतृत्व केले. २००५मध्ये मेसीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, तेव्हा स्कालोनी संघासोबत होते. २००६मध्ये मेसीने आपल्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत सहभाग नोंदवला, तेव्हाही स्कालोनी या संघात होते. स्कालोनीने २०१५मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. सँपोली २०१७मध्ये जेव्हा अर्जेंटिनाचे प्रशिक्षक होते, त्यावेळी स्कालोनी त्यांच्यासोबत होते. विश्वचषक स्पर्धेनंतर सँपोली यांना हटवण्यात आल्यानंतर १७वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक स्कालोनी यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

विश्लेषण : अर्जेंटिना वि. फ्रान्स विश्वचषक फुटबॉल इतिहासातील सर्वांत रोमांचक अंतिम सामना ठरतो का?

युवा खेळाडू एंझो फर्नांडेझने सर्वांचे लक्ष का वेधले?

अर्जेंटिनाच्या एंझो फर्नांडेझला विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. २१ वर्षीय फर्नांडेझ पोर्तुगालचा क्लब बेन्फिकाकडून खेळतो. त्याने मेक्सिकोविरुद्धच्या साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनाकडून पहिला आंतरराष्ट्रीय गोल केला. मेसीनंतर (२००६) अर्जेंटिनाकडून गोल झळकावणारा तो युवा खेळाडू ठरला. पोलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने ज्युनिअन अल्वारेझला गोलसाठी साहाय्य केले. फर्नांडेझने विश्वचषक स्पर्धेत बचावापासून आक्रमणापर्यंत सर्व भूमिका चोखपणे पार पाडल्या. त्याच्या या कामगिरीचा फायदा संघाला स्पर्धेदरम्यान झाला. त्याने अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघाकडून २०१९पासून खेळण्यास सुरुवात केली. त्याने अर्जेंटिनाच्या स्थानिक क्लबकडूनही यापूर्वी चमकदार कामगिरी केली आहे, तसेच बेन्फिकाकडून २०२२च्या हंगामात त्याने १३ सामन्यांत एक गोल झळकावला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2022 at 08:08 IST

संबंधित बातम्या